मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद, गरजू रूग्णांची गैरसोय : #5मोठ्याबातम्या

मंत्रालय Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद, रुग्णांना मिळणारी मदत बंद

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आलाय. त्यामुळं हजारो रुग्णांना सरकारकडून मिळणारी मदत बंद झालीय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

राज्यातील गरीब-गरजू रुग्णांना वर्षानुवर्षं आर्थिक आधार देण्याचं काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून केलं जातं. या सहाय्यता निधीसाठी अनेक व्यक्ती आर्थिक हातभार लावत असतात. त्यातून गरजू रुग्णांना मदत पोहोचवली जाते.

Image copyright Twitter

हे कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी आता राजकीय नेत्यांकडून सुरू झालीय.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे म्हणाले, "राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत दखल घेत रुग्णांना मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत ही विनंती"

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्यासाठीचं पत्र राज्यपालांना पाठवलं आहे.

2) शिवसेनेला पुन्हा एनडीएत स्थान मिळण्याची शक्यता मावळली - राम माधव

शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) स्थान मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा झाल्याचं भाजप नेते राम माधव यांनी 'सीएनएन-न्यूज 18' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राम माधव हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

Image copyright Getty Images

संजय राऊत यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आणलं. तोपर्यंत शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यानं मुख्यमंत्रिपदाबाबत चकार शब्द काढला नव्हता, असं राम माधव म्हणाले.

तसंच, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे जोसेफ गोबेल्स असल्याची खोचक टीकाही भाजप नेते राम माधव यांनी केलीय.

3) भाजपनं दोन पावलं मागे येऊन सेनेसोबत तडजोड करावी - आठवले

महाराष्ट्रातील सत्तेच्या वाटपावरून महायुती फिस्कटली आणि शिवसेना-भाजप वेगवेगळे झाले. मात्र, या दोन पक्षांना एकत्रित आणण्यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

Image copyright Twitter

भाजपनेही दोन पावलं मागे येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावी, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय.

शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांची जुनी युती आहे. या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याच प्रयत्न करेन, असंही आठवले म्हणाले. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं.

4) मुंबई महापालिकेतल्या कंत्राटदार कंपन्यांवर छापे

मुंबई महापालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांनावर प्राप्तिकर विभागानं छापे मारले आहेत. या कंत्राटदार कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवला असून, आर्थिक गैरव्यवहार केल्याचं तपासातून समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

Image copyright Getty Images

6 नोव्हेंबरला प्राप्तिकर विभागानं मुंबई आणि सुरतमधील 37 ठिकाणी छापे मारून चौकशीला सुरूवात केली. ही ठिकाणं मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांशी संबंधित आहेत.

मुंबई महापालिकेतल्या कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचं, तसंच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त आणि प्रवक्त्या सुरभी अहलुवालिया यांनी दिली.

5) आतिश तासीर यांच्या समर्थनसाठी जगभरातील 260 लेखक सरसावले

लेखक आणि पत्रकार आतिश अली तासीर यांचं ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड भारत सरकारकडून रद्द करण्यात आलंय. या निर्णयावर भारतानं पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र जगभरातील 260 लेखकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. यात नोबेल विजेते लेखकांचाही समावेश आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

नोबेल विजेते ओरहान पामुक, जे. एम. कोएट्जी, तसेच बुकर विजेते सलमान रश्दी यांच्यासारख्या लेखकांचा पत्र पाठवणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Image copyright Getty Images

OCI कार्डामुळे भारतीय वंशाच्या परदेशी लोकांना भारतात येणं, इथं राहणं आणि काम करण्याचे अधिकार प्राप्त होतात. परंतु अशा व्यक्तीला मतदान करणं आणि कुठलंही संविधानिक पद स्वीकारण्याचे अधिकार नसतात.

आतिश अली तासीर यांचे वडील सलमान तासीर पाकिस्तानचे उदारमतवादी नेते होते. ईशनिंदेच्या कायद्याविरोधात बोलल्यामुळे पाकिस्तानात त्यांच्याच अंगरक्षकानं त्यांच्यावर गोळी घालून हत्या केली होती. भारतातील प्रसिद्ध पत्रकार तवलीन सिंह या तासीर यांच्या आई आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)