पिंक बॉलचं क्रिकेट आणि भारतातली पहिली डे-नाईट टेस्ट : अशी आहे खास

पिंक बॉल, डे-नाईट टेस्ट Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पिंक बॉल

शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यावहिल्या डे-नाईट टेस्टच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमधला नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची इंदूर कसोटी जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जबरदस्त सांघिक प्रदर्शनासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचं वर्चस्व आणखी मजबूत करण्याची संधी विराट सेनेकडे आहे. पिंक बॉल आणि डे-नाईट टेस्ट यासंदर्भातील गोष्टी समजून घेऊया.

पिंक रंग का?

दिवसाउजेडी होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये लाल रंगाचा बॉल वापरला जातो तर वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये पांढऱ्या बॉलचा वापर केला जातो. डे-नाईट टेस्ट काही वेळ सूर्यप्रकाशात आणि बराच वेळ कृत्रिम प्रकाशात खेळवली जाते. खेळाडूंचे कपडे पांढऱ्या रंगाचे असतात. पांढरे कपडे आणि पांढरा बॉल असं होऊ शकत नाही. लाल बॉल कृत्रिम प्रकाशात दिसण्यात अडचण असते. यावर उपाय म्हणून ऑप्टिक यलो आणि नारिंगी रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला. मात्र या दोन रंगांच्या तुलनेत पिंक बॉलची दृश्यमानता अधिक आहे. गवतावर हा बॉल नीट दिसू शकतो तसंच कृत्रिम प्रकाशात बॅट्समनला हा बॉल सहजतेने दिसू शकतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पिंक बॉल आणि डे-नाईट टेस्ट

पिंक बॉल वेगळ्या पद्धतीने बनवला जातो का?

लाल, पांढरा आणि गुलाबी- प्रत्येक क्रिकेट बॉल रबरने बनलेला असतो. डायचा रंग बदलतो आणि फॉरमॅटनुसार फिनिशिंग बदलतं. टेस्ट मॅचमध्ये वापरला जाणारा लाल बॉल ग्रीसमध्ये ठेऊन मग वापरण्यासाठी सज्ज होतो. जेणेकरून पाणी बॉलमधल्या लेदरमध्ये शिरू नये. मात्र डे-नाईट टेस्टसाठी वापरण्यात येणारा पिंक बॉल ग्रिसमध्ये ठेवला जाऊ शकत नाही कारण तसं केलं तर पिंक बॉलची झळाळी निघून जाईल. पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल. फिल्डर, बॅट्समन ,स्टेडियममधील प्रेक्षक तसंच टीव्हीवर मॅच पाहणारे चाहते यांना हा चेंडू नीट दिसत राहतो. मात्र चेंडू पिंक ठेवण्यासाठी एवढा खटाटोप करावा लागत असल्याने टेस्ट मॅच पाच दिवस चालली तर हा बॉल टिकू शकेल का असा प्रश्न निर्माण होतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पिंक बॉल

पिंक बॉलची निर्मिती

टेस्ट खेळणाऱ्या विविध देशांमध्ये तीन कंपन्या बॉल पुरवतात. भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचेसवेळी एसजी कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स कंपनीच्या बॉलचा वापर केला जातो.

अन्य टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये कुकाबुरा कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. भारतातल्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी बीसीसीआयने एसजी कंपनीलाच पिंक बॉल तयार करण्याची जबाबदारी सोपवली.

उत्तर प्रदेशातील मेरठस्थित एसजी कंपनीच्या फॅक्टरीत पिंक बॉलची निर्मिती झाली आहे. डे-नाईट टेस्टसाठी एसजी कंपनीने सहा डझन पिंक बॉल पुरवले आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पिंक बॉल

पिंक बॉलचे गुणधर्म?

वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या बॉलप्रमाणे पिंक बॉलही सपाट होतो. लाल बॉलपेक्षा पिंक बॉल हलका असतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अधिक प्रमाणात स्विंग होतो. पिंक बॉल सॉफ्ट होऊ लागतो तसा स्विंग होणं कमी होत जातं. पिंक बॉल रिव्हर्स स्विंग करणं बॉलर्सला कठीण जातं असा अनुभव आहे. पिंक बॉल खूप वळत नाही असं स्पिनर्सचं म्हणणं आहे. बॉलर्सना मिळणारी मदत कमी होत असल्याने खेळ कंटाळवाणा आणि रटाळ होतो.

पिंक बॉलचा मॅचच्या निकालावर परिणाम?

पिंक बॉलचा वापर होणारे बहुतांश डे-नाईट मॅचेस निकाली होतात असं आकडेवारी सांगते.

बॉलर आणि बॅट्समन दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये स्थित्यंतराचा काळ खेळाडूंसाठी परीक्षा पाहणारा असतो.

नैसर्गिक सूर्याचा प्रकाश कमी होत जातो आणि त्याचवेळी मैदानातील कृत्रिम प्रकाश सुरू होतो. त्यावेळी चेंडूचा सामना करणं अवघड असतं.

दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यात फरक पडतो. तापमान कमी झालं तर बॉल स्विंग होण्याची शक्यता असते. काही शहरांमध्ये रात्र झाल्यावर मैदानावर दव पसरतं.

दवामुळे बॉलर्सना बॉल ग्रिप करायला त्रास होतो. पिंक बॉलची स्थिती नीट राहावी यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवावं लागतं. गवत असेल तर फास्ट बॉलर्सना साहाय्य मिळू शकतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पिंक बॉल

भारतात डे-नाईट टेस्ट किंवा चारदिवसीय मॅचेस झाल्या आहेत का?

तीन वर्षांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सुपर लीगची फायनल डे नाईट झाली होती. यामध्ये पिंक बॉलचा वापर करण्यात आला होता. मोहन बागान आणि भवानीपूर यांच्यात ही मॅच झाली होती.

भारतीय संघाचा भाग असलेले मोहम्मद शमी आणि वृद्धिमान साहा त्या सामन्यात खेळले होते. दुलीप ट्रॉफीच्या काही मॅचेसमध्ये पिंक बॉलचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र कृत्रिम प्रकाशात हा बॉल दिसण्यात अडथळा येत असल्याची तक्रार काही खेळाडूंनी केली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डे नाईट टेस्ट

डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होते?

दिवसभर चालणारी टेस्ट सकाळी साडेनऊला सुरू होते. दोन तासांनंतर लंच होतो. मग दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतो. दोन तासांनंतर चहापानाचं सत्र असतं आणि त्यानंतर दोन तास खेळ होतो.

डे-नाईट टेस्ट दुपारी 1 ते 1.30च्या बेतात सुरू होते. दोन तासानंतर 20 मिनिटांचं चहापानाचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांच्या खेळानंतर सपर म्हणजेच रात्रीच्या भोजनाचं 40 मिनिटांचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांचा खेळ होतो आणि साधारण 9 ते 9.30च्या बेतात खेळ थांबतो. 90 ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डे-नाईट टेस्ट

डे-नाईट टेस्टचं प्रस्थ का वाढतं आहे?

वनडे आणि ट्वेन्टी-20 फॉरमॅटच्या आक्रमणानंतर टेस्ट मॅचेसची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान याचा प्रत्यय आला. टेस्ट मॅच सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.45 या वेळेत पाच दिवस सुरू राहत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग, उद्योजक, महिला वर्ग यांना टेस्ट मॅच स्टेडियममध्ये जाऊन बघणं किंवा टीव्हीवर बघणं कठीण असतं. मात्र डे-नाईट टेस्ट दुपार ते रात्र अशी चालत असल्याने किमान दोन सत्रं अनुभवण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोहम्मद शमी, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली पिंक बॉलसह

भारतात डे-नाईट मॅचेसची सुरुवात कधी झाली?

भारतात पहिली डे-नाईट वनडे 1984 मध्ये झाली होती. पहिली डे-नाईट रणजी मॅच ग्वाल्हेर इथं 1996-97 मध्ये झाली होती. पहिली पिंक बॉल मॅच 2016 मध्ये कॅब सुपर लीग स्पर्धेची फायनल झाली होती. बांगलादेशविरुद्धची दुसरी टेस्ट भारतात होणारी पहिली डे-नाईट टेस्ट असणार आहे.

आतापर्यंतच्या डे-नाईट टेस्ट (पुरुष क्रिकेट)

टीम टीम निकाल ठिकाण कालावधी
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया 3 विकेट्सनी विजयी अॅडलेड 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2015
पाकिस्तान वेस्ट इंडिज पाकिस्तान 56 धावांनी विजयी दुबई 13 ते 17 ऑक्टोबर 2016
ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सनी विजयी अॅडलेड 24 ते 28 नोव्हेंबर 2016
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान ऑस्ट्रेलिया 39 धावांनी विजयी ब्रिस्बेन 15 ते 19 डिसेंबर 2016
इंग्लंड वेस्ट इंडिज इंग्लंड डाव 209 धावांनी विजयी बर्मिंगहॅम 17 ते 21 ऑगस्ट 2017
पाकिस्तान श्रीलंका श्रीलंका 68 धावांनी विजयी दुबई 6 ते 10 ऑक्टोबर 2017
ऑस्ट्रेलिया इंग्लंड ऑस्ट्रेलिया 120 धावांनी विजयी अॅडलेड 2 ते 6 डिसेंबर 2017
दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आफ्रिका डाव 120 धावांनी विजयी पोर्ट एलिझाबेथ 26 ते 29 डिसेंबर 2017
न्यूझीलंड इंग्लंड न्यूझीलंड डाव 49 धावांनी विजयी ऑकलंड 22 ते 26 मार्च 2018
वेस्ट इंडिज श्रीलंका श्रीलंका 4 विकेट्सनी विजयी ब्रिजटाऊन 23 ते 27 जून 2018
ऑस्ट्रेलिया श्रीलंका ऑस्ट्रेलिया डाव 40 धावांनी विजयी ब्रिस्बेन 24 ते 28 जानेवारी 2019

महिला क्रिकेट

टीम टीम निकाल ठिकाण कालावधी
ऑस्ट्रेलिया इंग्लंड अनिर्णित सिडनी 9 ते 12 नोव्हेंबर 2017

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)