राधाबाई राऊत यांना बीबीसी मराठीच्या बातमीनंतर आधार, मुलीचं शिक्षण होणार पूर्ण, घरंही बांधून मिळणार : BBC Impact

राधाबाई राऊत Image copyright BBC/NitinNagarkar
प्रतिमा मथळा राधाबाई राऊत

"तू माझ्या आयुष्याचा कचरा केला, असं मी आईला म्हणायचे. चांगले मार्क्स असतानाही पुढे शिकता येत नव्हतं, म्हणून माझी चिडचिड व्हायची. इच्छा नसतानाही माझ्या तोंडातून असे शब्द निघायचे. आता मात्र मला शिकायला मिळणार आहे, तुमच्या बातमीमुळे माझं शिकायचं स्वप्न पूर्ण होणार आहे," बीबीसी मराठीशी बोलताना अश्विनीचा कंठ भरून आला होता.

अश्विनी ही राधाबाई राऊत यांची मुलगी.

राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर मोठं संकट ओढवलं.

शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केलेल्या राधाबाईंना या पावसामुळे तिहेरी संकटाला सामोरं जावं लागलं. पावसामुळे त्यांच्या शेतातला मका पूर्णपणे सडला, घर खचलं आणि मुलीचं शिक्षणही थांबलं. दीडशे रुपयाच्या मजुरीवर 6 जणांच्या कुटुंबाचा घरखर्च चालवणाऱ्या राधाबाईंची बिकट परिस्थिती बीबीसी मराठीनं आपल्या रिपोर्टमधून मांडली.

तो रिपोर्ट तुम्ही इथं वाचू शकता - 'नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं, घरच खचलं'

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी राधाबाईंना मदत करण्याची इच्छा दर्शवली.

"भाऊ, मी तुमची बातमी जन्मभर विसरणार नाही, मदत झाली आम्हाला त्यामुळे", बातमीनंतर मिळालेल्या प्रतिसादाविषयी राधाबाई सांगत होत्या.

प्रतिमा मथळा राधाबाई राऊत यांचं कुटुंब

त्या म्हणाल्या, "तुम्ही बातमी दिली त्याच दिवशी काही लोक आमच्या घरी येऊन गेले. घराची परिस्थिती पाहिली आणि बाकी सगळी माहिती घेतली. तेव्हापासून काही लोक फोन करून, तर काही लोक घरी येऊन मदत करू म्हणून सांगत आहेत."

"रविवारी (17 नोव्हेंबर) 7 ते 8 जण घरी आले. त्यांनी एका महिन्याचं किराणा सामान आणून दिलं. 3 हजार रुपये घरखर्चाला दिले. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारतो आणि घराचं बांधकाम करून देतो, असंही ते म्हणाले," राधाबाईंनी पुढे सांगितलं.

'आता शिकणार, सीए होणार'

राधाबाईंची मोठी मुलगी अश्विनीला सीए व्हायचं आहे. पण, परिस्थितीमुळे सीएचे क्लासेस लावता येत नाहीत, म्हणून राधाबाई तिच्या लग्नाचा विचार करत होत्या. पण, आता त्या तिला शिकवणार आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
‘आधी शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं’ - पाहा व्हीडिओ

राधाबाई म्हणाल्या, "पोरगी हुशार आहे. कॉलेजात पहिला नंबर आलाय तिचा. पण, दीडशे रुपयांच्या मजुरीत तिला कसं शिकवणार होते? आता मात्र मदत मिळणार आहे. त्यामुळे दीदीला क्लास करू देणार आहे. दीदीचं खूप मोठं टेंशन दूर झालं, तिला सीए बनायचं होतं, आता तिच्या मनासारखं झालं."

प्रतिमा मथळा समाजभान संस्थेची टीम

यानंतर आम्ही अश्विनीशी बोललो, तेव्हा तिनं खूश असल्याचं सांगितलं.

"मी खूप खूश आहे. कारण मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. मला शिकायचं होतं. तू माझ्या आयुष्याचा कचरा केला, असं मी आईला म्हणायचे. कारण, चांगले मार्क्स असतानाही मला पुढे शिकता येत नव्हतं. आता मात्र मला शिकता येणार आहे, सीएचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे," अश्विनी निश्चयानं सांगत होती.

आईला घरखर्चात हातभार लागावा म्हणून 19 वर्षांची अश्विनी सध्या सिल्लोडमध्ये एका दुकानात अकाऊंटट (हिशेबनीस) म्हणून काम करत आहे.

देणारे हात आहेत...

जालन्याच्या समाजभान संस्थेनं 17 नोव्हेंबरला राधाबाईंच्या घरी भेट दिली. या संस्थेनं राधाबाईंच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं आहे.

समाजभान संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षक दादासाहेब थेटे यांनी बीबीसीला सांगितलं, "आमच्या एका मित्रानं आम्हाला बीबीसीनं केलेली राधाबाईंची बातमी पाठवली. तेव्हाच आम्ही राधाबाईंना मदत करायचं ठरवलं. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या गावातल्या आमच्या शिक्षक मित्राशी संपर्क साधला. त्यानं राधाबाईंच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आम्ही गावात आलो आणि या कुटुबांचं पालकत्व स्वीकारलं."

प्रतिमा मथळा राधाबाई राऊत यांचं घर

"आम्ही औरंगाबादमध्ये अश्विनीच्या क्लासची सोय केली आहे. तिथंच तिच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली आहे. राधाबाईंच्या घराचं काम करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करणार आहोत. ते न झाल्यास स्वत: पैसे जमा करून घराचं बांधकाम पूर्ण करणार आहोत," थेटेंनी पुढे सांगितलं.

याच संस्थेशी संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बन्सी कांबळे म्हणाले, "बीबीसी मराठीच्या बातमीमुळे आम्ही राधाबाईंपर्यंत पोहोचलो. बातमीचा या गावात चांगलाच इम्पॅक्ट पडला आहे. या गावात आम्ही गेलो, तेव्हा तिथल्या लोकांच्या दबलेल्या भावना बाहेर निघाल्या. बाहेरचे लोक येऊन मदत करताहेत, तेव्हा आपणही आपल्या गावातील कुटुंबासाठी काहीतरी करायला पाहिजे, असा विचार अनेकांनी व्यक्त केला."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)