शरद पवार: शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेच्या सखोल चर्चा की दबावाचं राजकारण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

"मी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा चर्चा करतील," असं शरद पवार यांनी सांगितलं.

तुम्ही शिवसेनेबरोबर आहात की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, "आम्ही कुणाविरोधात निवडणूक लढवली हे तुम्हाला माहीत आहे."

तुम्ही शिवसेनेबरोबर नाहीत, असं जाहीर का करत नाहीत, यावर ते म्हणाले, "आम्ही काय जाहीर करावं आणि काय नाही हा आमचा प्रश्न आहे."

सोनिया गांधी यांचा शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध आहे म्हणून सत्तास्थापनेला उशीर होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, "सत्तास्थापनेबाबत काहीच बोललो नाहीत. ही बैठक फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतच होती."

कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र दिसून आले, यावर ते म्हणाले, "कोणतीही समन्वय समिती नाही, कोणतीही चर्चा झालेली नाही. आमदार भेटत असतात, चर्चा करतात, यापेक्षा जास्त काही नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्याची आम्ही गोष्ट केलेली नाही. जोवर आम्ही पुढे काय करणार, हे ठरत नाही, तोवर अशी चर्चा करण्यासाठी करणार."

शरद पवारांच्या या उत्तरामुळे शरद पवार दबावाचं राजकारण करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दबावाचं राजकारण?

शरद पवारांना दबावाचं राजकारण करायची गरज नाही, असं मत 'फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "शरद पवारांना दबावाचं राजकारण करायची गरज नाही. कारण, सध्या ज्या आघाडीची चर्चा सुरू आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे शिल्पकार स्वत: शरद पवार आहेत. पवार सांगतील त्याप्रमाणे शिवसेना सत्तेत सहभागी होईल. मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर शिवसेना सत्ता वाटपात एक-दोन खात्यांसाठी अडून बसणार नाही, कारण शिवसेनेकडे दुसरा पर्याय नाही. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे शरद पवार दबावाचं राजकारण करत आहेत, असं वाटत नाही."

Image copyright Getty Images

"सत्तास्थापनेबाबत काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. सत्तास्थापनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्यायचा की, स्वत: सत्तेत सहभागी व्हायचं, याविषयी काँग्रेसनं काहीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे सध्या तरी पवार ठोस काही सांगू शकले नसावेत," चंचुवार सांगतात.

सकाळचे पत्रकार अजय बुवा यांना वाटतं की "सरकार स्थापनेला अजून वेळ लागणार आहे, त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी जो वेळ लागतो, तो घेण्यासाठी पवारांनी असं वक्तव्य केलं असावं. कारण शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही अनैसर्गिक आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचं असेल तर त्यासाठी नेत्यांची तशी मानसिक तयारी करून घेणं गरजेचं आहे आणि पवार ते करत असावेत."मात्र "पवार दबावाचं राजकारण करत आहे, असं वाटत नाही. त्यांचा शिवसेनेवर दबाव असण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रिपद हा शिवसेनेचा एकमेव अजेंडा आहे, आणि त्यांना ते मिळण्याची शक्यता आहे," बुवा पुढे सांगतात.

Image copyright STR

बीबीसी प्रतिनिधी अभिजीत कांबळे यांचं विश्लेषण

पवारांच्या वक्तव्यामागे दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे आघाडीबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. दुसरं म्हणजे अशाप्रकारचं वक्तव्य करून शिवसेनेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. सत्तेत हवा तसा वाटा मिळावा, यासाठी शरद पवार अशाप्रकराचा दबाव निर्माण करायची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची बैठक झाली आहे आणि त्यात कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मसुदाही तयार झाल्याचं माध्यमांमध्ये आलं आहे. असं असताना कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणत असेल, तर त्यांना सध्या या विषयावर बोलायचं नाही, असा याचा अर्थ होतो," असं अभिजीत कांबळे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)