दिवे घाटात दिंडीदरम्यान अपघात, संत नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

वारी
प्रतिमा मथळा वारकरी

आज सकाळी 7.30 दरम्यान दिवे घाटात एका जेसीबीचे ब्रेक फेल झाले. तो जेसीबी नामदेव महाराजांच्या दिंडी सोहळ्यात घुसली आणि या अपघातात दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 17जण जखमी झाले.

जखमींना हडपसर येथील नोबल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सोपान महाराज नामदास (वय 36), अतुल महाराज आळशी (वय 24) या दोन वारकऱ्यांचे निधन झालं आहे. सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज आहेत.

ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीला जात असताना ही घटना घडली आहे. हा दिंडी सोहळा पहाटे घाट माथ्यावर न्याहरीसाठी थांबला होता.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की सकाळी 7 वाजता पुन्हा आळंदीकडे जाण्यास निघाला तेव्हा ब्रेक निकामी झालेला एक जेसीबी रिक्षा आणि इतर वाहनांना धडकत दिंडीत घुसला.

प्रतिमा मथळा वारीदरम्यान अपघात

प्रत्यक्षदर्शी राहुल बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी याच जेसीबी चालकाला सल्ला दिला होता की ब्रेक निकामी झाल्यामुळे त्याने तो जेसीबी खाली घेऊन जाऊ नये. त्यांनी अपघात होण्याची शक्यताही वर्तविली होती.

दिंडी सोहळा दिवे घाटाच्या मध्यावर आला असताना हाच जेसीबी सोहळ्यात घुसला आणि यात दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याचं बंडगर याने सांगितलं.

पुण्याच्या नोबल हॉस्पिटल येथे बंडा महाराज कऱ्हाडकर यांनी भेट दिली.या दिंडी सोहळ्याला पोलिस बंदोबस्त नव्हता, संजीवन समाधी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या कमी असते म्हणून दिंड्याना पोलिस बंदोबस्त दिला जात नसल्याचं कऱ्हाडकर म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)