तानाजी: कोंढाण्याची गोष्ट, जेव्हा 'गड आला पण सिंह गेला' होता...

तानाजीची भूमिका अजय देवगण साकारतोय Image copyright Universal PR
प्रतिमा मथळा तानाजीची भूमिका अजय देवगण साकारतोय

रात्रीची वेळ होती. तानाजी आणि त्याचे मावळे कोंढाण्याच्या कड्याच्या पायथ्याच्या काळोखाशी उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे पाच सहा मावळे कोंढाण्याचा कडा चढायला पुढे झाले. कडा अतिशय उंच होता. तरी ते कपारीस धरून, कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर कडा चढून गेले.

इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकातला हा परिच्छेद आता आठवण्याचं कारण म्हणजे कोंढाण्याच्या लढाईवर बेतलेला 'तानाजी' हा येऊ घातलेला सिनेमा.

'आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे' या शब्दांत तानाजी मालुसरे या योद्ध्याने आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहीम हाती घेतली होती. 4 फेब्रुवारी 1670 ला पार पडलेल्या या मोहिमेत तानाजी मालुसरेंसमोर आवाहन होतं ते राजपूत सैनिक उदेभान राठोडचं.

या मोहिमेची रंजक पार्श्वभूमी दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात - "आज सिंहगड नावाने ओळखला जाणार कोंढाणा किल्ला पुरंदरच्या तहानंतर 1665 साली मुघलांना दिला होता. या तहात 23 किल्ले मुघलांना दिले होते.

"कोंढाणा पुण्याकडे तोंड करून होता. प्रत्येक शहराचा एक किल्ला होता. शिवाजी महाराजांना तो किल्ला परत हवा होता. ही जबाबदारी त्यांनी तानाजी मालुसरेंकडे सोपवली. हा तह झाल्यानंतर ते आग्र्याला गेले होते आणि तिथून पलायन केलं. तिथून आल्यावर शिवाजी तहाविरोधात बंड पुकारलं आणि त्यांना हा किल्ला परत हवा होता.

"हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. धोरणात्मकदृष्ट्या सुद्धा तो अतिशय महत्त्वाचा होता. उदेभान राठोड नावाचा राजपूत सेनापती तेव्हा किल्ल्याचं रक्षण करत होता. तानाजी मालुसरेबरोबर त्याचा भाऊ सूर्याची मालुसरेसुद्धा होता," ते पुढे सांगतात.

आजच्या पुणे शहरापासून नैऋत्येस 20 किमीवर हवेली तालुक्यात वसला आहे. कोंढाणा, बक्षिंदाबक्ष, सिंहगड अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जायचा. या किल्ल्यात पुणे डोणजे आणि कल्याण अशी दोन मुख्य द्वारं आहेत.

या लढाईचा किस्सा बालभारतीच्या शालेय पुस्तकात सांगण्यात आला आहे. त्यानुसार, तानाजीने किल्ल्यावर चाल करताच सूर्याजीने त्याच्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची वाट पाहू लागला. लढाईला सुरुवात झाली. उदेभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. मावळ्यांना कल्याण दरवाजा उघडला.

तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची निकराची लढाई सुरू असतानाच तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला, शेल्यावर वार झेलच तो लढू लागला. ते दोघंही जबर जखमी झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला.

Image copyright Universal PR
प्रतिमा मथळा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर आहे

तानाजींचा लढाईच्या सुरुवातीलाच मृत्यू झाल्यांचं देशपांडे सांगतात. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी आणि त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत पोहोचले. भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दु:ख झाले. पण ती वेळ दु:ख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, "अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही इथे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारा नाहीतर नाहीतर शत्रूवर तुटून पडा."

Image copyright Universal PR
प्रतिमा मथळा उदेभानची भूमिका सैफ अली खान करतो आहे.

त्यांनंतर मराठा सैनिकांनी लढा देत हा गड काबीज केला. या लढाईत तानाजीला जीव गमवावा दुःख शिवाजी महाराजांनाही झालं आणि तेव्हा त्यांन उद्गार काढले 'गड आला पण सिंह गेला'.

घोरपडीचा वाद

या मोहिमेबाबत आणखी एक प्रचलित किस्सा होता तो म्हणजे घोरपडीचा.

मराठा सैन्याने कोंढाण्याची कपार चढण्यासाठी घोरपडीचा वापर केला, अशी एक कथा सांगितली जाते. घोरपडीचा आकार पाहिला तर तितकीशी मोठी नसते. आणि तिला प्रशिक्षण देता येत नाही. जास्तीत जास्त तिला फक्त एक दोरी बांधता येऊ शकते. त्यामुळे ती किल्ल्याची भिंत चढू शकते आणि तेव्हा तिचा किंवा त्या दोरीचा ताबा एखादी व्यक्ती घेऊ शकते. त्याचा आधार घेऊन व्यक्ती किल्ल्याची भिंत चढू शकते, हे मिथक असल्याचं स्पष्ट आहे, असं दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक डॉ.अनिरुद्ध देशपांडे सांगतात.

स्टीवर्ट गॉर्डन यांनी लिहिलेल्या 'मराठा' या पुस्तकात देखील तानाजींनी दोरीच्या आधाराने कोंढाणा सर केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे घोरपडीच्या गोष्टीत तथ्य नाही.

उलट, मराठा सैनिकांना किल्ल्यातल्याच एखाद्या सैनिकाने दोरी टाकून किल्ला चढण्यास मदत केल्याची शक्यता डॉ. देशपांडे वर्तवतात.

Image copyright Rohit Khare
प्रतिमा मथळा आजचा सिंहगड किल्ला

कोंढाण्याचा सिंहगड झाल्यावर..

तानाजी मालुसरेंनी हा गड काबीज केल्यानंतर त्याला सिंहगड असं नाव मिळालं. आजही हा सिंहगड हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात की ज्याच्या ताब्यात सिंहगड, त्याच्या ताब्यात पुणे, हे सरळसोट तत्त्व शिवाजी महाराजांच्या काळात प्रचलित होतं. त्यामुळे सिंहगडाचं महत्त्व ऐतिहासिक आहे.

शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब दक्षिणेच्या स्वारीवर आला आणि त्याने हा किल्ला काबीज केला. नंतर 1693 मध्ये नावजी बलकवडे या मराठा सरदाराने तानाजी मालुसरेंसारखाच निकराचा लढा देत हा गड काबीज केला. नंतर एखादा अपवाद वगळता तो 1750 पर्यंत चिमाजी नारायण सचिव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. छत्रपती राजारामचा मृत झाल्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी लढा देत, हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)