'वैचारिक दहशतवादा'बद्दल बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद

रामदेव बाबा Image copyright Getty Images

बाबा रामदेव यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकीकडे #BycottPatanjaliProducts #ArrestRamdev हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत, तर दुसरीकडे #BabaRamdev #WeSupportPatanjaliProducts हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

प्रकरण काय?

11 नोव्हेंबरला रिपब्लिक टीव्ही या चॅलेनशी बोलताना बाबा रामदेव यांनी एक वक्तव्य केलं होतं.

बाबा रामदेव म्हणाले, "ईश्वर मानणारे मूर्ख असतात, असं म्हणणाऱ्या पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही पटतात, पण त्यांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत आहे, मी याला वैचारिक दहशतवाद असं नाव दिलं आहे."

"मी दलितांमध्ये भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशाप्रकारचं लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवं," असंही ते पुढे म्हणाले.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकीकडे #BycottPatanjaliProducts #ArrestRamdev हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत, तर दुसरीकडे #BabaRamdev #WeSupportPatanjaliProducts हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

अनेकांना त्यांचं विधान पटलेलं नाही तर काहीजण मात्र बाबा रामदेव यांच्या या विधानाचं समर्थन करताना दिसत आहेत.

सुनिल कपूर यांनी ट्वीटरवर म्हटलंय, "बाबा रामदेव देशासाठी काम करत आहेत. ते योगाचा प्रचार करत आहेत. तसंच धार्मिक एकोपा निर्माण करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे."

Image copyright Twitter

एरिवळी गणेशन यांनी लिहिलंय की, "पेरियार कोट्यवधी दलितांच्या कल्याणासाठी काम केलं. ते तामिळनाडूसाठी देव आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची बाबा रामदेव यांची पात्रता नाही."

Image copyright Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप

पेरियार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेव बाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केली आहे.

आव्हाड यांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ट्वीटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला.

"देशात ज्या काळामध्ये मनुवाद्यांची चातुर्वर्ण्य वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती, त्या काळात या दोन महानायकांनी त्याविरूद्ध लढा दिला. त्यांना वैचारिक दहशतवाद म्हणणाऱ्यानं एकतर माफी मागावी, नाहीतर त्यांना महाराष्ट्रात पायदेखील ठेऊ देणार नाही," असं या व्हीडिओत म्हणताना दिसत आहेत.

"या देशातील स्त्रिया तसंच तत्कालीन मनुवाद्यांनी ठरवलेला क्षुद्र वर्ग, ओबीसी, एसी, एसटी, व्हीजेएनटी, कामगार यांच्यासाठीची आर्थिक धोरणं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अधोरेखित झाली. ते एका जातीचे नव्हे तर, संपूर्ण भारतीय समाजाचे होते. जे संविधान तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवतं, ते बाबासाहेबांनीच दिलं आहे. पेरियार रामास्वामी यांनी जाती निर्मूलनाचं काम केलं. त्यामुळेच रामदेवबाबांनी शहाणपणा दाखवून माफी मागावी," असंही ते पुढे म्हणाले.

पेरियार रामास्वामी कोण होते?

तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कम्युनिस्ट ते दलित चळवळ तसंच तामिळ राष्ट्रवादी ते पुरोगामी चळवळी अशा विविध विचारप्रवाहांचं ते प्रेरणास्थान तसंच मार्गदर्शक ठरले आहेत.

Image copyright dhilepan ramakrishnam
प्रतिमा मथळा पेरियार यांनी अनेक अमानुष सामाजिक प्रथांविरोधात आवाज उठवला.

बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

महिलांच्या हक्कासाठी आयोजित परिषदेतच त्यांना पेरियार (महान) ही बिरुदावली मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)