काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर सहमती, आता शिवसेनेशी मुंबईत चर्चा

शरद पवार Image copyright Getty Images

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील चर्चा संपली असून आता शिवसेनेशी मुंबईत चर्चा करणार आहेत. त्यानंतर हा संपूर्ण मसुदा आणि युतीच्या रचनेविषयी माहिती देणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

ते म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्या या चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा सहमती झाली असल्याची माहिती काल पृथ्वीराज चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या आघाडीचे फायदे तोटे काय होतील?

या नव्या सत्तासमीकरणाचे काय फायदे तोटे होतील याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले की, "महाराष्ट्रात ही आघाडी होऊ घातली आहे त्याकडे राज्यपातळीवर बघता कामा नये. हे असं मॉडेल तयार होऊ शकतं हे भारतातील इतर पक्षांनीही लक्षात घ्यायला हवं. ज्या पक्षांनी एकमेकांना कधीही सहकार्य केलं नाही अशा भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा हा प्रयोग महाराष्ट्रातील या युतीतून सुरू होऊ शकतो. काँग्रेस एकट्याने भाजपचा मुकाबला करू शकत नसेल किंवा छोटे राजकीय पक्ष ते करू शकत नसतील तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल."

ज्या स्थानिक पक्षांना भाजपाविरोधात जायची इच्छा आहे त्यांच्याशी काँग्रेस आघाडी करायची मानसिक तयारी करू शकेल. त्याचं कारण काँग्रेस पक्ष आघाडांच्या बाबतीत हातचं राखून असतो. त्यामुळे काँग्रेसच्या या प्रयोगामुळे एक अनुभव येऊ शकतो असंही ते पुढे म्हणाले.

त्यामुळे आता या चर्चा कोणतं वळण घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)