बीएचयू : 'संस्कृतवरून उद्भवलेला वाद भारतीयांचे तालिबनायझेशन करण्याचा प्रयत्न'

हिंदुत्व

सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी मानवी समाज विचारांच्या अभिव्यक्तीसाठी भाषेचा उपयोग करू लागला. आपल्याला माहित असलेले धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनांचा उगम मात्र दोन तीन हजार वर्षापासूनच आहे.

म्हणजेच भाषा आणि धर्म यांचा कोणताही तार्किक संबंध नसतो. जगात आज सुमारे 6000 भाषा बोलल्या जातात. महत्वाच्या धर्मांची संख्या मात्र 30 पेक्षा जास्त नाही. त्यामुळे कोणताही एक धर्म आणि त्याची नियत भाषा हे समीकरण वास्तवास धरून नाही.

के एस सिंग यांनी 1980च्या दशकात भारतातल्या जाती-जमाती व सामाजिक समुदायांची पाहणी करून त्यावर आधारित द पीपल ऑफ इंडिया ही ग्रंथमालिका प्रकाशित केली. त्यात भारतात जवळपास 4000 जाती-जमाती आणि समुदाय अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. भारतातील प्रमुख धर्म विचारात घेतल्यास त्यापैकी कोणत्याही विशिष्ट महत्वाच्या धर्माचे अनुसरण करणाऱ्या किमान 500हून अधिक जाती जमाती आढळून येतात.

त्यामुळे कोणताही धर्म केवळ एकाच समुदायपुरता मर्यादित नाही हे स्पष्ट झालं. तार्किक पद्धतीने पहिल्यास कोणत्याही विशिष्ट भाषेचा एका विशिष्ट धर्मांबरोबर किंवा सामाजिक समुदायाबरोबर तार्किकदृष्ट्या परस्पर संबंध नसतो. असे परस्पर संबंध असलेच तर ते काही विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीने निर्माण होतात.

ख्रिस्ती धर्माची भाषा हिब्रू, लॅटिन, इंग्लिश, इटालियन, फ्रेंच, पोर्तुगीज यापैकी नक्की कोणती हे सांगणं कठीण आहे. इटालियन भाषिक जर म्हणू लागले की फ्रेंच भाषिकांनी ख्रिस्ती धर्मावर भाष्य करू नये तर तो दावा हास्यास्पद ठरेल.

बौद्ध धर्माची नेमकी भाषा पाली आहे की चिनी की जपानी हे सांगणं कठीण आहे. धर्म हा अधिभौतिक रहस्यांविषयीचा विचार असतो. भाषा ही संवादाचं माध्यम असते. एखाद्या विशिष्ट धर्माच्या कल्पना वेगवेगळ्या भाषेत सर्वपरीने मांडता येऊ शकतात. भाषेचा वापर विविध क्षेत्रात होत असतो.

Image copyright Firoz Khan

शिक्षण, विचार, साहित्य, कला शास्त्र, वाणिज्य, व्यापार, शासन, क्रीडा, मनोरंजन अशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात एखादी विशिष्ट भाषा वापरायची असते. समजा संस्कृतसारखी एखादी भाषा व्यापारात वापरायची झाली, तर कोणीही शहाणा माणूस त्या व्यापार संबंधात ख्रिस्ती, ज्यू, बौद्ध असे लोक टाळून व्यापार करण्याचा मूर्खपणा करणार नाही.

आयुर्वेद विषयक मूळ सिद्धांत संस्कृत मध्ये असले तरीही कोणीही आयुर्वेदाचा डॉक्टर त्याचा वापर मुसलमान किंवा ख्रिस्ती रुग्णावर करायचा नाही असा हट्ट धरणार नाही. एखाद्या शाळेच्या वर्गात रशियन किंवा चिनी भाषा शिकवायची झाली तर कोणताही शिक्षक वर्गातील सगळे विद्यार्थी कम्युनिस्ट विचारसरणीचे असायला पाहिजेत असा आग्रह धरणार नाही. अगदी त्याचप्रमाणे संस्कृत भाषा शिकवणारा प्राध्यापक मात्र हिंदू धर्माचा असायला पाहिजे असा आग्रह संपूर्णपणे हास्यास्पद ठरेल. असा अनाठायी आणि अतार्किक आग्रह हास्यास्पद तर आहेच पण तो अज्ञानावर आधारितही आहे.

संस्कृत भाषेच्या इतिहासात चार्वाकासारखे जे संपूर्णपणे निरीश्वरवादी आहेत आणि हिंदू श्रद्धा-परंपरांना ज्यांनी मोठं आव्हान दिलं होतं त्यांनीही भर घातली आहे. अश्वघोषाच्या बुद्धचरित या ग्रंथाचं संस्कृत साहित्य इतिहासात फार मानाचे स्थान आहे. अश्वघोष बुद्धाचा अनुयायी होता म्हणून तो मान कधी कमी लेखण्यात आला नाही.

फ्रेडरिक मॅक्सम्युलरने द सॅक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या जगभर ऐतिहासिक मानल्या गेलेल्या ग्रंथमालिकेत ऋग्वेद सर्वप्रथम मुद्रित स्वरूपात आणला. मॅक्सम्युलर हिंदू नव्हता पण म्हणून तो मुद्रित ग्रंथ कोणत्याही हिंदू विचारवंतांनी नाकारला नाही.

प्रतिमा मथळा बीएचयूच्या विद्यार्थ्यांनी लावलेले पोस्टर

स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद यांनी मॅक्सम्युलरच्या ग्रंथाचे वाचन करून त्यावर भाष्यही केले. तो हिंदू नसल्याने त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास करू नये असा मानसिक विकृतीचा हट्ट त्यांनी धरला नाही. जे हिंदूखेरीज कोणीच संस्कृतचा अभ्यास करू शकत नाहीत असं म्हणतात ते कोणत्यातरी मानसिक विकृतीने ग्रस्त आहेत असं म्हणावं लागेल.

सध्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात सुरु असलेल्या चर्चेत फिरोझ नावाच्या संस्कृतच्या अभ्यासकास संस्कृत शिकवू न देण्याविषयीची कॅम्पेन एका खास मानसिक विकृतीची लक्षणं दर्शिवणारी आहे. खरंतर भारतीय संविधान स्वीकारल्यावर असा आग्रह संविधानबाह्य ठरतो आणि शिक्षेला पात्र होतो.

सध्याचं उत्तर प्रदेश सरकार संविधानाला कितपत जुमानते हा प्रश्न वेगळा. हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनकही आहे. फक्त भाषाशास्त्राच्या तार्किक अंगाने पाहिल्यास मुस्लिम आणि संस्कृत यांच्यात विरोधाभास दाखवणारी चर्चा पूर्णपणे हास्यास्पद आहे.

ज्या मध्ययुगीन काळाला आपण पूर्णपणे 'स्थितीशील आणि अंधारमय' मानतो, त्या मध्ययुगीन काळातही ही चर्चा मूर्खपणाची आणि हास्यास्पद ठरली असती.

Image copyright Getty Images

21व्या शतकात तिला कोणतेही स्थान मिळणे म्हणजे संस्कृत भाषेला वेठीला धरून भारतीय समाजमनाचे तालिबनायझेशन करण्याचा विघातक उपद्व्याप आहे. हा संपूर्ण प्रकार बीएचयूमध्ये घडावा ही खेदाची बाब आहे. बीएचयूने गेल्या आठ-नऊ दशकात संस्कृत संशोधनात मोलाची भर घातली आहे. सध्याचा अनाठायी विवाद त्या स्पृहणीय इतिहासाला बट्टा लावणारा आहे.

(वरील लेखातली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)