उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही : शरद पवार : LIVE

महाविकास आघाडी

मुंबईत आत्ता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक नुकतीच संपली आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, संजय राऊत असे तिन्ही पक्षांचे मातब्बर नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनायला हवं याबद्दल कोणाचंच दुमत नाही. पण अजूनही काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा सुरु आहे. उद्या या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल," असं शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही असं ठरवलं आहे की एकही मुद्दा अनुत्तरित ठेवायचा नाही. पहिल्यांदाच एकत्र नेते बसले आहे. बैठक अजून चालू आहे. जे छोटे बारकावे आहेत त्याबद्दलही चर्चा सुरू आहे. म्हणून सगळे विषय सोडवल्यावर आम्ही तुमच्यासमोर येऊ. याबाबतीत पत्रकार परिषद होईल. सगळ्या गोष्टी सोडवून आम्ही तुमच्यासमोर येऊ. आम्हाला प्रश्न कोणताही प्रश्न अनिर्णित ठेवायचा नाही."

या बैठकीमध्ये आज अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन सत्तास्थापनेच्या अनेक मुद्द्यांवर सहमती झालेली आहे, असंही पवार बोलताना म्हणाले.

याबद्दल अधिक बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस आणि एनसीपी यांची चर्चा दिल्लीतच झाली होती. आज तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. ती सकारात्मक झाली. काही गोष्टी राहिल्या आहेत. आम्ही उद्याही चर्चा सुरू ठेवू. जेव्हा सगळ्या मुद्दयांवर चर्चा होईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ. चर्चा सकारात्मक झाली आहे."  

आज सकाळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली.

सगळ्या आमदारांना मुंबईत राहाण्याच्या सुचना दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंनी आमदारांना सुचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी यांनी माध्यमांशी बोलतान सांगितलं.

या बैठकी आधी काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. दोन्ही पक्षातील चर्चा संपली असून आता आम्ही शिवसेनेशी मुंबईत चर्चा करणार आहेत. त्यानंतर हा संपूर्ण मसुदा आणि युतीच्या रचनेविषयी माहिती देणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

ते म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्या या चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा सहमती झाली असल्याची माहिती काल पृथ्वीराज चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान, तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये होणार आहे. तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

मात्र भाजप नेते नितीन गडकरी यांनी या तिन्ही पक्षांनी स्थापन केलेलं सरकार टिकणार नाही असं वक्तव्य केलं आहे.

भाजपबरोबर जाऊन शिवसेना बिघडली होती - मलिक

"शिवसेनेची निर्मिती धर्माच्या नावावर झाली नव्हती, भाजप बरोबर जाऊन हा पक्ष बिघडला होता," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

अजूनपर्यंत मुख्यमंत्री आणि इतर पदांवर कुठलाही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

तसंच शिवसेना स्वाभिमान गहाण ठेवून भाजपबरोबर आता जाणार नाही, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही बातम्या पेरल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आम्ही जनमताचा अनादर केलेला नाही - भाजप

भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येतील की नाही हे येणारा काळच ठरवेल, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

"मतदारांनी शिवसेना आणि भाजपला एकत्र कौल दिला होता, भाजप-शिवसेनेचंच सरकार व्हावं असंच लोकांना वाटतं. पण तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार बनतंय त्याची विचारधारा वेगवेगळी आहे, पुढे पाहूया लोक काय प्रतिक्रिया देतात ते. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नाही," असं दानवे यांनी म्हटलं आहे.

पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री - संजय राऊत

पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, त्यावर तिन्ही पक्षांची सहमती आहे. कुणी वेगळी ऑफर दिली असेल तर त्यांचा सेल संपलेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

आता कुणी इंद्राचं आसन दिलं तर ते आम्हाला नको, असं त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरच्या चर्चेच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय.

"मी शिवसैनिक म्हणून काम केलं आहे, सर्वांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं," असं राऊत यांनी त्यांच्या नावाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत उत्तर देताना म्हटलंय.

शिवसेना आमदारांची बैठक

शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सहमती झाल्यानंतर आज अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रित पाऊल टाकलं तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

Image copyright Getty Images

रात्री उशीरा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 10 वाजता शिवससेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये शिवसेनेने स्वतःसाठी मुख्यमंत्रिपद आणि दोन्ही काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रिपदं देण्याचा फॉर्म्युला सुचवल्याचं प्रसिद्ध झालं होतं.

Image copyright Getty Images

तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दोनच जागांचे अंतर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही हवे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीची अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने दिल्याचं सांगण्यात येतं होतं. त्यावर शिवसेनेने आतापर्यंत स्पष्ट प्रतिसाद दिलेला नव्हता.

गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मागणी होत असल्याचं आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)