नित्यानंद स्वामी: सूर्योदय थांबवण्याचा दावा करणारे वादग्रस्त गुरू

नित्यानंद स्वामी Image copyright YouTube

एकेकाळी सेक्स सीडीच्या प्रकरणात अडकलेले दक्षिण भारतातले 'स्वामी' नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

स्वामी नित्यानंद यांनी दक्षिण अमेरिका खंडातील इक्वाडोरमध्ये खासगी भूखंड खरेदी केला आहे. 'कैलास' असं या भूखंडाचं नाव ठेवण्यात आलंय. नित्यानंद यांनी या भूखंडाला 'हिंदूराष्ट्र' म्हटलंय.

'महान हिंदूराष्ट्र कैलासा'साठी देणग्यांचं आवाहनही नित्यानंद यांनी वेबसाईटवरून केलं आहे.

स्वत:ला ईश्वराचा अवतार मानणाऱ्या नित्यानंदांवर दोन मुलींच्या कथित अपहरणाचा आणि त्यांना कैद करण्याचा आरोप आहे. या प्रकरणी अहमदाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात नित्यानंद यांच्या 'सर्वाज्ञपीठम' आश्रमातील प्राणप्रिया आणि तत्त्वप्रिया या दोन संचालिकांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात बालमजुरी, अपहरण, आणि छळवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती चौकशी अधिकारी के. टी. कमारिया यांनी दिली होती.

2016 मध्ये हे प्रकरण उजेडात आलं. त्यानंतर नित्यानंद फरार आहेत. ते भारतात आहेत की परदेशात याबाबत चौकशी सुरू आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

बेपत्ता मुलींच्या पालकांकडून गुजरात उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या पालकांच्या मते 2012 मध्ये नित्यानंद यांच्या शैक्षणिक आश्रमाकडून एका शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या चार मुलींना पाठवलं होतं. तेव्हा त्यांचं वय सात ते पंधराच्या दरम्यान होतं.

त्यानंतर या मुलींना अहमदाबादच्या आश्रमात परस्पर पाठवण्यात आल्याचा आरोप या दाम्पत्यानं केला.

Image copyright Bhargav Parikh

ही शाखा अहमदाबाद मधील दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये आहे. पोलिसांच्या मदतीने जेव्हा त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी हे दाम्पत्य गेलं, तेव्हा आश्रमात फक्त दोनच मुली आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. इतर दोन मुलींनी तिथे जाण्यास नकार दिला होता.

त्यांच्या मुलींचं अपहरण झालं असून त्यांना बेकायदेशीर पद्धतीने डांबून ठेवल्याचा आरोप या दांपत्याने केला.

नित्यानंद आणि त्यांच्याशी निगडीत वाद

2010 मध्ये त्यांच्याविरुद्ध अश्लीलता आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची एक कथित सेक्स सीडीही समोर आली होती. या कथित सीडीमध्ये ते दक्षिण भारतीय अभिनेत्रीबरोबर आपत्तीजनक स्थितीत दिसले होते.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जेव्हा तपासणी झाली तेव्हा ही सीडी खरी असल्याचं आढळलं. माज्ञ नित्यानंदाच्या आश्रमाने भारतात झालेली तपासणी चुकीची असून अमेरिकेतल्या प्रयोगशाळेतल्या तपासणीचा हवाला दिला. त्यात सीडीबरोबर छेडछाड झाल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणी नित्यानंदांना अटक करण्यात आली. मात्र काही दिवसातच ते जामीनावर बाहेर आले. याशिवाय बंगळुरूमधील त्यांच्या आश्रमात एकदा धाड पडली होती. या धाडीत कंडोमची अनेक पाकिटं आणि गांजा जप्त करण्यात आला होता.

2012 मध्ये नित्यानंदांवर बलात्काराचेही आरोप झाले होते. याप्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या वादानंतर ते फरार झाले होते. मात्र पाच दिवसांनी त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलं.

ते फरार असताना पोलिसांनी त्यांच्या आश्रमाची तपासणी केली होती. त्यावेळी नित्यानंदांनी त्यांच्या अनुयायीबरोबर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली होती.

Image copyright Getty Images

याशिवाय अनेक वादांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं, की ते माकडांना आणि इतर काही प्राण्यांना संस्कृत आणि तामिळ बोलायला शिकवू शकतात.

त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईनच्या सिद्धांताला आव्हान दिलं होतं. त्यांच्या मते आईनस्टाईनचा सिद्धांत चुकीचा आहे. त्यांनंतर ते ट्रोल झाले होते.

एकदा तर आपण सूर्यालाही 40 मिनिटं उगवण्यापासून थांबवलं होतं, असा दावा त्यांनी केला होता. हा व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका प्रवचनात त्यांनी भूतांशी मैत्री केल्याचा दावा केला होता.

एका बाजूला वैज्ञानिक मंगळावर जीवसृष्टी शोधत आहेत. तर एका बाजूला ग्रहावर जीवसृष्टी आहे आणि ते धरतीवर शैक्षणिक सहलीसाठी येतात आहे.

नित्यानंदांच्या अशा दाव्यांची यादी खूप मोठी आहे. त्यातला एक दावा त्यांना भिंतींच्या पलीकडे सगळं दिसतं असाही आहे.

नित्यानंदांना मानणाऱ्यांची संख्या हजारांमध्ये आहे. त्यांचे अनुयायी केवळ भारतात नाहीत. त्यांना मानणारे लोक परदेशातही आहेत. त्यांनी 500 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे.

नित्यानंदांचा अल्पपरिचय

नित्यानंदांचे हजारोंच्या संख्येने अनुयायी आहेत मात्र आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी नकार दिला. मूळचे तामिळनाडूचे असलेल्या नित्यानंदांनी स्वत: देव असल्याचा दावा केला आहे.

त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार यूट्यूबवर त्यांचे 18 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहे. त्यांनी 27 भाषांमध्ये 500 पुस्तकं लिहिण्याचा दावा केला आहे. यूट्यूबवर पाहिले जाणारे सगळ्यात लोकप्रिय आध्यात्मिक गुरू असल्याचा दावाही ते करतात.

Image copyright Bhargav Parikh

वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 1 जानेवारी 1978 ला झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अरुणाचलम आणि आईचं नाव लोकनायकी आहे. त्यांचं बालपणीचं नाव राजशेखरन होतं. धार्मिक कार्याची आवड त्यांच्या आजोबांमुळे लागली. तेच त्यांचे पहिले गुरू होते.

शिक्षण

त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण 1995 मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर 12 वर्षांनी असताना त्यांनी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरूवात केली.

नित्यानंद ध्यानपीठम या त्यांच्या पहिल्या आश्रमाची स्थापना 1 जानेवारी 2003 मध्ये बंगळुरूजवळ बिदादी येथे झाली.

अहमदाबादमध्ये असलेला त्यांचा आश्रम याच आश्रमाची एक शाखा आहे. तिथूनच मुली गायब झाल्याच्या प्रकरणात खटला दाखल केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)