देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक आता तोंड वर काढतील का?

महाराष्ट्रात भाजपनं सर्वाधिक जागा मिळवूनही पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेनेसोबतच्या वादाचा भाजपला फटका बसला.
भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करता आली नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. याची सुरुवात भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासूनच झाली आहे.
- किमान समान कार्यक्रमाच्या मराठी मसुद्यातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द का वगळला?
- उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून लोकांच्या या आहेत 4 प्रमुख अपेक्षा
बीबीसी मराठीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचं जनमानसात चित्र आहे. सगळ्यांचं सहकार्य लागतं. सर्वांनी एकत्र काम केल्यास पक्षाला बळ मिळतं. पण दुर्दैवानं या निवडणुकीत अनेक वर्षे काम करणाऱ्यांना तिकीट दिलं गेलं नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जनमानसावर झाला.
एकनाथ खडसे यांची नाराजी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून वारंवार दिसून आली आहे. त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे भाजपच्या राज्य नेतृत्त्वावर म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना तिकीटही देण्यात आलं नाही. खडसेंप्रमाणे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारलं गेलं.
गेल्या काही महिन्यांमधील या घडामोडी आणि त्यात राज्यातील सत्ता राखण्यातही भाजपला आलेलं अपयश पाहता, देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक पुन्हा तोंड वर काढतील का, हा प्रश्न चर्चेत आलाय.
देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर गेल्यानं पक्षांतर्गत म्हणजेच राज्य भाजपमधील विरोधकांनी डोकं वर काढण्यास सुरूवात झालीय, असं मत महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहय्यक संपादक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
विजय चोरमारे पुढे म्हणाले, "एकनाथ खडसे यांनी फडणवीसांविरोधात आवाज उठवलेला आहे. हे लक्षात घेता फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत विरोध सुरू होईल. आज एकनाथ खडसे यांनी तोफ डागलीय. हळूहळू चंद्रशेखर बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील किंवा इतर मंत्रिपदं उपभोगलेले लोक फडणवीसांमुळं कसं सरकार गेलं, ते सांगायला सुरुवात करतील."
याबाबत वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनीही सहमती दर्शवत बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक नक्कीच डोकं वर काढतील.
"भाजपचा कारभार आणि सरकारचा कारभार संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतला होता. त्यामुळं मंत्री, स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्ये कुठंतरी राग धुमसत होता. फडणवीसांच्या वर्तुळात पक्षाच्या बाहेरून आलेली मंडळी होती," असं धवल कुलकर्णी म्हणतात.
तसेच, "पक्षाचे मूळ निष्ठावंत, आरएसएसच्या केडरमध्ये या सर्व गोष्टींचा राग होता. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलं. प्रकाश मेहतांचंही तसेच झालं. मुक्ताईनगरमधून खडसेंना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या मुलीचं म्हणजेच रोहिणी खडसेंचा झालेला पराभव आहे. पंकजा मुंडेंचा झालेला पराभव आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना तिकीट नाकरलं गेलं. यात लक्षणीय गोष्ट म्हणजे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात. त्यामुळं यशाचे अनेक बाप असतात, अपयश बेवारस असतं, या न्यायानं पराभवाचं खापर फडणवीसांच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न होईल," असं धवल कुलकर्णी म्हणतात.
फडणवीसांवर अपयशाचं खापर फोडून पक्षांतर्गत विरोध होऊ शकेल का, याबाबत कट्टा न्यूजचे संपादक सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "ज्या यश येतं, तेव्हा सगळे सांगत असतात की हे मी काम केलंय. पण अपयश येतं तेव्हा त्या संघटनेच्या प्रमुखावर खापर फोडलं जातं. ते फडणवीसांवर फोडण्याचा प्रयत्न होईलच."
तसेच, फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षांतर्गत जी चिड साचताना दिसली, त्याचा स्फोट महाराष्ट्र भाजपमध्ये झाल्यास नवल वाटायला नको, असंही धवल कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
- छगन भुजबळ: तुरुंगवारी ते कॅबिनेटमंत्रिपदापर्यंतचा प्रवास
- अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री, पण आज शपथ नाही - नवाब मलिक
- शिवाजी पार्क शिवसेनेसाठी 'शिवतीर्थ' कसं आणि कधी झालं?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)