उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी योग्य की अयोग्य?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या आणि मंत्र्यांच्या शपथविधीचा मुद्दा बहुमत चाचणीच्या आजच्या दिवशी उपस्थित केला.
या मंत्र्यांनी घटनेतील मसुद्यानुसार शपथ घेतलेली नाही अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आपलं मत हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मांडलं. मंत्र्यांची ओळख मुख्यमंत्र्यांनी करुन देण्याआधी त्यांनी घेतलेली शपथ घटनाबाह्य आहे याचा विचार करायला हवा असं म्हणणं त्यांनी मांडलं.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ घटनेला धरुन नाही. भारतीय घटनेत शपथेचा मसुदा दिला आहे. राज्यपालांनी मी असा शब्द उच्चारल्यावर मंत्र्यांनी मी म्हणून नाव वाचावं लागतं, पण या शपथविधीत कुणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं, तर कुणी सोनिया गांधींचं. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची शपथ चुकल्यामुळे त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली होती," असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं.
त्यांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, "शपथ घेताना नेत्यांनी आपल्या आयुष्यातील दैवताचा उल्लेख कुणी केला, त्यात शिवाजी महाराजांचं नाव असेल, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले अशा महात्म्यांचं नाव घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना राग का आला, याचं उत्तर द्यायला हवं. आजच नाही, तर पिढ्यानपिढ्या त्यांच्या मनात हा राग आहे."
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
"महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीची एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. या शपथविधीविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
- बहुमत चाचणी LIVE: 'दादागिरी नहीं चलेगी, अधिवेशनच नियमबाह्य' - फडणवीसांचा हल्ला
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया आणि राहुल गांधी का आले नाहीत?
- शिवसेनेचं हिंदुत्व काँग्रेसला झेपणार का?
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं.
ते म्हणाले, "चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत. भाजपला हे कळायला हवं की देशभरात भाजपनं सुरू केलेल्या पायंड्यानं ही प्रक्रिया सुरू आहे. आज उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव सादर होत आहे. भाजपनं आमचं आव्हान स्वीकारलं पाहिजे. मतविभाजन करून 119 आमदार कुठे आहेत, हे भाजपनं दाखवून द्यावं."
"भाजप सोडून सगळे अपक्ष आणि भाजपमधील अनेक आमदार सत्ता न आल्यामुळे चलबिचल झाले आहेत. भाजपमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार स्वगृही परतण्यासाठी तयार आहे. पण, आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. नाहीतर भाजप रिकामा होईल," असंही नवाब म्हणाले.
कायदा काय सांगतो?
महाविकास आघाडीच्या शपथविधीविषयी आम्ही राज्यघटेनेचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांना विचारलं.
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी राज्यघटनेतील मसुद्यानुसार शपथ वाचली आहे. शपथेच्या सुरुवातीला किंवा शेवटी बोललेल्या गोष्टींमुळे शपथ बेकायदेशीर ठरली, असं म्हणता येत नाही."
पण, महापुरुषांची नावं घेणं योग्य आहे का, यावर ते म्हणाले, "शपथविधी सोहळ्यामुळे असे प्रश्न उपस्थित होतील, याची कल्पना असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शपथेचा मसुदा तयार केला. तो मसुदा जशाच्या तसा वाचल्यास ते उत्तम राहिलं, असं मला वाटतं."
सर्वोच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल झाल्यास काय होऊ शकतं, याविषयी चौसाळकर सांगतात, "या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देईल ते बघावं लागेल. पण, याचिकेमुळे सरकारचं कामकाज थांबू शकत नाही, ज्या घटना होणार आहेत, त्या रोखता येणार नाही."
यांनी पुन्हा घेतली होती शपथ...
2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लोकसभेत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या शपथेदरम्यान गोंधळ उडाला होता.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी शपथ घेताना त्यांचं संपूर्ण नावाचा उल्लेख केला होता.
त्यांनी स्वत:चं नाव 'साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरि' असं सांगितलं होतं. त्यांच्या या नावावर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
त्यावेळी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांचं रेकॉर्डवरील नाव तपासून पाहिलं. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली होती.
याव्यतिरिक्त 2009मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना एक शब्द इकडे-तिकडे झाल्यानंतर बराक ओबामा यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली होती.
"I will faithfully execute the office of president of the United States," असं म्हणण्याऐवजी त्यांनी "I will execute the office of president to the United States faithfully," असा उल्लेख केला होता.
हेही वाचलंत का?
- देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक आता तोंड वर काढतील का?
- या 6 चुकांमुळे भाजपची महाराष्ट्रात झाली पीछेहाट
- राज ठाकरेंचं पुढचं राजकारण कसं असेल?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)