देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे सरकारला विरोधी पक्षनेते म्हणून सळो की पळो करून सोडणार?

फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांनी पहिल्याच सत्रात सभात्याग केला Image copyright ANI
प्रतिमा मथळा फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांनी पहिल्याच सत्रात सभात्याग केला

काही तासांच्या सरकारचे धनी ठरल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकांवर बसण्याची तयारी केली. भाजपने त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आणि सभागृहाच्या पहिल्याच दिवशी ते आक्रमक रूपात सर्वांना दिसले.

उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी फडणवीस यांनी तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित केले, हंगामी विधानसभा अध्यक्षांपुढे ते रेटून धरले आणि नंतर आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे पाच वर्षं सरकार चालवण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या फडणवीसांनी पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला भविष्याची चुणूक कशी असेल, हे दाखवून दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विधानसभेच्या पहिल्याच सत्रात पहिल्याच मिनिटापासून विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस आक्रमक दिसले.

पाहा देवेंद्र फडणवीस यांनी काय आक्षेप घेतले...

त्यांनी खालील मुद्दे आपल्या शैलीत उपस्थित केले -

  • हे अधिवेशन बेकायदेशीर आहे. आज बोलावण्यात आलेले अधिवेशन नियमाला धरून नाही. सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रगीत होऊन ते अधिवेशन संपलं होतं. त्यामुळे आज जमलेले सदस्य हे नव्या अधिवेशनासाठी जमलेले आहेत. नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी समन्स काढण्याची गरज होती. समन्स काढण्यात न आल्याने हे अधिवेशन बेकायदेशीर आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांनी घेतलेली शपथही अवैध आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ घटनेला धरून नाही. भारतीय घटनेत शपथेचा मसुदा दिला आहे. राज्यपालांनी 'मी...' असा शब्द उच्चारल्यावर मंत्र्यांनी 'मी' म्हणून नाव वाचावं लागतं, पण या शपथविधीत कुणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं तर कुणी सोनिया गांधींचं. हे पूर्णपणे चुकीचं आहे.

  • हंगामी अध्यक्षांना (प्रोटेम स्पीकर) चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आलं. प्रोटेम स्पीकर बदलण्याची कोणतीही पद्धती नाही. तिन्ही पक्ष मिळून संविधानाची पायमल्ली करत आहेत.
  • प्रोटेम स्पीकरच्या समोर बहुमताची चाचणी घेण्यात यावी, असा सुप्रीम कोर्टाने केवळ 'त्या' दिवसाबाबतीत निर्णय दिला होता. आज प्रोटेम स्पीकरसमोर बहुमत घेण्याची गरज नव्हती. त्यासाठी अध्यक्षांची निवड होण्याची आवश्यकता होती.
  • महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेत अध्यक्षांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत बहुमत सिद्ध करता येत नाही. आपलं सरकार पडेल या भीतीने तिन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणं टाळलं. आपल्या आमदारांवर त्यांचा विश्वास नाही. संविधान, लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सगळ्यांची पायमल्ली करण्यात आल्याने आम्ही सभात्याग केला. हे कामकाज संविधानाला अनुसरून नाही, याचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार आहोत.

'देवेंद्र यांच्या प्रतिमेला तडा'

मात्र पहिल्याच सत्रात जर विरोधी पक्षाने गदारोळ करून सभात्याग केला तर पुढची पाच वर्षं कामकाज कसं चालेल, हा प्रश्न साहजिकपणे पडणारच. याबद्दलच विचारलं असता 'दिव्य मराठी'चे संपादक संजय आवटे सांगतात, "'दीड महिन्याचा नाट्यमय घटनाक्रम बघता, सभागृहात (शनिवारी) जे घडलं ते साहजिक होतं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांची कामगिरी समाधानकारक नसली तरी त्याआधी विरोधक म्हणून त्यांनी छाप उमटवली होती. पुन्हा एकदा ते विरोधी पक्षनेते होतील असं दिसतंय.

"विरोधी पक्षनेते म्हणून ज्या तयारीने काम करायला हवं तसं ते आज दिसले. सभागृहाच्या कामकाजाची तांत्रिकता त्यांनी सखोल माहिती आहे. देवेंद्र यांचा अभ्यास चांगला आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद भूषवणं सोपं जाणार नाही, अशी भाकितं वर्तवली जात आहेत. पहिल्याच सत्रात त्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. दबावतंत्राचा त्यांनी वापर केला. देवेंद्र यांनी आश्वासक सुरुवात केली आहे," असंही ते म्हणाले.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा फडणवीस आता विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत.

मात्र काही मुद्दे हास्यास्पद होते, असं निरीक्षणही ते पुढे नोंदवतात. "रात्री समन्स आलं, याचा उल्लेख फडणवीसांनी केला. लपून-छपून बहुमत सिद्ध केलं, शपथविधी प्रोटोकॉलचा नमूद केला. मात्र त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा राष्ट्रपती राजवट रात्रीतून उठवण्यात आली. एका रात्रीत एका आमदाराचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन केलं गेलं. शपथविधीचा प्रोटोकॉल याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला, तेव्हा त्यांच्या पक्षाची माणसंही हसत होती.

"नव्या सरकारचं अभिनंदन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय चुकीचा होता. महाविकास आघाडीने बहुमताचा आकडा सिद्ध केला. विधिमंडळाच्या परंपरेला अनुसरून घडलं नाही. त्यामुळे देवेंद्र यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे," असंही ते म्हणाले.

'देवेंद्र यांनी खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती'

देवेंद्र यांचा डाव सरकारला कोंडीत पकडण्याचा होता. पहिल्या दिवसापासून ते विरोधकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी प्रथा-परंपरांचा उल्लेख केला, पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली हे उघड केलं, शपथविधी प्रोटोकॉलबद्दल बोलले. मंत्र्यांची ओळख सुरू असताना पॉइंट-ऑफ-ऑर्डरने विरोध दर्शवला. ते नियमाला धरून असेलही, परंतु नवीन सरकारला दहा-पंधरा दिवसांचा कालावधी द्यायला हवा होता, असं राजकीय विश्लेषक अभिजीत ब्रह्मनाथकर यांना वाटतं.

"फडणवीसांनी आधीचा अनुभव वापरला. मात्र विरोधी पक्षाने सभात्याग करणं खिलाडूवृत्तीला धरून नव्हतं. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे, हे दिसत होतं. त्यावेळी विरोधी पक्षाने उपस्थित राहायला हवं होतं," असं ब्रह्मनाथकर यांनी सांगितलं.

संपादक संजय आवटे यांच्यामते, विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते असा फडणवीसांचा प्रवास प्रेरणादायी आहे. "मात्र आता त्यांची अवस्था गाढव गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी झाली आहे. देवेंद्र यांनी चुकीचा पायंडा पाडला, दुसऱ्यांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलाय,"

"उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचं बस्तान बसण्यापूर्वीच आपला दबाव वाढवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना होती. ती त्यांनी वाया घालवली. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की 'आज मी रिकाम्या बाकांशी मी बोलणार नाही, कारण रिकाम्या मैदानात मी तलवारबाजी करत नाही.' भाजपच्या पळपुटेपणाचा फायदा एकप्रकारे महाविकास आघाडीला झाला," असंही ते म्हणाले.

फडणवीसांचा सामना करणं आघाडीसाठी किती आव्हानात्मक?

भाजप-शिवसेना यांनी निवडणूक एकत्रितपणे लढवली होती. परंतु त्यानंतर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं विभागण्यावरून मतभेद झाले. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी वारंवार मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलं नसल्याचं सांगितलं.

त्यावेळीच विधिमंडळात शिवसेना आणि भाजप रणधुमाळी गाजणार हे स्पष्ट झालं होतं, असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना वाटतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा देवेंद्र फडणवीस

आचार्य पुढे सांगतात, "विरोधी पक्षात असताना देवेंद्र एकनाथ खडसेंच्या मागे बसायचे. माहिती, कायद्याची सखोल जाण, वक्तृत्व यामुळे ते खडसेंना मजबूत दारुगोळा पुरवायचे. विरोधी पक्षाच्या कामकाजाचा अनुभव देवेंद्र यांच्याकडे आहे.

"राज्यावर 5 लाख कोटींचं कर्ज आहे. कर्जमाफीपेक्षाही शिवसेनेला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे. यासाठी 50 हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. राज्याचं जीएसटी उत्पन्न आटलं आहे. देशाचा विकासदर साडेचार टक्क्यांवर घसरला आहे. मेक इन इंडिया फसलं आहे. लघुउद्योग संकटात आहेत. अशावेळी देवेंद्र यांचा सामना करणं महाविकासआघाडीसाठी अवघड असेल," असं त्यांना वाटतं.

"देवेंद्र यांनी पाच वर्षं मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवलं आहे. प्रशासनाची नस अन् नस त्यांना माहिती आहे. पहिल्या दिवशी घटनात्मक मुद्दे मांडून त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्र यांच्यासाठी पुढची वाटचाल खडतर असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अनुभवी नेत्यांची फौज आहे. भावनिक साद घालणारे नेते शिवसेनेकडे आहेत. त्यांची बाजू मजबूत आहे, मात्र देवेंद्र यांच्या साथीला आता विनोद तावडे नाहीत, एकनाथ खडसे नाहीत, पंकजा मुंडे नाहीत. हा फटका त्यांना बसेल," असं मत आचार्य नोंदवतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)