उद्धव ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांचं काय स्थान असेल?

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण Image copyright Getty Images

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्यात सत्ता मिळवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी या तीनही प्रमुख पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होईल.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण तसंच पृथ्वीराज चव्हाणांच्या स्थानाबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. याचं कारण अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेतच. मात्र, त्याचसोबत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपदही दोघांनी भूषवलं आहे.

Image copyright Getty Images

त्यामुळं पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान असेल का आणि असल्यास त्यांना कोणती खाती मिळतील, याची उत्सुकता सगळ्यांनच आहे. याबाबत बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.

मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल?

अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुठलं स्थान मिळणार, याआधी मुळात या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, हा प्रश्न उभा राहतो. कारण दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती राज्यात पुन्हा इतर मंत्रिपद घेत नाही, असे संकेत होते. मात्र, ते संकेतही कालबाह्य झालेत," असं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

दीक्षित यांनी पुढे म्हटलं, "या दोघांमधील कुणाला मोठं मंत्रिपद द्यायचं, ही सोनिया गांधींची कसोटी असेल. पृथ्वीराज चव्हाणांना ते झुकते माप देतील. मात्र, अशोक चव्हाणांचं दिल्लीतील वर्तुळ किती आग्रह धरतं, त्यावर अशोक चव्हाणांचं मंत्रिपद ठरेल."

Image copyright Getty Images

अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी मंत्रिमंडळात कुणाला घेतलं जाईल, याबाबत तुलनात्मक विश्लेषण करताना संजय जोग सांगतात, "पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्री म्हणून काम करण्यावर मर्यादा आहेत. एक म्हणजे लोकसभा, राज्यसभा, केंद्रीय मंत्री आणि साडेचार वर्षे मुख्यमंत्री, एवढी पदं भूषवल्यानंतर मंत्री म्हणून काम करताना जुळवून घेणं हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे."

"अशोक चव्हाणांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. मात्र, 'आदर्श' प्रकरणात त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. पण सध्याच्या परिस्थितीत स्थिरता आणि अनुभवी नेता म्हणून पाहायचं झाल्यास अशोक चव्हाणांकडे वजन आहे. प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कामगिरी पाहिल्यास अशोक चव्हाण उजवे आहेत."

काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आल्यानं उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल, हे जवळपास निश्चित आहे.

महसूल, संसदीय कामकाज, समाजकल्याण, सहकार, विपणन अशी खाती काँग्रेसच्या वाट्याला येतील, अस अंदाज संजय जोग यांनी वर्तवला आहे. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला येणारं महसूल मंत्रिपद बाळासाहेब थोरातांकडेच राहील, असंही जोग म्हणतात.

Image copyright Getty Images

मग अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांचं काय, असा प्रश्न उद्भवतो.

प्रशांत दीक्षित सांगतात, "अशोक चव्हाण हे मंत्रिपदासाठी कुठलाही दबाव आणणार नाहीत. कारण त्यांनी नांदेड राखलं असलं तरी पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली नाहीये. त्यामुळं ते मंत्रिपदासाठी अडून बसतील असं वाटत नाही."

पण तरीही अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी मंत्रिमंडळात अशोक चव्हाणांना प्राधान्य मिळेल, असा अंदाज प्रशांत दीक्षित आणि संजय जोग हे वर्तवत आहेत.

संजय जोग सांगतात, "अशोक चव्हाणांचा मंत्रिमंडळात नंबर लागू शकतो. पृथ्वीराज चव्हाणांना यावेळी थांबावं लागेल."

पृथ्वीराज चव्हाण 'मार्गदर्शक मंडळात'?

पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यासाठी तिन्ही मुख्य पक्षांकडून प्रयत्न केले जाऊ शकतात, असाही अंदाज प्रशांत दीक्षित वर्तवतात. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांची ज्येष्ठता पाहता, त्यांचं पुनर्वसन करणं काँग्रेससाठी अपरिहार्य असेल.

याबाबत बोलताना प्रशांत दीक्षित यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीचा उल्लेख केला. ते म्हणतात, "पृथ्वीराज चव्हाणांची नियमाला धरून निर्णय घेण्याची सवय पाहता, त्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने समन्वय समितीत स्थान दिलं जाईल. समन्वय समितीचं अध्यक्षपदही त्यांना मिळू शकेल."

Image copyright Getty Images

"मार्गदर्शक मंडळासारखा त्यांचा वापर केला जाईल. बौद्धिक कामात पृथ्वीराज चव्हाणांचा वापर केला जाऊ शकतो," असंही दीक्षित म्हणतात.

पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतिमेचे नेते मानले जातात, असं सांगून प्रशांत दीक्षितांनी म्हटलं, "पृथ्वीराज चव्हाणांसारख्या पंतप्रधान कार्यालयात काम केलेल्या स्वच्छ मंत्र्याचा उपयोग या सरकारनं करून घ्यायला हवा. त्यांना विविध प्रश्नांची जाण आहे. त्यांच्या अनुभवांचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे सोनिया गांधी यांना ठरवावं लागेल."

शिवाय, पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळात किंवा मोठे पद दिल्यास महाविकास आघाडी सरकारला विश्वासार्हतेसाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेचा फायदा होऊ शकतो, असंही दीक्षित सांगतात.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, की कुणाला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायचं, याबाबतचे सर्व निर्णय हायकमांड घेईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)