शरद पवार- नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती #5मोठ्या बातम्या

शरद पवार, नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) मोदींनी सोबत येण्याची ऑफर दिली होती - शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तयार झालेल्या सत्तापेचादरम्यानच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. या भेटीत सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची मोदींनी ऑफर दिली होती. मात्र, मोदींची ही ऑफर आपण नाकारली, असं पवारांनी सांगितलं. ही माहिती इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या बातमीत दिलीय.

राष्ट्रपतीपदाची भाजपकडून ऑफर होती का, असा प्रश्न पवारांना विचारलं असता, त्यांनी वृत्त फेटाळलं. ते म्हणाले, "मला राष्ट्रपतीपदाची ऑफर नव्हती, मात्र सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची ऑफर नक्कीच होती."

नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सोबत येण्याचीही ऑफर दिली होती, अशी माहिती शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिली. मात्र, ती ऑफर आपण नाकारल्याचंही पवारांनी नमूद केलं.

मोदींच्या ऑफरबद्दल पवार यांनी सांगितलं, "अतिवृष्टीसंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी थांबण्यास सांगितलं आणि म्हटलं, की आपण एकत्रित काम केल्यास आनंद होईल. परंतु मी ती ऑफर नाकारली. मी त्यांना सांगितलं, की आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतीलही. पण आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही."

Image copyright Getty Images

दरम्यान, एबीपी न्यूज हिंदीच्या मुलाखतीत शरद पवार यांना जस्टिस लोया प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला गेला. न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी म्हटलं, "मला हे प्रकरण माहित नाहीये, मी वृत्तपत्रांमधून वाचलंय. यावर काही लेखही वाचले. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या लोकांमधील हा चर्चेचा विषय आहे. माझ्याजवळ याबाबत पूर्ण माहिती नाही."

त्यामुळं न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाईल का, हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

2) PMC बँकेचे 78 टक्के खातेधारक संपूर्ण ठेव काढू शकतात

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या (PMC) सुमारे 78 टक्के खातेधारक त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतात. तशी परवानगी देण्यात आल्याची माहिती लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीये.

Image copyright Getty Images

एकाचवेळी 50 हजार रूपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यातून काढता येणार असल्याचीही माहिती यावेळी सीतारामण यांनी दिली. लग्न समारंभ, आरोग्य विषयक गंभीर स्थिती, शिक्षण अशा परिस्थितीत आरबीआयच्या संबंधित निर्देशांनुसार एक लाख रूपयांपर्यंतही रक्कम काढता येऊ शकते.

पीएमसी बँकेत चार हजार 355 कोटी रूपयांची आर्थिक अनियमितता आढळली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीये. याच आर्थिक अनियमिततेमुळेच 24 सप्टेंबर रोजी आरबीआयनं पीएमसची बँकेवर निर्बंध लादले.

3) घरगुती सिलेंडरच्या किंमतीत सलग चौथ्या महिन्यात वाढ

घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमती पुन्हा वाढल्या आहेत. या सिलेंडरचे दर नवी दिल्लीत 13.5 रूपये, तर मुंबईत 14 रूपयांनी वाढवण्यात आले आहेत. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीये.

दरवाढीमुळं विनाअनुदानित सिलेंडरचे दर दिल्लीत 695 रूपये, मुंबईत 665 रूपये, चेन्नईत 714 रूपये, तर कोलकात्यात 725 रूपये होतील.

Image copyright Getty Images

गेल्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरमध्ये 76 रूपयांनी वाढ झाली होती. त्याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी 15 रूपयांनी वाढ झाली होती.

भारतातल्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती या एलपीजीचा इंटरनॅशनल बेंचमार्क रेट आणि अमेरिकन डॉलर यावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित किंमत जाहीर करत असतात.

4) 2024 पर्यंत देशभरात NRC लागू करणार - अमित शाह

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशभरात लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमधील प्रचारादरम्यान दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"राहुल गांधी म्हणतात घुसखोरांना काढू नका. ते कुठे जाणार, काय खाणार? पण मी तुम्हाला आश्वासन देतो, 2024 पर्यंत सर्व घुसखोरांना बाहेर काढणार आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं.

Image copyright Getty Images

"पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रत्येक घुसरखोराची ओळख पटवून त्याची हकालपट्टी करू," असं अमित शाह यांनी म्हटलं. मात्र, पश्चिम बंगालमधील भाजपचेच काही नेते एनआरसीशी सहमत नसल्याची चर्चा आहे. कारण प. बंगालमधील पोटनिवडणुकीत या मुद्द्याचा पक्षाला फटका बसला होता.

5) चंद्राच्या पृष्ठभागावर 'नासा'ला विक्रम लँडरचे अवशेष सापडले

चंद्राच्या पृष्ठभागावर 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचे अवशेष सापडल्याची माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'नं दिलीये. 'नासा'नं विक्रम लँडरच्या अवशेषांचा फोटोही प्रसिद्ध केलाय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

नासाच्या लुनार रिकॉनिसेंस ऑर्बिटरच्या (LRO) माध्यमातून विक्रम लँडरचे अवशेष कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Image copyright Twitter/@NASA

विक्रम लँडरचा जिथं इस्रोशी संपर्क तुटला होता, त्या ठिकाणापासून उत्तर-पश्चिम दिशेला 750 मीटर अंतरवार हे अवशेष सापडले.

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान 'विक्रम लँडर'चा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वीच संपर्क तुटला होता. त्यानंतर विक्रम लँडरचा ठावठिकणा इस्रोला लागत नव्हता. मात्र, नासानं ट्वीट केलेल्या फोटोमुळं विक्रम लँडरचं ठिकाण कळण्यास मदत झालीये.

चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रभूमीच्या अगदी जवळ गेलेल्या विक्रम लँडरचा दुसऱ्या टप्प्यातील वेग नियोजित वेळेपेक्षा अधिक असल्यानं 'सॉफ्ट लँडिंग' होऊ शकलं नव्हतं. चंद्रभूमीपासून 500 मीटर अंतरावर विक्रम लँडरचं 'हार्ड लँडिंग' झालं, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)