पंकजा मुंडे- मला कुठलंही पद मिळू नये म्हणून 'हे' सगळं सुरू आहे का?

पंकजा मुंडे Image copyright Facebook/Pankaja Munde

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना अखेर मीडिया समोर येऊन उत्तर दिलं आहे. मंगळवारी विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलाताना त्यांची बाजू मांडली आहे.

यावेळी त्यांनी मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का," असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला आहे.

याआधी मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून आलेल्या बातम्याही व्यथित करणाऱ्या होत्या असं त्यांनी म्हटलंय. वेगवेगळ्या चर्चा माझ्यावर लादल्या गेल्या असंही त्यांनी म्हटलंय.

आपल्या विरोधात बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सुद्धा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

"कुठल्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, त्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही ते माझ्या रक्तात नाही," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

अत्यंत भावुक होऊन पंकजा यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या.

मी जे काही सांगणार आहे ते 12 डिसेंबरलाच सांगणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.

रविवारी (1 डिसेंबर) पंकजांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय. आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...' असं लिहिलं होतं.

Image copyright Getty Images

या फेसबुक पोस्टमध्ये पंकजांनी 'मावळे' हा शब्द वापरला होता. हा खास शिवसेनेकडून वापरला जाणारा शब्द असल्यानं पंकजा भाजपला सोडणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. पंकजांबद्दल 12 डिसेंबरला काय ते स्पष्ट होईल, असं विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भाजपनं शक्यता फेटाळली

भाजपनं मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नसल्याचं सांगत अशी शक्यता फेटाळून लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं.

त्यानंतर मंगळवारी विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

पंकजा मुंडेंच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येईल असं वाटत नाही, असं यावेळी राम शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)