पानिपत : सदाशिवराव भाऊंना अब्दालीविरुद्धचं युद्ध टाळता आलं असतं?

सदाशिवराव भाऊ Image copyright TWITTER/ARJUNK26

आधुनिक युद्धशास्त्राचे प्रवर्तक,'नेशन स्टेट'सदृश संकल्पना मांडणारे आणि मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर पानिपत इथं झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे योद्धा म्हणून सदाशिवराव भाऊ यांची इतिहासाला ओळख आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले.

चिमाजी अप्पांचे चिरंजीव असलेल्या सदाशिवरावांचं आयुष्य जेमतेम तीस वर्षांचं. पेशवाईच्या कालखंडातलं अल्प पण निर्णायक पर्व. सदाशिवरावांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या पानिपताच्या लढाईत मराठा सैन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यांनी दाखवलेल्या शौर्याचं उदाहरण आजही दिलं जातं. एका दिवसात खरंतर काही तासात मराठी सैन्याने सेनापती, सैन्य आणि प्रचंड प्रमाणावर माणसं गमावली.

सदाशिवरावांचं बालपण

4 ऑगस्ट 1730 रोजी सदाशिवराव भाऊंचा जन्म झाला. ते केवळ एक महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. दहा वर्षांचे असताना पितृछत्र हरपले. त्यांचा सांभाळ आजी राधाबाई यांनी केला. रामचंद्रबाबा हे सदाशिवरावभाऊंचे गुरु होते.

उमाबाई या सदाशिवराव भाऊंच्या पहिल्या पत्नी. त्यांच्यापासून त्यांना दोन अपत्यं होती. मात्र त्यांचा लहानपणीच मृत्यू झाला. पार्वतीबाई या सदाशिवरावांच्या दुसऱ्या पत्नी. त्यांच्यापासून त्यांना कोणतंही अपत्य नव्हतं.

सातारला छत्रपती शाहूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारण, प्रशासन यांची धुळाक्षरं गिरवली. 1746 मध्ये कर्नाटकातील तुंगभ्रदा दोआबात महादजीपंत पुरंदऱ्यासोबत मोहिमेस रवाना झाले. 1747 मध्ये आजऱ्याच्या लढाईत पहिला विजय मिळवला आणि बहादूर भोंड्याचा किल्ला जिंकला. तुंगभद्रेपर्यंत जाऊन सावनूरकर नवाब देसाईंना जरब बसवली. त्यावेळी कित्तूर, मोकाक, परसगड, यादवाड असे 35 परगणे काबीज केले.

1750 मध्ये त्यांनी छत्रपती राजाराम यांच्याकडून मुखत्यारी मिळवली. त्याच वर्षी कोल्रहापूर छत्रपतींकडून पेशवाई वस्त्रं आणि जहागिरी मिळवली. 1759 मध्ये त्यांनी निजामाविरुद्धची उदगीरची लढाई यशस्वी केली.

उदगीरच्या या लढाईनेच सदाशिवरावांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.

आधुनिक युद्धशास्त्राची तत्वं अंगीकारत सदाशिवराव भाऊंनी तोफखान्याचं महत्त्व ओळखलं. बुसी या फ्रेंच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील तोफखान्याचा पराक्रम पाहिल्यानंतर त्यांनी इब्राहिम खान गारदी यांना ताफ्यात समाविष्ट केलं.

इब्राहिम यांच्याआधी मुजफ्फरखान याचं तोफखान्यातलं कौशल्य सदाशिवरावभाऊंनी ओळखलं होतं. मात्र मुजफ्फरखान शिस्तशीर नाही आणि तो फितूर होऊ शकतो हे ओळखून त्यांनी मुजफ्फरखानाला दूर ठेवलं. 3 फेब्रुवारी 1760 रोजी उदगीरच्या लढाईत मराठा सैन्याने निझामाला निष्प्रभ करत बुऱ्हाणपूर, औरंगाबाद आणि बिजापूर हा टापू काबीज केला.

झेपावे उत्तरेकडे...

उदगीरच्या मोहिमेनंतर उत्तरेकडे फौजा पाठवण्यासाठी तयारी सुरू झाली. रघुनाथराव यांनी उत्तरेकडच्या मोहिमेत 80 लाखांचं कर्ज ओढवून घेतल्याने त्यांच्याऐवजी सदाशिवराव भाऊ यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याबरोबर विश्वासराव यांनाही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Image copyright TWITTER / @DUTTSANJAY

6 लाख रुपये आणि 50 हजाराचं सैन्य अशा ताकदीसह मराठ्यांचं सैन्य उत्तरेकडे रवाना झालं. अहमद शाह अब्दाली म्हणजे मुघल नाही, तुर्की घोड्यांवर स्वार होऊन ते आगेकूच करतात. त्यांना गनिमी काव्याचं ज्ञान आहे, असा सल्ला सदाशिवरावांना देण्यात आला होता.

पानिपतच्या लढाईआधीच्या घडामोडी

इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सदाशिवराव भाऊंना शुजा, राजपूत, सूरजमल जाट यांची मदत मिळण्याची शक्यता होती तर अब्दालीला नजीब उद्दौला, बंगश आणि बरेलीचे रोहिल्ले यांची मदत मिळणार होती. युद्ध होऊ नये यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. जयपूर, जोधपूरच्या राजांनी अब्दालीला साथ देण्याचं ठरवलं. सदाशिवराव भाऊंनी युद्ध जिंकलं तर आपल्या डोक्यावर त्यांची सत्ता असेल हे लक्षात आल्यामुळे अनेकांनी अफगाणिस्तानच्या अब्दालीला साथ देण्याचं ठरवलं.''

Image copyright BRITISH LIBRARY

ते पुढे सांगतात, ''भाऊंनी दिल्ली काबीज करून लाल किल्ला ताब्यात घेतला होता. एकप्रकारे तत्कालीन हिंदुस्तानावर मराठ्यांचे राज्य होते. कुंजपुराच्या लढतीत मराठा सैन्याने अन्नधान्याच्या साठ्यावर ताबा मिळवला. पानिपतच्या युद्धात मराठा सैन्य आणि अब्दाली दोन्हीकडे कुटुंबकबिला मोठा होता. आठ ते दहा महिने जवळच्या व्यक्तींशिवाय राहण्याऐवजी त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय तीर्थक्षेत्री जाणारे यात्रेकरू होते. त्याकाळी सैन्याच्या आश्रयाने यात्रेकरू प्रवास करत असत. कारण वाटेत लूटमार होण्याची शक्यता असे. सैन्य असलं, की सुरक्षित जाता येतं म्हणून असंख्य यात्रेकरू मराठा सैन्यात होते''.

असं घडलं पानिपत...

31 ऑक्टोबर 1760 ला मराठे आणि अब्दाली अगदी समीप येऊन ठेपले होते. मात्र मराठ्यांनी तोफखान्याच्या केलेल्या रचनेमुळे आपला धुव्वा उडेल असं अब्दालीला लक्षात आलं. मराठ्यांनी अब्दालीचा अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग रोखला होता तर अब्दालीने मराठ्यांचा दिल्ली मार्ग रोखला होता. 7 डिसेंबरच्या लढाईत सदाशिवरावभाऊंचे विश्वासू साथीदार बळवंतराव मेहेंदळे मारले गेले.

गोविंदराव बुंदेले मराठा सैन्याला दिल्ली मार्गावरून रसद पुरवत होते. अब्दालीने त्यांना मारलं. 13 जानेवारीला अन्नधान्याचा साठा संपला. अब्दालीला अफगाणिस्तानला परतायचं होतं. मराठ्यांनी चौकोनी स्वरुपात सैन्यरचना केली. मराठ्यांच्या डाव्या आणि मधल्या फळीने अब्दालीचा प्रतिकार केला. दुपारपर्यंत मराठा सैन्याने जोरदार बाजी मारली.

मात्र चार तासांनंतर अब्दालीने पळून गेलेल्या सैनिकांना एकत्र करून मराठ्यांवर हल्ला चढवला. दमलेल्या मराठा सैन्यावर ताज्या दमाच्या अब्दालीच्या सैनिकांनी हल्ला चढवला आणि हातातोंडाशी आलेला विजय गमावला. 50 हजार सैन्य होतं. परंतु सैनिक नसलेली मंडळी धरून लाखभर माणसं धारीतीर्थी पडली.

Image copyright BRITISH LIBRARY

"सदाशिवराव भाऊंनी लढण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता," असं उदय कुलकर्णी सांगतात. "दुपारपर्यंत मराठा सैन्याने अब्दालीच्या सैन्याला जेरीस आणत आघाडी मिळवली होती. मात्र पहिल्या आक्रमणानंतर पळून आलेल्या सैनिकांना एकत्र करत अब्दालीने ताज्या दमाच्या सैनिकांच्या तुकडीसह आक्रमण केलं. सकाळपासून लढून मराठी सैन्य दमलं होतं."

जानेवारीत पानिपत परिसरात प्रचंड थंडी असते. त्यापासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे मराठा सैन्याकडे नव्हते. अब्दालीच्या सैन्याकडे चामड्याच्या कोटासारखे कपडे होते, असे दाखले इतिहासात आहेत. या युद्धात सूर्याची भूमिका निर्णायक ठरल्याचं इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात. जसा सूर्य माथ्यावर आला तसं मराठा सैन्य हैराण होऊ लागलं.

विश्वासराव धारातीर्थी पडल्यानंतर सदाशिवरावांनी हत्ती म्हणजेच अंबारी सोडून घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने सदाशिवराव भाऊही धारातीर्थी पडले अशी बातमी मराठा सैन्यात पसरली आणि त्यांचं मनोधैर्य खचलं.

1734च्या अहमदिया करारानुसार दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती. त्याचा मोबदला म्हणून चौथाई कर वसूल करण्याचा आणि देशमुखीचा अधिकार मराठ्यांकडे होता. यापूर्वी हे अधिकार राजपूतांकडे होते. त्यांच्याकडून अधिकार गेल्याने त्यांनी पानितपच्या लढाईत मराठ्यांना मदत केली नाही. अजमेर आणि आग्रा यांच्याबाबत वायदा न केल्याने जाटांनी मराठ्यांना लढाईत साथ दिली नाही.

पानिपतचं युद्ध टाळता आलं असतं?

पानिपतची लढाई टाळता आली असती हे तत्कालीन कागदपत्रं आणि पत्रव्यवहार सांगतो असं दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितलं.

"भाऊसाहेबांच्या बखरमध्ये उत्तरेकडच्या मोहिमेपूर्वीचा तपशील आहे. सदाशिवरावभाऊ उत्तरेत गेले आणि त्यांनी स्वत:चं वेगळं साम्राज्य करण्याचा निर्णय घेतला तर अशी भीती गोपिकाबाईंच्या मनात होती. त्यामुळे सदाशिवराव भाऊंच्या बरोबरीने विश्वासरावांना पाठवण्यात आलं. त्यांच्या बरोबर प्रचंड सैन्य देण्यात आलं परंतु निधी फारच कमी देण्यात आला," असं देशपांडे यांनी सांगितलं.

Image copyright NATIONAL LIBRARY OF FRANCE

"सदाशिवराव भाऊंनी दक्षिणकेडील मोहिमा जिंकल्या होत्या. मात्र उत्तरेकडील पूर्णपणे वेगळ्या वातावरणात लढण्याचा अनुभव त्यांच्याकडे नव्हता. अहमद शाह अब्दाली हा अनुभवी योद्धा आहे. थेट लढाई करण्याचा अनुभव त्याच्याकडे होता. दुसरीकडे सदाशिवराव अशा लढाईंच्या बाबतीत अनुनभवी होते. हे युद्ध होऊ नये आणि तह करण्यात यावा यादृष्टीने अनुभवी सरदारांनी भाऊंना कल्पना दिली होती. अब्दालीने स्वत:हून वाटाघाटींचा प्रस्ताव दिला होता. अन्नधान्याची रसद कमी होत जाईल आणि सैन्य-प्राणी यांना तगवणं कठीण असेल हा सल्ला देण्यात आला होता. दुसरीकडे अब्दालीच्या फौजांना स्थानिक प्रांतांकडून मदत मिळत होती," असं देशपांडे सांगतात.

"अफगाण सैनिकांना मारून आपले दत्ताजी परत मिळणार नाहीत. त्यांच्या सैनिकांना ओलीस ठेवलं तर खंडणी लुटता येईल असा सल्ला देण्यात आला होता. अहमद शाह अब्दालीला अफगाणिस्तानला परतायचं होतं ही वस्तुस्थिती सैन्यातील अनुभवी शिलेदारांनी मांडली होती," असं देशपांडे सांगतात.

दोन मोती गळाले... लाख बांगडी फुटली...

दोन मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन केलं गेलं.

सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे सेनापती, 27 सरदार आणि प्रचंड सैन्य कामी आल्याने पानिपतच्या लढाईचं असं वर्णन केलं जातं. पानिपताच्या या लढाईनंतरही उत्तरेत मराठ्यांचं राज्य होतं. मात्र दख्खन प्रांतात नेतृत्वाची उणीव निर्माण झाली. मराठी विश्वकोशाने तीन संदर्भग्रंथांच्या आधारे पानिपतच्या लढाईचा परिणाम मांडला आहे.

Image copyright ALASTAIR GRANT/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा पानिपतानंतर उत्तरेतल्या मराठा वर्चस्वाला धक्का लागला असं म्हटलं जातं.

''पानिपतचे युद्ध हे मराठी इतिहासातील एक शोकांतिका होय. सर्व हिंदुस्थानचे राजकारण पुण्याहून चालवावयाचे हे मराठेशाहीचे धोरण सुमारे अर्धे शतक यशस्वी ठरले. या धोरणाची पूर्तता होण्याचा समय आला असता, एकाएकी वादळ निर्माण होऊन इमारत जमीनदोस्त व्हावी, तद्वत अब्दाली-रोहिले यांची युती होऊन, मराठ्यांच्या साम्राज्यास्थापनेवर जबरदस्त आघात झाला. पानिपत येथील पराभवाने मराठेशाहीची एक कर्ती पिढी नाहीशी झाली. पुत्र, बंधू आणि मित्र यांच्या वियोगाने विव्हल होऊन पेशवा मरण पावला. अटकेपर्यंत फडकलेला मराठ्यांचा भगवा झेंडा चंबळ नदीवर जेमतेम स्थिरावला. दक्षिणेत निजाम-हैदर यांनी डोकी वर काढली. उत्तरेस राजस्थान, बुंदेलखंड, माळवा येथील राजेरजवाडे व लहान मोठ्या जमीनदारांनी मराठ्यांविरुद्ध दंगे सुरू केले. मराठेशाहीचा दरारा नाहीसा झाला. पानिपतनंतर पन्नास-साठ वर्षे मराठी राज्य अस्तित्वात होते पण त्याचे आक्रमक धोरण जाऊन ते बचावाचे होऊन बसले. प्रयत्न करूनही त्यांना दिल्लीस पूर्वीसारखा जम बसविता आला नाही," असं नमूद करण्यात आलं आहे.

अब्दालीने केलं मराठा सैन्याचं कौतुक

अहमद शाह अब्दालीने पानिपतच्या लढाईतील मराठ्यांच्या कामगिरीचं पत्राद्वारे कौतुक केल्याचं डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितलं.

Image copyright TWITTER/DUTTSANJAY

लढाईनंतर अब्दालीने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, ''हे लोक सामान्य नाहीत. मराठा सैन्याने अजोड धैर्य दाखवलं. अन्य वंशाच्या लोकांना हे शक्य झालं नसतं. निधड्या छातीचे वीर एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. आपल्या भूभागापासून दूर ठिकाणी, अन्नधान्याची रसद संपुष्टात आलेली असताना मराठा सैन्याने पराक्रमाची शर्थ केली''.

मृत्यूसंदर्भात दंतकथा

14 जानेवारी 1761 रोजी पानिपत इथं झालेल्या युद्धात सदाशिवराव भाऊ यांचा मृत्यू झाला. मात्र हरियाणातील रोहतकजवळच्या सांघी गावातील स्थानिकांच्या मते सदाशिवराव भाऊ लढाईनंतर जिवंत होते.

रोहतक शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सांघी गावात सदाशिवराव भाऊंच्या नावाने एक आश्रम आहे. या आश्रमाचं नाव 'डेरा लाधिवाला.' या डेऱ्यातच श्री सिद्ध बाबा सदाशिवराय तथा भाऊ राव यांची 'गद्दी' आहे.

गावकऱ्यांच्या मते 1761मध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या फौजेचा पराभव निश्चित झाला त्या वेळी सदाशिवराव भाऊ पेशवे जखमी अवस्थेत आपल्या घोड्यावरून युद्धभूमीतून बाहेर पडले. जखमी आणि अर्धवट शुद्धीत ते उग्राखेडी गावात पोहोचले. तिथून ते सोनिपत जिल्ह्यातल्या मोई हुड्डा गावात आले. त्यापुढे रूखी गावात त्यांनी आसरा मागितला.

प्रतिमा मथळा सदाशिवरावांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असं गावकरी मानतात.

22 जानेवारी 1761 रोजी म्हणजे पानिपतच्या युद्धानंतर आठ दिवसांनी भाऊ सांघी गावात पोहोचले. इथे त्यांना गावकऱ्यांनी आसरा दिला, असं गावातले लोक सांगतात. डेरा लाधिवाला हा सदाशिवराव भाऊंचा मठ सांघी गावाच्या परिघावर आहे.

दरम्यान इतिहासकार एस. जी. सरदेसाई यांनी आपल्या 'सिलेक्शन्स ऑफ पेशवा दफ्तर' मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 24 फेब्रुवारी 1761 रोजी नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात सदाशिवराव भाऊ आणि विश्वासरावांचे अंत्यसंस्कार झाल्याचं कळवलं होतं.

इतिहासकार काहीही म्हणाले, तरी या गावातल्या लोकांना भाऊसाहेबांच्या इथल्या वास्तव्याबाबत प्रचंड विश्वास आहे.

गावकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे सदाशिवराव भाऊंनी 1761मध्येच नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यासाठी ते कुरुक्षेत्राजवळच्या पेहोवा इथल्या श्रवणनाथ धाम इथे गेले होते. तिथे त्यांनी गुरू गरीब नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी प्राप्त केली.

त्यानंतर ते पुन्हा सांघी गावात आले. 1764मध्ये त्यांनी रोहिला पठाणांच्या लुटीपासून गावाला वाचवण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची फौजही बांधली. गावाभोवती खंदक खोदून त्यांनी या पठाणांचा बंदोबस्त केला. या पठाणांशी झालेल्या लढाईत त्यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी विजय मिळवला अशी माहिती महंत सुंदरनाथ यांनी दिली.

प्रतिमा मथळा 20 एकर जमिनीवर हा मठ पसरला आहे.

या चकमकीनंतर भाऊ नाथ यांनी या ठिकाणीच समाधी घेतली. तेव्हापासून त्यांचे शिष्य या मठाची देखभाल करत आहेत. ही शिष्य परंपरा अजूनही सुरू असल्याचंही सुंदरनाथ यांनी सांगितलं.

एका बाजूला मराठ्यांची एक अख्खी पिढी आणि त्या सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे या युद्धात मारले गेल्याची सल इतकी शतकं महाराष्ट्राच्या मनात आहे.

पुणे-पानिपत हे अंतर आताच्या काळातही बरंच आहे. 258 वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं मर्यादित असताना लाखभर माणसं, प्रतिकूल हवामान आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत सदाशिवरावभाऊंनी दिलेली लढत इतिहासाच्या पानांमधलं एक धगधगतं पर्व राहील. 

पेशवे नेमके कोण?

मराठी विश्वकोशाने दिलेल्या माहितीनुसार, "पेशवे म्हणजे मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्य प्रधानाचा उल्लेख आढळतो. एखादे मोठे देवस्थान किंवा एखाद्या मोठ्या घराण्याची जहागीर ह्यांची व्यवस्था पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीस पेशवा किंवा प्रधान आणि पुढे मुख्यप्रधान म्हणू लागले.

शिवछत्रपतींचे पहिले प्रधान किंवा मुख्य प्रधान शामराज रांझेकर या नावाचे गृहस्थ होते. त्यानंतर महादेव मुख्य प्रधान झाले पण दोघांच्याही शिक्यांत मुख्य प्रधान असा शब्द न वापरता 'मतिमंत्‌प्रधान' असा निर्देश आला आहे.

छत्रपती शाहू मोगलांच्या कैदेतून 1707 साली सुटून आल्यानंतर1713 पर्यंत निळो मोरेश्वराचा भाऊ बहिरो मोरेश्वर हाच मुख्यप्रधान म्हणून काम पहात होता, पण त्यानंतर शाहूने बाळाजी विश्वनाथ या कोकणातील भट घराण्यातील हुशार आणि कर्तबगार इसमास मुख्यप्रधानकी दिली. ती वंशपरंपरेने चालली, म्हणून भट घराण्यास पेशवे घराणे व त्यांच्या कारकीर्दीस पेशवाई असे म्हटले जाते.

Image copyright VENUS PRAKASHAN/BOOKGANGA.COM

बाळाजीने मराठी राज्यातील कान्होजी आंग्रे, उदाजी चव्हाण यांसारख्या मातबर सरदारांना छत्रपती शाहूच्या छत्राखाली एकत्र आणून मराठी राज्याची विसकटलेली घडी पुन्हा नीट बसविली. त्यानंतर पहिल्या बाजीरावाने मराठी राज्याचा विस्तार उत्तर हिंदुस्तानात केला. दक्षिणेतही निजामाचा पराभव करून खंडणी वसूल केली.

चिमाजी आप्पा हे बाजीरावाचे धाकटे बंधू. बाजीराव यांचा नर्मदेकाठी रावेरखेडी 1740 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांना मुख्यप्रधानपद मिळाले.

"बाळाजी बाजीरावाच्या कार्यात चिमाजी आप्पाचा मुलगा सदाशिवराव भाऊ (3 ऑगस्ट 1730 - 14 जानेवारी 1761) याचे खूप साहाय्य झाले. हा पिलाजी जाधवाबरोबर 1747 मध्ये प्रथम सोंध्याच्या स्वारीवर गेला होता. त्यानंतर त्यांनी अनेक लहानमोठ्या स्वाऱ्यांमध्ये भाग घेतला. भाऊस राज्यकारभारात अधिकाधिक भाग घेण्यास संधी मिळत गेली. तो राज्याच्या आय-व्ययाविषयी विशेष दक्ष होता."

सदाशिवपेठ

सदाशिवराव भाऊंच्या योगदानाप्रीत्यर्थ पुणे शहरातील एका पेठेला सदाशिवरावभाऊंचे नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात सदाशिवराव भाऊ यांच्या गौरवार्थ 14 जानेवारीला राज्यात तसंच पानिपत इथं कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, अशी माहिती डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)