CAA: जामिया मिलियासाठी गांधीजी भीक मागायलाही का तयार होते?

जामिया Image copyright Getty Images

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनांचं लोण ईशान्य भारताकडून राजधानी दिल्लीपर्यंत आलं. दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे विद्यार्थी रविवारी (15 डिसेंबर) या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले.

या आंदोलनादरम्यान तीन बसेसना आग लावण्यात आली आणि मग हिंसाचार झाला.

दिल्ली पोलीस जामियाच्या लायब्ररीमध्ये परवानगीशिवाय घुसले आणि तिथे अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी लाठीहल्ला केला. पोलिसांच्या या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले.

विद्यापीठात झालेल्या कारवाईबद्दल जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू प्राध्यापक नजमा अख्तर यांनी पोलिसांवर टीका केली असून या संपूर्ण घटनेविषयी खेद व्यक्त केला.

एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं, "माझ्या विद्यार्थ्यांसोबतचा क्रूर व्यवहार पाहून मला दुःख झालंय. पोलिसांनी परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये घुसणं आणि लायब्ररीत घुसून निरपराध मुलांना मारहाण करणं हे स्वीकारण्याजोगं नाही. मला मुलांना इतकंच सांगायचंय. की या कठीण प्रसंगात तुम्ही एकटे नाहीये. मी तुमच्यासोबत आहे. संपूर्ण विद्यापीठ तुमच्यासोबत आहे."

यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत जामियाला बदनाम न करण्याचं आवाहन केलं. फक्त 'जामिया' म्हटल्यानं चुकीची माहिती पसरत असल्याचं त्यांनी म्हटलं. कारण या भागाचं नावही 'जामिया' आहे आणि विद्यापीठाचं. त्यामुळे या भागामध्ये होत असलेली निदर्शनं ही विद्यापीठातर्फे केली जात असल्याचा समज होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

जामिया मिलियाचा इतिहास

उर्दू भाषेमध्ये जामियाचा अर्थ आहे - विद्यापीठ आणि मिलिया म्हणजे राष्ट्रीय.

आज दिल्लीत असणारं जामिया मिलिया इस्लामिया स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात अलिगढमध्ये होतं.

Image copyright Getty Images

ब्रिटीश राजवटीमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा विरोध करण्यासाठी तसंच स्वातंत्र्य संघर्षासाठी सगळ्यांना एकत्र करण्याच्या उद्देशानं 22 नोव्हेंबर 1920 ला अलिगढमध्ये जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना करण्यात आली.

स्वातंत्र्यसैनिक मौलाना महमूद हसन यांनी या विद्यापीठाचा पाया रचला. महात्मा गांधीही यासाठी प्रयत्नशील होते.

हकीम अजमल खान हे या विद्यापीठाचे पहिले चॅन्सलर बनले. महात्मा गांधींनी अल्लामा इक्बाल यांना व्हाईस चॅन्सलर करण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे मग मोहम्मद अली जौहर यांना पहिले व्हाईस चॅन्सलर बनवण्यात आलं.

Image copyright JMI.AC.IN

स्थापना झाल्यानंतर ब्रिटीश राजवटीच्या काळात असे काही राजकीय पेच उभे राहिले, की स्वातंत्र्य संग्रामाच्या संघर्षात जामिया टिकाव धरणार नाही, असं वाटू लागलं. पण अनेक संकटं येऊनही या विद्यापीठाने आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवलं.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणारे रिझवान कैसर सांगतात, "1920 साली चार मोठ्या संस्थांची स्थापना झाली. जामिया मिलिया इस्लामिया, काशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ आणि बिहार विद्यापीठ."

"राष्ट्रवाद, ज्ञान आणि स्वायत्त संस्कृती यावर जामियाचा पाया रचण्यात आला. एक शैक्षणिक संस्था म्हणून जामिया हळूहळू वाढत गेली. जामियाने नेहमीच स्वातंत्र्याची पाठराखण केली असून या मूल्यांचं कायम पालन केलं आहे."

"असहकार चळवळ आणि खिलाफत आंदोलनाच्या वेळी जामिया मिलिया इस्लामियाची भरभराट झाली. पण 1922मध्ये असहकार आंदोलन आणि नंतर 1924मध्ये खिलाफत चळवळ मागे घेण्यात आली आणि जामियाचं अस्तित्व धोक्यात आलं," असं कैसर सांगतात.

या आंदोलनांकडून जामियाला मिळणारं अर्थसहाय्य बंद झालं. जामियाची संकटं वाढायला लागली.

गांधीजींचा जामियाला पाठिंबा

गांधीजींना जामिया मिलिया इस्लामिया कोणत्याही परिस्थितीत सुरु ठेवायचं होतं. गांधीजींच्याच मदतीने हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि अब्दुल मजीद ख्वाजा यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ 1925 मध्ये अलिगढहून दिल्लीच्या करोल बागेत हलवलं, असं जामिया मिल्लिया इस्लामियाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम सांगतात.

Image copyright Getty Images

गांधीजींनी त्यावेळी म्हटलं होतं, "जामिया सुरू राहिलंच पाहिजे. जर तुम्हाला आर्थिक चिंता असतील तर मी यासाठी हातात कटोरा घेऊन भीक मागायलाही तयार आहे."

गांधीजींच्या या वक्तव्यामुळे जामियाशी संबंधित लोकांचं मनोधैर्य वाढलं. गांधीजी निधी उभारण्याचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीशकाळात कोणत्याही संस्थेला जामियाची मदत करून स्वतःसाठी अडचणी निर्माण करून घ्यायच्या नव्हत्या.

शेवटी जामियाला दिल्लीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनीच एक दौरा केला आणि सामूहिक प्रयत्नांनी ही संस्था टिकवून ठेवली.

पुनरुज्जीवनासाठीचे प्रयत्न

दिल्लीत हलवल्यानंतर या संस्थेला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले. युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती आहे. यानुसार तीन मित्रांच्या एका गटाने या संस्थेच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास घेतला. हे होते - डॉ. झाकिर हुसैन, डॉ. आबिद हुसैन आणि डॉ. मोहम्मद मुजीब.

जामियाची जबाबदारी डॉ. झाकिर हुसैन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे संध्याकाळच्या वर्गांमध्ये प्रौढ शिक्षणाची सुरुवात करणं. हा शैक्षणिक उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणारे रिझवान कैसर सांगतात, "जामिया अशी पहिली संस्था आहे जिथे संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षक प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. देशभरातल्या विविध भागांमधून शिक्षक इथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असत."

"या संस्थेला 'उस्तादों का मदरसा' म्हटलं जाई. जामियाचा मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम देशात आघाडीवर आहे."

Image copyright Getty Images

जामियाशी निगडीत सगळ्या संस्था आणि अभ्यासक्रम 1935 मध्ये दिल्लीच्या बाहेर असणाऱ्या ओखला नावाच्या गावात स्थलांतरित करण्यात आले. चार वर्षांनी जामिया मिलिया इस्लामियालाची नोंद एक संस्था म्हणून करण्यात आली.

संस्थेचा विस्तार वाढत होता. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणीही झाली. फाळणीनंतर देशात दंगली झाल्या. प्रत्येक संस्थेला याची झळ बसली पण जामिया थोड्याफार प्रमाणात यापासून दूर राहिली.

त्यावेळी जामियाचा परिसर म्हणजे 'जातीय हिंसेच्या रखरखीत वाळवंटातली एक रमणीय जागा' असल्याचं वर्णन महात्मा गांधींनी केल्याचं विद्यापीठाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

1962 मध्ये जामिया मिलिया इस्लामियाला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला, तर डिसेंबर 1988मध्ये संसदेमध्ये एका विशेष कायद्याद्वारे याला केंद्रीय विद्यापीठाची मान्यता देण्यात आली.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये आज 56 पीएचडी अभ्यासक्रम, 80 मास्टर्स अभ्यासक्रम, 15 मास्टर्स डिप्लोमा, 56 पदवी अभ्यासक्रम आणि शेकडो डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)