सावरकरांचे गायीबद्दलचे 'हे' विचार भाजप-शिवसेनेला झेपतील का?

स्वातंत्र्यवीर सावरकर Image copyright tSAVARKARSMARAK.COM
प्रतिमा मथळा स्वातंत्र्यवीर सावरकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गायीबद्दलचे सगळे विचार तुम्हाला पटले आहेत का किंवा आम्हाला सगळेच विचार कळले आहेत का हे पाहण्याची गरज आहे," असं वक्तव्यं विधानसभेत केलं. तसेच गायीबद्दल भारतीय जनता पार्टीने प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी भूमिका घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

भाजपानं गायीबद्दल घेतलेल्या भूमिकेत कसा बदल दिसून येतो हे सांगण्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला.

पण सावरकर यांचे गायीसंदर्भातील विचार झेपणं कठीण जाईल असं सर्व पक्ष एकमेकांकडे बोट दाखवून का म्हणतात? त्यांचे गायीबद्दलचे विचार नक्की काय होते हे पाहाणं आवश्यक आहे.

'गाय एक उपयुक्त पशू'

सावरकर आणि त्यांचे गायीबद्दलचे विचार स्पष्ट करताना नेहमी त्यांच्या 'गाय एक उपयुक्त पशू आहे' या वाक्याचा नेहमीच उल्लेख होतो. गायीबद्दलचे त्यांचे हे सुप्रसिद्ध विधान त्यांच्या 'क्ष किरण' या निबंधातील दुसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे.

या शीर्षकात सावरकरांनी गाय : एक उपयुक्त पशू, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे असं स्पष्ट म्हटलं आहे. समग्र सावरकर वाड्मयाच्या पाचव्या खंडात हा निबंध समाविष्ट करण्यात आला आहे.

'गोरक्षण आणि गोभक्षण असा भेद ब्रह्मसृष्टीत नाहीच'

ब्रह्मसृष्टीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांबद्दल सावरकरांनी काही रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्रह्मसृष्टीनुसार सर्वांना अगदी पशूंनाही देवाचे अवतार मानण्यावर त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत कोरडे ओढले आहेत.

आपण आज कोणत्या काळात राहात आहोत याचीही आठवण त्यांनी या निबंधात करुन दिली आहे. प्रश्न ब्रह्मसृष्टीतला आणि उत्तर आजच्या मायासृष्टीतले असे केल्यास मोठा गोंधळ उडेल याचीही त्यांनी आठवण दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचे सगळे विचार कळले आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.

"ब्रह्मसृष्टीत जर गाय आणि गाढव समानच आहेत म्हणून गायीचे पंचगव्य पिण्याच्या संस्काराच्या ठायी असते. मग यज्ञादी धर्मविधीत गाढवीचे पंचगाढव्य ब्राह्मणाने प्यावे की काय?" असा प्रश्न ते विचारतात.

"सुबुद्ध आणि दयाशील आणि प्रामाणिक माणसाच्या डोऴ्यांवर धर्माची झापड पडली, की त्याची बुद्धी भ्रंशते असं ते ठामपणे सांगतात. गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारले आहे. भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाही. 'नासतो विद्येत भावः नाभावो विद्यते सतः' ही ब्रह्मसृष्टी. मग गोभक्षण का करु नये," असं ते म्हणतात.

'...तर डुक्कर रक्षण संघ का नको?'

गायीला देव मानून त्याचा अतिरेक केला जातो याबद्दलही सावरकरांनी स्पष्ट विचार मांडले आहेत. गायीत देव आहेत असं पोथ्या सांगतात. आपल्याकडे वराहवतारी देव डुक्कर झाले होते, असंही पोथ्या सांगतात. मग गोरक्षण का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापून डुक्कर पूजा का करु नये? अशी रोखठोक भूमिका ते घेतात.

Image copyright Getty Images

ज्याअर्थी गोरक्षण, गोपूजा, गोभक्ती या कल्पनाच मुळी मायासृष्टीतल्या आहेत तर त्या स्वीकारणं आणि नाकाराणं हे सुद्धा व्यावहारिक, प्रापंचिक आणि तुलनात्मक विवेकानं होऊ शकतात असं सावरकर म्हणतात.

'गायीला देव मानणं म्हणजे माणुसकीला कमीपणा आणणं'

मायासृष्टीत जोवर मनुष्य आणि गाय-बैल हे पशू आहेत. तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांमधिये हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्याला पशूहून कमी मानण्यासारखे आहे आणि माणुसकीला कमीपणा आणण्यासारखे आहे, असं सावरकरांचं मत होतं.

Image copyright SAVARKARSMARAK.COM

मनुष्याहून सर्व गुणांमध्ये अत्युच्च असेलल्या प्रतिकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित आहे. पाहिजे तर गाढवाने त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या गाईस देव मानावे, पण मनुष्याने तसे करण्याचा गाढवपण करु नये, असं ते स्पष्ट करतात.

'शेण खाणं ही शिवी आहे, संस्कार नव्हे'

गायीचं शेण आणि मूत्र प्राशन करण्यावर सावरकर अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका करतात. पंचगव्य प्राशन करणं हा अत्यंत किळसवाणा प्रकार असल्याचं ते सांगतात.

Image copyright Getty Images

हा प्रकार हिंदूकरणाच्या संस्कारात असता कामा नये, असं ते बजावतात. शेण खाणं ही शिवी आहे, संस्कृती नाही असं सावरकरांनी लिहून ठेवलं आहे. रत्नागिरी हिंदू सभेच्या शुद्धिसंस्कारात पंचगव्य बंद केल्याची आठवणही ते करुन देतात.

गायीला देवता मानणं, गोभक्ती करणं हे भाबडेपणा म्हणून सोडून देता येईल पण एखादा पढतमूर्ख त्याचं वैज्ञानिक बुद्धीवादाने समर्थन करत असेल तरे अक्षम्य आहे असं त्यांचं मत होते.

'विज्ञानाचा पाया पाहिजे'

गोरक्षणाची चळवळ धार्मिक आणि भाकडपणाच्या आधारावर न चालवता सुस्पष्ट आणि प्रयोगक्षम अशा आर्थिक आणि वैज्ञानिक पायावर चालवावी असं सावकरांचं मत होतं.

Image copyright Getty Images

उगाच एखादी गाय वा बैल, देव वा देवी म्हणून गावोगाव हिंडवीत भीक मागतात तशांना एक दमडीही कोण देऊ नये, त्या बैलाला कामास जुपवावा आणि त्या भीकमाग्या गोभक्ताला राष्ट्रासाठी वेठीस धरावा, असं सावरकर या निबंधात सांगतात.

'भूमातेस कवितेत सावरकर काय म्हणतात?'

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'भूमातेस' या कवितेमध्येही गायीला देव मानण्यामुळे सगळा देशच गाय झाला, अशी भूमिका मांडली आहे. याबद्दल बोलताना सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "देवासाठी प्रतीकं पशूंमधून निवडायचीच होती तर गायीऐवजी नरसिंहाला तरी निवडायला हवं होतं अशी खंत ते व्यक्त करतात."

त्राता देव नृसिंह सोडुनी पुजूं गाईसची जाय मीवाघाच्या पुढती म्हणुनी बनले गायीहुनी गाय मी

अशी काव्यरचना त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी गोरक्षाबद्दल इतके स्पष्ट विचार मांडले असले तरी उगाच गायीला मारा असं सांगितलेलं नाही याची आठवण रणजित सावरकर करुन देतात. सावरकरांना राजकारणात आणू नये अशी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली असल्याचं तसेच काँग्रेसही आपण सावरकरांचा द्वेष कधीच केलेला नाही असं म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं.

याबाबत बीबीसी मराठीने भाजपाचे प्रवक्ते बीबीसी मराठीशी संपर्क केला असता ते म्हणाले, काँग्रेसला गांधीजींचे विचार पूर्ण पटले आहेत का? काँग्रेस बरखास्त करावी हा विचार काँग्रेसला मान्य आहे का? डॉ. आंबेडकरांचे फाळणीबद्दलचे विचार राजकीय पक्षांना पटले आहेत का?

हे सर्व महापुरुष आहेत. त्यांना समाजाने 100 टक्के स्वीकारलेलं असतं असं नाही. काही महापुरुषांना 90 टक्के काहींना 99 टक्के स्वीकारलेलं असतं. समाजानं त्यांना पूर्णपणे स्वीकारण्य़ासाठी समाजाला शिक्षित करण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी हे काम केलं पाहिजे. भाजपा आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)