CAA: परवेझ मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व द्या- सुब्रह्मण्यम स्वामी #5मोठ्याबातम्या

परवेझ

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. परवेझ मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व द्या- सुब्रह्मण्यम स्वामी

देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या परवेझ मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

परवेझ मुशर्रफ हे मुळचे दिल्लीचे आहेत त्यामुळे त्यांना भारताने नागरिकत्व द्यावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथणे, न्यायाधीशांना अटक करणे असे आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानातील न्यायालयात ठेवण्यात आले होते.

देशामध्ये सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आरोप-प्रत्यारोप, आंदोलने, निदर्शनांचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी ट्विटरवरुन मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

2. निर्भया खटल्यातील दोषीची याचिका फेटाळली, वकिलांना 25 हजारांचा दंड

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी निर्भया खटल्यातील एका दोषी व्यक्तीची याचिका फेटाळली. आपण या घटनेच्यावेळेस अल्पवयीन होतो अशी याचिका केली होती. आता इतक्या उशिरा अशी याचिका करू शकत नाही असे म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

खटल्यामध्ये वेळकाढूपणा करून वेळ वाया घालवल्याबद्दल या दोषीचे वकील ए. पी. सिंह यांना न्यायाधीश सुरेश कैत यांनी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यांच्यावर बार कौन्सीलने कारवाई करावी असेही न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

3. फक्त मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 10 रुपयांत जेवण

विधानसभा निवडणुकीत 10 रुपयांमध्ये जेवण देण्याचे आश्वासन शिवसेनेने सध्यातरी फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुरते पाळले आहे.

मुंबई महापालिकेच्या उपाहारगृहात 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्याचा उपक्रम महापौर किशोर पेडणेकर यांच्याहस्ते सुरू करण्यात आला. मात्र ही 10 रुपयांची थाळी केवळ पालिकेच्या कर्मचाऱ्यासंसाठीच आहे. बाहेरच्या व्यक्तींना पालिकेच्या कॅन्टीनमध्ये 10 रुपयांमध्ये थाळी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. अण्णांचे आजपासून मौनव्रत

महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन सुनावणी, आरोपींना शिक्षा करण्याची प्रक्रिया जलद व्हावी या मागणीसाठी अण्णा हजारे आजपासून (शुक्रवार) राळेगणसिद्दीत मौनव्रत करणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

पोलिसांचा तपास, तपासानंतर न्यायालयात होणारी सुनावणीची प्रक्रिया जलद असली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाइनचे काम योग्य असले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने पोलीस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने न्यायाधीशांची पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. अशा अनेक मागण्यांसाठी आपण मौनव्रत धारण करणार आहोत पत्रक अण्णा हजारे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. CAA सारख्या कायद्याची मनमोहन सिंह यांनी मागणी केल्याचा भाजपचा दावा

काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 2003 साली राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी असताना नागरिकत्व सुधारणा विधेयकासारख्याच उपाययोजनेची मागणी केली होती असा दावा भाजपने केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या शेजारील देशांमधून आश्रयासाठी येणाऱ्या शरणार्थींच्याबाबतीत सरकारनं उदार भूमिका घेतली पाहिजे असं ते राज्यसभेत बोलताना म्हणाले होते. या व्हीडिओमध्ये राज्यसभेत सत्ताधारी बाकांवर तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि केंद्रीय मंत्री प्रमोद महाजनसुद्धा बसल्याचे दिसते. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)