CAA Mumbai Protest: जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधी आंदोलकांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबई आंदोलन

फोटो स्रोत, PTI

"आपण सगळे इथे एकाच गोष्टीसाठी आलो आहोत. तुम्हाला निषेध करायचाय, यांना बातमी द्यायची आहे, तसंच आम्हाला आमचं काम करायचंय. हे सगळं शांततेत होईल ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे."

"ते ठीक आहे, पण तुम्ही लाठ्या घेऊन का आला आहात?"

"ताई, तो आमच्या गणवेशाचा भाग आहे. तुम्ही घाबरू नका, फक्त रस्ता अडून लोकांना त्रास होणार नाही, कुणाचं नुकसान होणार नाही, याची आपण सगळे काळजी घेऊ या."

कलिनातल्या मुंबई विद्यापीठाच्या मुख्य दरवाजापाशी सोमवारी दुपारी आंदोलनापूर्वी झालेला हा संवाद. त्या विभागातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं जमलेले विद्यार्थी आणि पत्रकारांना प्रवेशद्वारावर थांबवून आंदोलन करताना नियमांचं पालन करायची विनंती केली.

मुंबईत CAA विरोधातली निदर्शनं एवढ्या शांततेत का सुरू आहेत, ते यातून स्पष्ट होतं. त्यामुळेच तर गुरुवारी हजारोंचा समुदाय जमा झाल्यावरही मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातली सभा निर्विघ्नपणे पार पडली, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं नाही.

एकीकडे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका होत असताना, मुंबईत मात्र आयोजकांनी निषेधाची सभा संपताना स्टेजवरून पोलिसांचे आभार मानले.

ट्विटरवर मुंबई पोलिसांचं कौतुक

आंदोलनात सहभागी झालेल्या फरहान अख्तर, हुमा कुरेशी या अभिनेत्यांसह अनेकांनी ट्विटरवरून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter

कॉमेडियन साहिल शहाने लिहिलं, "तुम्ही आंदोलनासाठी आला असाल तर माझी विनंती आहे की मी केलं तसं करा. इथं उभ्या असलेल्या प्रत्येक पोलिसाला धन्यवाद म्हणा. हा दिवस त्यांच्यासाठीही तणावपूर्ण होता, त्यांनी चांगलं काम केलं तर कुणी त्यांचे आभार मानत नाही. तुम्ही आभार मानल्यावर त्यांचं हास्य अगदी निर्मळ असतं."

फोटो स्रोत, Twitter

कसा होता ऑगस्ट क्रांती मैदानातला बंदोबस्त?

नागरिकत्व कायद्यातील सुधारणेविरोधात 19 डिसेंबरला झालेल्या सभेत मुंबईतील विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डाव्या विचारसरणीचे पक्ष सहभागी झाले होते.

आधी ही सभा मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळ घेतली जाणार होती, पण मोठी गर्दी होण्याची शक्यता दिसल्यावर पोलिसांनी तिथं सभेला परवानगी दिली नाही.

ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजे पूर्वीचं गोवालिया टँक मैदान, हे मुंबईतलं एक ऐतिहासिक मैदान आहे. 1942 साली याच मैदानातून ब्रिटिशांना 'चले जाव' असं ठणकावलं होतं आणि एका मोठ्या अंहिसात्मक आंदोलनाला सुरुवात झाली होती.

गुरुवारी सकाळीच ऑगस्ट क्रांती मैदानालगतचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचं पोलिसांनी सोशल मीडियातून जाहीर केलं. तसंच पार्किंगची सोय कुठे आहे, त्याची माहितीही दिली.

आम्ही मैदानाजवळ पोहोचलो, तेव्हा सगळीकडे पोलिसांची उपस्थिती दिसत होती. तिथं मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्व आंदोलकांना स्कॅनरमधून जावं लागत होतं. CCTVवरून सर्व परिसरावर नजर ठेवली जात होती. बॅरिकेड्स लावून रस्ता नीट आखण्यात आला होता आणि मीडियाला बॅरिकेड्सच्या एका बाजूला थांबण्याची परवानगी दिली होती. कुणी उगाच इकडे तिकडे भटकताना दिसलं की पोलिस त्यांना हटकायचे.

अभिनेते आणि अन्य व्हीआयपींना दुसऱ्या प्रवेशद्वारातून मैदानात प्रवेश दिला जात होता. आतही विद्यार्थी आणि स्वयंसेवक आंदोलनासाठी आलेल्या वेगवेगळ्या गटांना ठरलेल्या जागी नेताना आम्हाला दिसले.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सगळं सुरळीत पार पडावं यासाठी मुंबई पोलिसांनी आदल्या दिवशीच त्यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यामुळं हे आंदोलन शांततेत पार पडलं, त्यात पोलिसांइतकंच आंदोलनकर्त्यांनीही महत्त्वाची भूमिका पार पाडली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)