Jharkhand Exit Poll: भाजपची सत्ता जाऊ शकते, असा एक्झिट पोल्सचा अंदाज

रघुबर दास Image copyright ANI

झारखंड विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान संपलं आहे आणि एक्झिट पोल्सचे अंदाज येऊ लागले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन पोल्सचा अंदाज आहे की तिथली भाजपची सत्ता जाऊ शकते.

इंडिया टुडे-My Axisचा अंदाज आहे की काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट बहुमत मिळू शकतं. तर IANS-CVoter-ABPचा अंदाज आहे की त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊ शकते.

झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत आणि बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. सोमवार, 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

भाजप काँग्रेस-झामुमो-राजद इतर
इंडिया टुडे-My Axis 22-32 38-50 5-7
IANS-CVoter-ABP 28-36 31-39

भाजपला 2014 साली 37 जागा मिळाल्या होत्या.

81 जागांच्या झारखंड विधानसभेसाठी 5 टप्प्यांमध्ये मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 13, दुसऱ्या 20, तिसऱ्या 17 आणि चौथ्या टप्प्यात 15 आणि पाचव्या टप्प्यात 16 जागांसाठी मतदान घेण्यात आलं.

झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारीला संपुष्टात येणार आहे. सध्या झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचं सरकार आहे. 2000 साली बिहारपासून वेगळं काढण्यात आलेल्या झारखंडचे पाच वर्ष पूर्ण करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

2014च्या निवडणुकीत भाजपला 37 जागांवर विजय प्राप्त झाला होता. त्यावेळी बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजपला झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांनी पाठिंबा दिला होता.

भाजपनं गेल्या 5 वर्षांत राज्यात विकासाची गंगा आणल्याचं भाजपचं म्हणणं आहे. झारखंड निवडणुकीत विरोधकांनी बेरोजगारी, मागासवर्गीयांना आरक्षण, वाढतं स्थलातंर, भ्रष्टाचार, कुपोषण आदी मुद्द्यांना प्रचारात जोर देण्यात आला आहे.

याशिवाय झारखंडच्या निवडणुकीत कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, नरेंद्र मोदींची विश्वासार्हता हे मुद्दे परिणामकारक ठरतील, असं मत भाजपचे झारखंडचे प्रवक्ते दीनदयाल वर्णवाल यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

मात्र देशभरात सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानामुळे या निकालांकडे सर्वांत लक्ष लागून आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)