CAA विरोधी आंदोलनात उत्तर प्रदेशात 9 जणांचा मृत्यू

लखनौ

फोटो स्रोत, Getty Images

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनांमध्ये उत्तर प्रदेशात मृतांचा आकडा नऊपर्यंत गेला आहे.

दिल्लीतही रात्री उशिरापर्यंत निदर्शनं सुरू होती.

लखनौमध्ये गुरुवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीमुळे पोलीस शुक्रवारच्या नमाजानंतर अधिक सतर्क झाले होते.

उत्तर प्रदेश पोलीस महानिर्देशक ओपी सिंह यांनी मृतांचा आकडा नऊवर गेल्याचं स्पष्ट केलं. हा आकडा वाढूही शकतो असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशात आतापर्यंत 218 लोकांना अटक करण्यात आली आहे. विरोध भडकावणाऱ्यांमध्ये एनजीओ, राजकीय पक्षांचा समावेश असू शकतो. आम्ही प्रत्येक मुद्याची शहानिशा करत आहोत. कोणालाही मोकळं सोडलं जाणार नाही."

पुन्हा एकदा हिंसा होण्याच्या शक्यतेमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी गस्त वाढवली होती. लखनौमध्ये गुरुवारसारखी घटना पुन्हा घडली नाही परंतु लखनौ वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त निदर्शनच नाही तर त्याला हिंसक वळणही लागलं. हिंसक निदर्शनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली.

निदर्शकांचे मृत्यू

कानपूर, संभल, फिरोजाबाद प्रत्येकी एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे तर बिजनौरमध्ये दोन लोकांचे प्राण गेले आहेत.

बिजनौरमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे मुरादाबाद विभागाचे पोलीस महानिरीक्षक नवीन अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. फिरोजाबादमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू झाला. काही निदर्शकांबरोबरच आठ पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

फिरोजाबादमधील निदर्शकांनी एक बसही पेटवून दिली आहे. तर मेरठमध्ये पोलिसांच्या गोळीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे परंतु त्याची पडताळणी झालेली नाही.

पेट्रोल बाँबचा वापर

याशिवाय गोरखपूर, मऊ, अमरोहा, बहराइच, बुलंदशहर, बिजनौर येथे निदर्शनांच्यावेळेस दगडफेक, आग लावणे आणि गोळीबाराच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

कानपूरमध्ये पोलीस आणि निदर्शकांच्या गोळीबारात आठ लोक जखमी झाल्याची बातमी मिळत आहे. बाबूपुरवा आणि यतीमखाना परिसरामध्ये काही घरांमधून दगड आणि पेट्रोल बाँब फेकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शनं

कानपूर क्षेत्राचे अतिक्त पोलीस महानिदेशक प्रेम प्रकाश म्हणाले, काही भागांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर लहान-मोठ्या हिंसक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी लोक तोंडाला फडकं बांधून हिंसक घटनांमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांची ओळख पटवली जात आहे.

बिजनौरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी मोठ्या संख्येमं निदर्शनं केली. त्यामध्ये काही लोकांनी भरपूर दगडफेक केली. काही पत्रकारही जखमी झाले आहेत आणि हिंसेमध्ये एका व्यक्तीचे प्राण गेले आहेत. अशाच घटना गोरखपूर, मऊ, बहराइच, हापूडसारख्या इतर शहरांमध्ये घडल्या आहेत.

पंतप्रधानांना आणि भाजपाला जावं लागेल...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनात भाजपा सरकारसह पंतप्रधानांवरही टीका केली. मध्यरात्री विधेयक मंजूर करुन त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं असं सांगत ममता यांनी या विधेयकाच्य़ा मतदानात पंतप्रधानांनी सहभाग घेतला नसल्याची आठवण करुन दिली.

फोटो स्रोत, ANI

पंतप्रधान त्या मतदानावेळेस संसदेत नव्हते याचा अर्थ त्यांचा या विधेयकाला पाठिंबा नव्हता. जर ते या कायद्याला पाठिंबा देत नाहीत तर त्यांनी हा कायदा नाकारावा.

स्वातंत्र्याच्यावेळेस भाजपा नव्हती तर आता या देशात कोण नागरिक राहील आणि कोण नसेल हे भाजप कसं ठरवू शकेल असा प्रश्नही ममता यांनी उपस्थित केला.

"तुम्ही स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हता. तुमच्या पक्षाचा जन्म 1980 साली झाला. तुम्ही गांधी, नेहरु, पटेल, आझाद, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर नव्हता. तुम्ही पाच वर्षे सत्तेत राहिल्यावर आता कोण नागरिक असेल किंवा नसेल हे ठरवत आहात", अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे.

"आम्ही काय खायचं हे सुद्धा भाजपा ठरवत आहात. एअर इंडियामध्येसुद्धा आता फक्त शाकाहारी जेवण मिळतं. पूर्वी असं नव्हतं. हिंदुस्तानची लोकशाही मजबूत आहे, मजबूर नाही. सर्व लोक एकत्र येऊन काम करतील. हिंदुस्तानातले सर्व प्रांत एकत्र होतील आणि भाजपच्या लोकांना जेलमध्ये टाकेल. उत्तर प्रदेशात काल कोणाचा गोळीमुळे मृत्यू झाला तर तिथले मुख्यमंत्री यांना आणखी गोळ्या घातल्या पाहिजेत असं म्हणतात. त्यांना लाज वाटली पाहिजे." असंही त्या म्हणाल्या.

दिल्लीत उशिरापर्यंत निदर्शनं

दिल्लीमध्ये काल रात्री उशिरापर्यंत निदर्शनं सुरू होती. दिल्लीतील पोलीस मुख्यालयासमोर काल आंदोलक जमा झाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)