कर्जमाफी: उद्धव ठाकरे यांनी केली 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी यांचा आक्षेप

उद्धव ठाकरे Image copyright OfficeOfUT

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.

"ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे. मार्च 2020पासून ही योजना लागू होईल," असं ते विधानसभेत म्हणाले.

"कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल," असंही ते म्हणाले.

"नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यां साठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल," असंही उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं.

Image copyright Twitter

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या या घोषणेला विरोध केला आहे. "सातबारा कोरा करणार, असं म्हणत होता, ते कधी होणार आहे? सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचा शब्द हे सरकार पाळत नाहीये. त्यामुळे आम्ही सभात्याग करतो," असं त्यांनी म्हटलं.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "या अधिवेशनात एक नवा पैसादेखील या सरकारनं दिलेला नाही. राष्ट्रपती शासन असताना राज्यपालांनी 8 हजार प्रति हेक्टर दिले आहेत. एवढेच पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हेक्टरी 25 हजार देण्याचं आश्वासन न पाळता या सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे."

"सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा या आश्वासनावरून सरकार पलटलं आहेत. ही कर्जमाफी उधारीची आहे. मार्चमध्ये कर्जमाफी करणार आहेत. आता याचे तपशील दिले नाहीत. 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीत शेतकरी सातबारा कर्ज होतो का? आमच्या सरकारनं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. त्यात पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज होतं. पण, आताच्या कर्जमाफीत याचा उल्लेख नाही. या घोषणेचा नेमका फायदा किती शेतकऱ्यांना होणार, याबाबत संभ्रम आहे," असंही ते म्हणाले.

Image copyright Twitter

अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं, "कोणत्याही अटी-शर्थींशिवाय हे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणताही ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाहीये. बँकांच्या दारात जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचं थकित कर्ज आपोआप माफ होईल."

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, "कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा जो जीआर निघेल, त्यात सगळा तपशील असेल."

"ही कर्जमुक्ती आहे, पुढे चालून आम्ही चिंतामुक्तीही करू. विरोधकांकडे मी लक्ष नाही देत," अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

'सातबारा कोरा होत नाही'

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र या घोषणेवर प्रश्न उपस्थित केलेत. ते म्हणाले, "सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सप्टेंबर 2019पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यानं ते पूर्ण होत नाही. पण, गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पिकावर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय. त्यांना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नाही."

तर शिवसेना नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीस सरकारच्या दीड लाखाच्या कर्जमाफीत 21 टक्के शेतकरी वंचित राहिले होते. आता 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 92 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राजू शेट्टी म्हणतात तसं, ऑक्टोबर 2018मध्ये पडलेल्या पावसामुळे तेव्हाच्या पिकावर घेतलेल्या कर्जाविषयी विचार करण्यात येईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)