हैदराबाद एन्काउंटर: बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मृतदेहांचं पुन्हा पोस्टमॉर्टम होणार

बंदूक Image copyright Getty Images

तेलंगणा हायकोर्टानं शनिवारी (21 डिसेंबर) हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याविषयी सुनावणी केली. या मृतदेहांचं 23 डिसेंबरला पुन्हा एकदा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्याचा आदेश न्यायालयानं दिला.

27 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेची हत्या आणि बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 6 डिसेंबरला 4 आरोपींचं कथित एन्काउंटर केलं होतं.

या चारही आरोपींच्या मृतदेहांना गेल्या काही दिवसांपासून हैदराबादच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.

न्यायालयात काय झालं?

न्यायालयात गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक श्रवण उपस्थित होते. मृतदेहांना फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

असं असलं तरी, मृतदेह 50 टक्के खराब झाले आहेत आणि पुढील 7 ते 10 दिवसांत ते पूर्णपणे सडतील.

देशातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये या मृतदेहांना पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी पर्याय आहे का, असं न्यायालयानं त्यांना विचारलं. पण, आपल्याला याची काही माहिती नाही, असं श्रवण यांनी सांगितलं.

एडव्होकेट जनरल (एजी) यांनी सांगितलं, "याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा पोस्टमॉटर्म करण्यासाठी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. पण, पोस्टमॉर्टम पुन्हा करायचं असल्यास ते तेलंगणाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी करायला हवं."

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

पोस्टमॉटर्मची मागणी

एमिकस क्यूरी (कोर्टाचे सहकारी) प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं, "याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची मागणी केली आहे. एजी म्हणताहेत त्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या जनहित याचिकेची गरज नाहीये."

सर्वोच्च न्यायालयात आपल्या आदेशात महत्त्वपूर्ण पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचं सांगितलं आहे.

Image copyright Getty Images

"एखाद्या स्वतंत्र संस्थेला पुन्हा एकदा पोस्टमॉटर्मची करायला दिलं, तर या प्रक्रियेविषयी विश्वास निर्माण होईल. हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी मृतदेहाच्या स्थितीविषयी सांगितलं आहे, ते पुढच्या 10 दिवसांत पूर्णपणे सडतील. त्यामुळे लवकरात लवकर मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करणं गरजेचं आहे," असंही रेड्डी म्हणाले.

यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयानं 23 तारखेच्या संध्याकाळी 5 पर्यंत या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्याचा आदेश दिला.

मेडिकल बोर्ड करेल पोस्टमॉटर्म

पोस्टमॉटर्मची करताना त्याचा व्हीडिओ बनवण्यात येईल. पुराव्यांना सीलबंद आच्छादन ठेवण्यात येईल.

हे पोस्टमॉर्टम मेडिकल बोर्ड ऑफ इंडिया करेल. पोस्टमॉटर्मनंतर या मृतदेहांना पोलिसांच्या देखरेखीखाली कुटुंबीयांना सोपवण्यात येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)