प्रणिती शिंदे: तर आज विरोधक सत्तेत असते आणि आम्ही त्यांच्या बाकावर #5मोठ्या बातम्या

प्रणिती शिंदे, महाराष्ट्र

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

आमदार प्रणिती शिंदे

आजचे पेपर आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. तर आज विरोधक सत्तेत असते आणि आम्ही त्यांच्या बाकावर: प्रणिती शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मार्च 2020 पासून ही योजना कार्यान्वित होणार असून, सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केव्हा करणार या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला. यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, विदर्भाच्या सुपुत्राने वॉकआऊट केला परंतु विदर्भाच्या नातवाने (उद्धव ठाकरे) न्याय दिला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

सुरुवातीला बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी विदर्भाचा नातू असल्याचं म्हटलं होतं. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत असं ते म्हणाले होते.

उद्धव ठाकरे यांना सर्वांबद्दल आदरभाव आहे. ते सभागृहात सर्वांशी हात जोडून बोलत आहेत. त्यांनी सभागृहात काही गोष्टींवरून माफीही मागितली. एवढीच आदराची भावना जर विरोधकांमध्ये असती तर आज कदाचित आम्ही विरोधी बाकांवर बसलो असतो असंही त्या म्हणाल्या.

2.आपले पंतप्रधान फक्त भाषण करू शकतात: अनुराग कश्यप

''आमचे प्रधानसेवक, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहिरे आणि मुके आणि भावनाशून्य आहेत. ते नाटक करत असून फक्त चांगले भाषण देऊ शकतात. त्यांना आता काही दिसत नाही, ऐकायला येत नाही. कारण ते सध्या नव्या आणि खोट्या गोष्टी शिकण्यात व्यग्र आहेत,'' असं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन,

अनुराग कश्यप

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा जे विरोध करत आहेत ते गद्दार आहेत असं समजलं जातं. संविधानासाठी लढणं, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं आणि सरकारला विरोध करणं गद्दारी असेल तर मी गद्दार आहे आणि ही तुमच्या मोदी भक्तीपेक्षा मोठी देशभक्ती आहे असं कश्यप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

ते पुढे म्हणतात, जे रस्त्यावर उतरले ते देशद्रोही नाहीत, तर जे सत्तेत आहेत ते देशद्रोही आहेत. देश जनता आणि संविधानामुळे अबाधित आहेत, सत्ताधाऱ्यांमुळे नाही. मोदी-शहा यांच्याआधीही देश होता आणि यापुढेही राहील. पण भाजपचा हा देशद्रोह सहन करण्यासारखा नाही. देशभक्ती ही भाजपला सिद्ध करावी लागणार आहे, आम्हाला नाही, असं अनुराग कश्यप म्हणाले.

3. नीरव मोदी साक्षीदारांना धमकावतोय: सीबीआय

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल हा साक्षीदारांना धमकावत असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. 'सामना'ने ही बातमी दिली आहे. सीबीआयने मुंबईतील न्यायालयात याबाबत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.

आशिष लाढ, जिग्नेश शहा, विपीन समिथ, निलेश मिस्त्री, श्रीधर मयेकर, नेताजी मोहिते, सुबे जॉर्ज, ऋषभ जेठवा, सोनू शैलेश मेहता हे याप्रकरणी सीबीआयचे साक्षीदार आहेत.

4. शशी थरुर यांच्याविरोधात अटक वॉरंट

हिंदू समाजातील महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तिरुवनंतपुरम कोर्टाने थरुर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. शशी थरुर यांनी त्यांच्या एका पुस्तकात हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. थरुर कोर्टात उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे वॉरंट जारी करावं लागलं. 'मटा'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

शशी थरुर

यापूर्वी चुकीचा नकाशा ट्विटरवर अपलोड केल्यामुळे थरुर यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. इंदिरा गांधी यांच्यासंदर्भातील एका ट्वीटमुळेही ते अडचणीत सापडले होते.

5. जानेवारी 2020 मध्ये मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस धावणार

खाजगी तत्त्वारील तेजस एक्स्प्रेस जानेवारी 2020 पासून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. तेजस एक्स्प्रेसचे दर इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत जास्त असतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये देशातली पहिली खाजगी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ या मार्गावर धावली. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या दोन्ही खाजगी एक्स्प्रेस चालवण्यात येतील.

मुंबई-अहमदाबाद सकाळी 6.40वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.10वाजता अहमदाबादला पोहोचेल. मुंबई सेंट्रलहून ही गाडी दुपारी 3.40ला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री मुंबईला 9.55 वाजता पोहोचेल. गुरुवारव्यतिरिक्त अन्य सर्वदिवशी ही ट्रेन धावेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)