Space Technology: सर्वाधिक अंतराळ कचरा भारतामुळे होतो आहे का? - रिअॅलिटी चेक

  • प्रतिक जाखर
  • रिअॅलिटी चेक टीम
अंतराळ

फोटो स्रोत, ESA

भारताच्या "बेजबाबदार" अंतराळ मोहिमांमुळे अंतराळ कचरा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांमागील वास्तवाचा शोध घेणाऱ्या बीबीसी रिअॅलटी चेकच्या टीमने भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात किती कचरा होतो आणि जगाच्या तुलनेत त्याचं प्रमाण किती, हे शोधण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या अंतराळ मोहिमांवर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी वक्तव्य केलं. "भारत अंतराळ कचऱ्याचा मोठा स्रोत" असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणजेच भारतामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अंतराळात पाठवलेल्या जुन्या रॉकेट्सचे किंवा निकामी झालेल्या उपग्रहांचे हजारो तुकडे अंतराळात विशेषतः पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. यालाच अंतराळ कचरा म्हणतात.

भारताने चंद्रयान-2 या मोहिमेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात चंद्रावर पाठवलेल्या उपग्रहाचे तुकडे म्हणजेत कचरा NASA या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला सापडला आहे. त्याचाच धागा पकडत पाकिस्तानचे ज्येष्ठ राजकीय नेते फवाद चौधरी यांनी हा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, AAMIR QURESHI

फोटो कॅप्शन,

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि पंतप्रधान इम्रान खान

मात्र, या आरोपाला काही आधार आहे का? भारतामुळे खरंच अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होतो आहे का?

अंतराळात नेमका किती कचरा आहे?

अंतराळात 10 सेंमीपेक्षा मोठे जवळपास 23,000 तुकडे आहेत आणि US Space Surveillance Network ही संस्था या कचऱ्याची नोंद ठेवते, अशी माहिती Orbit Debris Programme Office (ODPO) या नासाच्या विभागाने दिली आहे. दोन हजार मानवनिर्मित उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक यासोबतच हा सर्व कचरा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1,250 मैलाच्या परिघात फिरत आहे.

फोटो स्रोत, ESA

फोटो कॅप्शन,

अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी नवे मार्ग शोधले जातायत.

अशा परिस्थितीत हा कचरा आदळण्याची शक्यता अधिक आहे आणि अंतराळातला बराच कचरा हा अशाच प्रकारच्या अपघातांमुळे तयार झाला आहे.

चीनने 2007 साली अंतराळातील आपल्या एका हवामानविषयक उपग्रहावर मारा करत क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्यावेळी अंतराळ कचऱ्याचे जवळपास 3000 तुकडे तयार झाल्याचा अंदाज आहे.

तर 2009 साली अमेरिका आणि रशिया यांच्या दोन उपग्रहांमध्ये धडक झाली होती. त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अंतराळ कचरा तयार झाल्याचं ODPO ने म्हटलं आहे.

अंतराळ कचऱ्यासाठी भारत किती जबाबदार आहे?

ODPO ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, रशिया आणि चीन ही तीन राष्ट्र सर्वाधिक अंतराळ कचरा करतात. भारताचा या पहिल्या तिघांमध्ये समावेश नाही.

असं असलं तरी भारताकडून होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाणही वाढत आहे. 2018 साली भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे 117 तुकडे अंतराळात फेकले गेले तर 2019 साली ही संख्या वाढून 163 वर पोचली.

यावर्षी मार्चमध्ये भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी (Anti-Satellite Missile Test - ASMT) घेतली. अशी चाचणी घेणारा भारत चौथा देश ठरला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

चाचणीमुळे होणारे तुकडे पृथ्वीच्या कक्षेत फेकले जाणार नाही, इतक्या उंचीवर चाचणी घेतल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र, अमेरिकेने या चाचणीला विरोध केला आहे. या चाचणीच्या तीन महिन्यांनंतर यातून निर्माण झालेले 50 तुकडे सापडल्याचा दावाही नासाने केला होता.

अमेरिका स्थित Secure Earth Foundation या संस्थेत अंतराळविषयक कायद्याचे सल्लागार असलेले ख्रिस्तोफर डी जॉन्सन यांच्या मते अंतराळ कचऱ्याच्या समस्येत भारतानेही भर घातली आहे.

बीबीसीशी बोलताना जॉन्सन म्हणाले, "दशकभरापूर्वी चीनने राबवलेले उपक्रम तांत्रिकदृष्ट्या वाईट होते किंवा गेल्या काही वर्षांत कचरा निर्माण करणाऱ्या भारताला हे माहिती असायला हवं होतं की याचा पृथ्वीवरील प्रत्येकावर परिणाम होणार आहे. हे मुळात मुद्देच नाहीत."

"आपण मागच्या घटनांपासून धडा घ्यायला हवा आणि आणि आपल्याला हे कळायला हवं की अंतराळ वापरण्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेला अंतराळ कचऱ्यामुळे बाधा पोचते आणि हा अंतराळ कचरा निर्माण करायला मान्यता मिळावी, असं कुठलंही ठोस आणि स्वीकार्य कारण नाही."

अंतराळ कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत?

कार्यान्वित असलेले हजारो उपग्रह आणि वेगवेगळ्या देशांच्या येऊ घातलेल्या अवकाश मोहिमा यामुळे आधीच अंतराळात खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांची आपापसात धडक होण्याची, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

मात्र, अंतराळ पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या उपग्रहविरोधी चाचण्यांवर लगाम लावण्यासाठी कुठलेही नियम किंवा दिशानिर्देश नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

अंतराळ कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक देश आणि काही खाजगी कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हार्पून, जायंट मॅगनेट, नेट्स, लेसर तंत्रज्ञान असे अनेक प्रयोग सुरू आहेत.

दरम्यान, पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळ कचरा हटवण्यासाठी युरोपीय अंतराळ संस्था 2025 साली एक मोहीम राबवणार आहे.

तर अंतराळ पर्यावरण स्वच्छ राखणं आणि तिथला कचरा काढणं "तांत्रिक आणि आर्थिक आव्हान" आहे, असं नासाचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)