उद्धव ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीसांची टीका : आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही #5मोठ्याबातम्या

अमृता फडणवीस Image copyright Twitter

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात पाहूया.

1. ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही - अमृता फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. "ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं," असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या बातमीवरून शिवसेनेवर टीका केली होती.

"ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी खरं आणि तत्वनिष्ठं असावं लागतं. लोकांच्या भल्यासाठी काम करावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्ता यांच्या कार्यपद्धतीपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या हितासाठी तत्त्वनिष्ठ विचार करण्याची गरज असते," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

2. कर्जमाफीचा पैसा आणणार कुठून ? - रामदास आठवले

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे फक्त दोन लाख रापयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. पण त्यासाठी लागणारा निधी कोठून आणणार, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे.

ई-सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

ही घोषणा अन्यायकारक असल्याची टीकाही रामदास आठवले यांनी केली आहे. रविवारी (22 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Image copyright Twitter

काँग्रेस आणि शिवसेनेत सावरकर यांच्यावरून मतभेद आहेत. असे अनेक मुद्दे भविष्यात समोर येतील. त्यामुळे समान विचारसरणी असलेल्या शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावं, असंही आठवले यांनी म्हटलं.

3. मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी

नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशातील लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी आणि शाह तरूणांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहेत, असं ट्विट गांधी यांनी केलं आहे. ही बातमी पुढारीने दिली आहे.

"भारताच्या प्रिय तरूणांनो, मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तुमच्या मनातल्या रागाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण केल्याबद्दलच्या तुमच्या संतापालाही ते सामोरे जाऊ शकत नाहीत म्हणून ते आपल्या देशात दुही माजवत आहेत, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

Image copyright Getty Images

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. प्रियंका गांधी यांनी रविवारी (22 डिसेंबर) उत्तर प्रदेशमधील बिजनोरमध्ये जाऊन सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्धच्या आंदोलनात जीव गमावलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला, अशी बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने दिली आहे.

4. पोलीस कारवाईच्या चौकशीची जामिया विद्यापीठाची मागणी

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनावेळी विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या प्रवेशाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी विनंती जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर केलेल्या नवीन अहवालात केली आहे.

विद्यापीठाने या आधी 15 व 16 डिसेंबर दरम्यान झालेल्या घटनांबाबत आधीच एक अहवाल सादर केला होता. नवीन अहवाल 20 डिसेंबर रोजी सादर करण्यात आला असून याप्रकरणी समिती नेमून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, असं यात म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

जमावाचा पाठलाग करताना पोलीस विद्यापीठ आवारात द्वार क्रमांक 4 व द्वार क्रमांक 7 मधून आत आले. त्यांनी कुलूपही तोडले. रक्षकांना मारहाण केली. वाचनालयाची दारे व काचा फोडल्या.

ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यांना मारहाण केली. वाचनकक्षात अश्रुधुराची नळकांडी फोडली. विद्यापीठ आवार व ग्रंथालय येथे प्रवेशाची परवानगी विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिली नसतानाही पोलीस आत घुसले. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. न्यू फ्रेंड्स कॉलनी व कालकाजी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले. पोलिसांनी विद्यापीठात केलेल्या प्रवेशाची बेकायदा चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, असं विद्यापीठानं म्हटलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. उत्तर प्रदेश सरकारकडून हिंसाचाराची 'वसुली'; 67 दुकाने सील

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित जबाबदार लोकांकडून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. आता, या नुकसानीची वसुली सुरू झाली असून जवळपास 67 दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. या दुकान मालकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला होता. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या हिंसेत सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले होते.

प्रशासनाने मुझफ्फरनगरमधील 67 दुकानांना सील लावले आहे. लखनौ आणि संबळमध्ये अद्याप कारवाई सुरू झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुझफ्फरनगरमधील मिनाक्षी चौक आणि परिसरातील दुकानांना सील करण्यात आले आहे. या परिसरातील लोकांकडून हिंसाचार करण्यात आला असल्याची माहिती एसएसपी अभिषेक यादव यांनी दिली.

ही दुकाने आधीच बंद का होती आणि दुकानांजवळ जमाव का जमला होता याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सील करण्यात आलेले दुकानांचे मालक हिंसाचारात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)