काश्मीर: भारत-पाकिस्तान युद्धानंतर ताटातूट झालेल्या कुटुंबाची गोष्ट

  • आमिर पीरजादा आणि फरहात जावेद
  • बीबीसी प्रतिनिधी
काश्मिरी कुटुंब

1971च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्षं लोटली आहेत. मात्र या युद्धाच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत.

दोन शेजाऱ्यांमधलं हे युद्ध जवळपास 13 दिवस चाललं. या युद्धामुळे ताटातूट झालेल्या लोकांसह संपूर्ण उपखंडाचंच नुकसान झालं. ही कहाणी आहे त्या चार गावांची जिथल्या माणसांची या युद्धाने कायमची ताटातूट केली.

तुरतूक, त्याक्षी, चालुंका आणि थांग ही चार गावं लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अगदी उत्तर टोकाला आहेत. लद्दाख भाग हा बौद्ध बहुल आहे. मात्र, या चार गावांमध्ये बाल्ती भाषिक मुस्लीम राहतात.

1947च्या फाळणीनंतर ही गावं पाकिस्तानचा भाग होती. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या 1971च्या युद्धाने या गावांची ओळख कायमची बदलली. भारताने ही चारही गावं काबिज केली होती.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावांमध्ये 2010 पर्यंत बाहेरच्या व्यक्तीला जाण्यास बंदी होती. मात्र, 2010 साली पहिल्यांदा पर्यटकांनी तूरतुक गावात पाय ठेवला.

युद्धामुळे किती लोक वेगळे झाले याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी 250 कुटुंबांची ताटातूट झाल्याचं गावकरी सांगतात.

आजवर दोन्ही बाजूंच्या अनेक कुटुंबांनी व्हिसासाठी अर्ज केले. मात्र, त्यांचे अर्ज कायमच फेटाळण्यात आले आहेत. आतापर्यंत केवळ 23 व्यक्तींनाच व्हिसा मिळाला आहे.

भारतातील लोकांना पाकिस्तानातील आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी परवानगी मिळाली तरीदेखील सीमेपार जाण्यासाठी त्यांना पंजाबला जावं लागतं आणि तिथून पाकिस्तानातील बाल्टीस्तानात जायला दुसरं परमिट मिळवावं लागतं. शेतकरी असलेल्या या गावकऱ्यांना एवढ्या लांबच्या प्रवासाचा खर्च परवडणारा नाही.

खरं तर ताटातूट झालेल्या या लोकांमध्ये अंतर केवळ पाच मैलांचं आहे. दररोज कितीतरी पक्षी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात असतात. मात्र, या पाच मैलांमध्ये असलेल्या भारत-पाक सीमेने या लोकांची कायमची ताटातूट केली आहे.

भारत प्रशासित काश्मीरमधून पाकिस्तानात कॉल करता येत नाही. त्यामुळे आजच्या डिजिटल युगातही हे लोक पाकिस्तानातली आपल्या आप्तेष्टांना साधा कॉलही करू शकत नाहीत.

इंटरनेट तर गावकऱ्यांसाठी अजून स्वप्नच आहे. त्यामुळे व्हॉट्सअप कॉल करायचा असेल तर त्यासाठीसुद्धा त्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या मोठ्या गावात जावं लागतं.

अशी झाली ताटातूट, भारतातील गावकऱ्यांची व्यथा

हबिबा बेगम सांगत होत्या, "48 वर्षं झाली. इतक्या वर्षांत मी माझ्या भावाला एकदाही भेटलेले नाही. त्याला बघितल्याशिवाय मला मरायचं नाही."

हबिबा आज साठीत आहेत. त्यांचे भाऊ गुलाम कादिर पाकव्याप्त काश्मीरमधील स्कर्दूमध्ये राहतात. तर हबिबा आता भारताचा भाग असलेल्या ताक्षी गावात राहतात.

फोटो कॅप्शन,

हबिबा बेगम

16 डिसेंबर 1971 रोजी भारताने ताक्षी गावावर ताबा मिळवला. त्याचदिवशी या दोन भावा-बहिणींची ताटातूट झाली.

हबिबा सांगतात, "युद्ध सुरू झालं तेव्हा पाकिस्तानी लष्करात असलेला माझा भाऊ ड्युटीवर गेला होता."

कादिर ड्युटीवर गेल्यानंतर काही दिवसातच भारताने ताक्षी गाव काबिज केलं.

हबिबा सांगतात, "ज्या रात्री भारतीय सैन्याने आमच्या गावावर कब्जा केला त्या रात्री आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. ते आमचं काय करतील, याची काहीच कल्पना नव्हती. अनेक दिवस आम्ही आमच्या घरातून बाहेरही पडलो नाही."

डोंगरकड्यावर वसलेल्या गावातून खाली वाहणाऱ्या श्यॉक नदीकडे बघत हबिबा आपली व्यथा सांगत होत्या. पाकिस्तानातील आपल्या नातलगांविषयी बोलता-बोलता त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यांना सारखं रडू कोसळत होतं.

त्या सांगतात, "आमच्या गावावर भारताने कब्जा मिळवल्यानंतरही आमचा भाऊ परत येईल, अशी आशा आम्हाला वाटत होती. आता 48 वर्षं लोटली आहेत आणि हे डोळे अजूनही त्याची वाट बघत आहेत."

कादिर यांची बहीणच नाही तर त्यांची पत्नी, भाऊ, आई, वडील सगळे याच गावात आहेत. हबिबा म्हणतात, "आपल्या मुलाला बघताही येत नाही, या दुःखातच आई वारली. तिला तिचा मुलगा कधीही दिसला नाही."

गावाच्या पश्चिमेकडे असलेल्या एका डोंगरमाथ्याकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, "एक दिवस कादिरने हातात पांढरी पताका घेऊन सीमा ओलांडली. या डोंगरमाथ्यावर तो त्याच्या बायकोला भेटला."

त्या पुढे सांगतात, "कादिरने बानोला आपल्यासोबत पाकिस्तानला यायला सांगितलं. मात्र, सीमा ओलांडली तर आपल्या कुटुंबीयांना भारतीय सैन्य पकडतील, त्यांची चौकशी करतील या भीतीने तिने नकार दिला."

कादिर यांचे भाऊ शमशीर अली यांनी बानोला तिच्या पतीकडे पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते म्हणतात, "मी बानोचा पासपोर्ट बनवण्यासाठी श्रीनगरला गेलो. व्हिसासाठी दिल्लीला गेलो. पण बानोला व्हिसा नाकारण्यात आला."

गुलाम कादिर आणि त्यांची पत्नी 12 वर्षं वेगळे राहिले. मात्र, एका घटनेने सगळंच बदललं.

शमशीर सांगतात, "24 ऑगस्ट 1983 रोजी बानो श्यॉक नदीत वाहून गेल्या. अनेक दिवस आम्ही त्यांचा मृतदेह शोधत होतो. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर आर्मी पोस्टच्या मदतीने आम्ही कादिरला निरोप पाठवला. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला कळवलं आणि भारतातून वाहून पाकिस्तानात गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्यास त्याला दफन करण्यास सांगितले."

जवळपास 10 दिवसांनंतर 3 सप्टेंबर 1983 रोजी कादिर यांना पाकिस्तानच्या श्यॉक नदीकिनारी बानो यांचा मृतदेह सापडला आणि त्यांनीच तिचा दफनविधी पार पाडला.

शमशीर सांगतात, "हे खूप दुर्दैवी आहे. जिवंतपणी दोघा नवरा-बायकोची भेट होऊ शकली नाही आणि भेट झाली तेव्हा बानोने या जगाचा निरोप घेतला होता."

शमशीर यांनीही व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांनाही व्हिसा नाकारण्यात आला. तब्बल 18 वर्षांनंतर त्यांना भेटीचा एक मार्ग सापडला.

शमशीर सांगतात, "मला एक दिवस माझ्या भावाचं पत्र आलं. त्यात त्याने लिहिलं होतं तो हजला जातोय. मग मी तात्काळ पैशांची जुळवाजुळव केली आणि अशाप्रकारे 1989 साली अखेर मक्केत आमची भेट झाली."

शमशीर सांगतात, "आम्ही आता म्हातारे होत आहोत. सीमेपलीकडे ज्या लोकांना मी ओळखतो त्यातल्या काहींचं निधन झालं आहे. माझ्या भावाला बघायची, त्याच्या मुलाबाळांना बघायची माझी इच्छा आहे. मला माझ्या भावाबरोबर बसून गप्पा मारायच्या आहेत."

पाकिस्तानातील कादिर यांची व्यथा

गुलाम कादिर पाकिस्तानी लष्करातून सुबेदार पदावरून निवृत्त झाले आहेत.

ते म्हणतात, "माझी पत्नी आणि मी आम्हा दोघांनी तब्बल 13 वर्षं पुन्हा भेटण्याची स्वप्नं पाहिली आणि मग एक दिवस श्यॉक नदीने तिचा मृतदेह माझ्या देशात आणला."

1971 च्या युद्धावेळी गुलाम कादीर यांची सियाचीनमधल्या एका दुर्गम गावात पोस्टिंग झाली होती. ते सांगतात, "मी तेव्हा आघाडीवर लढत होतो. एका जवानाने मला सांगितलं की माझ्या भागातील तीन-चार गावांवर भारताने कब्जा केला आहे."

सुरुवातीला कादिर यांना वाटलं की युद्ध लवकर संपेल आणि ते आपल्या कुटुंबाला भेटू शकतील किंवा त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानात स्थायिक होता यावं, यासाठी काही किलोमीटरवर पार करण्याची परवानगी मिळेल.

युद्ध संपलं. मात्र या युद्धाने कादिर आणि त्यांच्या कुटुंबासारख्या इतर अनेक कुटुंबाना कधीही न भरून निघणाऱ्या जखमा दिल्या. आपल्या आप्तेष्टांशी बोलण्याचा एकच मार्ग होता. पत्रव्यवहार. मात्र, कादिर यांना पुन्हा कधीच आपल्या आईला भेटता आलं नाही.

पत्नी बानो यांच्या मृत्यूनंतर कादिर यांनी स्कर्दूमध्ये दुसरं लग्न केलं.

कादिर यांच्या खोलीत त्यांच्या आईने पाठवलेले काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत. या फोटोतच त्यांच्या आठवणी कैद आहेत.

दोन दशकांपूर्वी ते पहिल्यांदा आपल्या आईशी फोनवर बोलले होते. तो फोनकॉल त्यांना आजही आठवतो. ते सांगतात, "मी फोन उचलला. पलीकडून माझी आई बोलत होती. तो तिचा ऐकलेला शेवटचा आवाज. आम्ही दोघे रडत होतो आणि त्यातच फोन कट झाला." भारतात फोन करायला बंदी असल्याने मी तिला परत कॉल करू शकलो नाही.

कादिर यांनी थरथरत्या हातांनी एक फोटो उचलला. डोळ्यातून आसवं वाहत होती. आपल्या आईच्या फोटोचं चुंबन घेत ते म्हणाले, "ती जिवंत असताना मी तिच्यासोबत राहू शकलो नाही. मी तिचा फोटो माझ्या देव्हाऱ्यात ठेवतो. मी माझं सगळं आयुष्य या फोटोंकडे बघत घालवलं आहे. हे खूप वेदनादायी आहे."

व्हीडिओ कॅप्शन,

भारत-पाक युद्धानंतर त्या जोडप्याची ताटातूट झाली, अखेर तिचा मृतदेह त्यांना मिळाला

या चार गावांतल्या लोकांना पाकिस्तानात जाण्यासाठीचे मार्ग खुले व्हावेत, यासाठी इतर अनेकांप्रमाणे कादिर यांनीही निवृत्तीनंतर अनेक अभियानं राबवली, निदर्शनं केली. पाकिस्ताननचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचीही भेट घेतली. ते सांगतात, "भुट्टो मला म्हणाले, कब्जा केलेली गावं परत मिळवण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा युद्ध करावं लागेल किंवा भारताबरोबर खूप वाटाघाटी कराव्या लागतील. त्यांनीही काहीच केलं नाही. सरकारला पत्रं लिहून आणि त्यांच्याशी बोलून आता मी थकलो आहे."

ते पुढे म्हणतात, "आम्ही आता स्वप्नातच भेटतो. मी माझ्या स्वप्नात त्यांना बघतो. त्यांची स्वप्न बघण्यापासून पाकिस्तान किंवा भारत कुठलंच सरकार मला रोखू शकत नाही."

भारतातील चालुंका गावाची कहाणी

चालुंका गावातील 60 वर्षांचे अब्बास अली सांगत होते, "1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्हींकडून आमच्या चालुंका गावावर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरू होता. एका घरावर तर एकाचवेळी तीन बाँब पडले."

डिसेंबर 1971 पर्यंत चालुंका हे पाकव्याप्त काश्मीरमधील बाल्टिस्तान प्रांतातील शेवटचं गाव होतं.

15 डिसेंबर 1971च्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमधले चालुंका, तूरुतुक, ताक्षी आणि थांग ही चार गावं भारताच्या नियंत्रणाखाली आली.

एका रात्रीत या गावातील लोकांचा देश बदलला.

अब्बास अली सांगतात, "गावातले सगळे घाबरले होते. सर्वांना वाटत होतं की आता संपूर्ण गाव जळून राख होणार आहे."

ते पुढे सांगतात, "प्रत्येकाला एकच काळजी वाटत होती की गावात थांबलो तर सगळेच मरू."

1971 साली अब्बास अली फक्त 12 वर्षांचे होते. मात्र, युद्धाचा प्रत्येक प्रसंग त्यांच्या आठवणीत अजूनही ताजा आहे.

त्यांना गावात 'गोबा' म्हणून ओळखतात. बाल्टी भाषेत गोबा म्हणजे नेतृत्व करणारा.

अब्बास अली गावचे प्रमुख आहेत आणि चालुकांचा विकास आणि तिथे होणाऱ्या कल्याणकारी कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

ते सांगतात, "जेव्हा युद्ध पेटलं होतं तेव्हा गावातील प्रत्येकाने युद्ध संपेपर्यंत गाव सोडून सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी लष्करानेही आम्हाला सुरक्षित स्थळी जायला सांगितलं होतं."

ते पुढे सांगतात, "बरीचशी कुटुंबं चालुंकापासून जवळच असलेल्या फ्रानो गावात गेली. मात्र, माझ्या कुटुंबाने आणि आणखी एका कुटुंबाने इकडच्या ताक्षी गावात आश्रय घेतला."

गावात आपण कसे एकटेच उरले हे सांगताना अब्बास अली यांचा कंठ दाटून आला होता. ते सांगत होते, "आम्ही जेव्हा गावात परतलो तेव्हा चालुंका गावात फक्त दोन कुटुंबे उरली होती. उरलेली 74 कुटुंबे पाकिस्तानातील फ्रानो गावात सुटली."

आता फ्रानो हे पाकिस्तानातील बाल्टीस्तान प्रांतातलं शेवटचं गाव आहे. फ्रानो आणि या चार गावांमध्ये दोन्ही देशांची सीमा आहे आणि ही सीमा ओलांडण्याची परवानगी कुणालाच नाही.

अली सांगतात, "अनपेक्षितपणे आम्ही एकटे पडलो होतो. आमच्या गावाचा जेव्हा-जेव्हा विषय निघायचा माझ्या वडिलांना रडू कोसळायचं, हे मी स्वतः बघितलं आहे."

आज या गावात दगडांपासून बनवलेल्या उद्ध्वस्त घरांचे अवशेष उरले आहेत. इथे राहणारे परत येतील, याची वाट बघत ही घरं आजही अशीच भग्नावस्थेत उभी आहेत.

अली म्हणतात, "त्यांनी (गावकऱ्यांनी) अनेक वर्षं पुन्हा या गावात परतण्याची वाट बघितली. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातली परिस्थिती पुन्हा सामान्य होण्याची काहीच चिन्हं नव्हती. अखेर ते पाकिस्तानातील फ्रानोमधेच स्थायिक झाले."

या गावातील पडक्या घरांमध्ये आता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले मजूर राहतात. हे सर्व बांधकाम मजूर आहेत. तर उरलेल्या घरांमध्ये इतर गावांमधून आलेल्या स्थलांतरितांनी बस्तान बांधलं आहे. मात्र, काही घरं अजूनही रिकामी पडून आहेत.

गावातील चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना अब्बास अली सांगत होते, "पडक्या घरांचे हे सांगडे बघून मला आजही रडू येतं. या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे पाकिस्तानात काय हाल झाले असतील, हा विचार करूनही मला अस्वस्थ होतं."

ते चालुंकावासी जे कधीही परतले नाही

1971 साली ऐन तारुण्यात असलेले चो सांगतात पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना सीमेपासून दूर असलेल्या गावात जायला सांगितलं.

ते सांगतात, "आम्ही तीन दिवस घरातच होतो. पण, नंतर गोळीबार सुरू झाला. भारतीय दलाने आमच्या घरांना लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही तुरतूकला गेलो. तुरतूक जवळपास 6 मैलांवर होतं."

ते पुढे सांगतात, "तेव्हा हिवाळा होता आणि संततधार सुरू होती. आम्ही अनेक दिवस पायी चालत होतो. पाऊस सुरू झाला की आम्ही मोठ्या दगडांखाली आडोसा घ्यायचो. आम्ही तीन गावं ओलांडली आणि फ्रानो गावात पोचलो. इथेच आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला आता परत आमच्या गावी जाता येणार नाही. कारण आता नवीन सीमा तयार झाली होती."

फ्रानो आता पाकिस्तानातलं शेवटचं गाव आहे. या गावात मोठ्या प्रमाणावर सैनिकांचा बंदोबस्त असतो. शिवाय या गावात प्रसार माध्यमांनाही बंदी आहे.

चो आणि त्यांच्यासोबतचे चालुंकाचे गावकरी या फ्रानो गावात जवळपास सात वर्षं तंबू ठोकून राहिले. नवीन सीमा कधीतरी उघडेल, अशी आशा त्यांना होती. मात्र, सीमा उघडण्याची कुठलीच चिन्हं दिसत नव्हती. अखेर त्यांनी जवळच कायमचा निवारा घेण्याचा निर्णय घेतला.

चो सांगतात, "पुढे अनेक जण कामाच्या शोधात पाकिस्तानातील वेगवेगळ्या शहरांत गेली आणि आम्ही इथेच राहिलो."

16 डिसेंबर 1971 सालापर्यंत चालुंका हे पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित-बाल्टिस्तान प्रांतातलं शेवटचं गाव होतं.

जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याने विभक्त झालेल्या कुटुंबांवर काय परिणाम झाला?

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं आणि विशेषाधिकार देणारं राज्यघटनेतलं कलम 370 रद्द केलं.

कलम 370 रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन करत जम्मू-काश्मीर आणि लद्दाख असे दोन कमी अधिकार असलेल्या केंद्रशासित प्रदेशांची स्थापना केली.

या विभाजनानंतर ही चारही गावं बौद्धबहुल लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग बनली.

ताक्षी गावातील गुलाम हुसैन सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते लद्दाखमधील बाल्टी समाजाच्या कल्याणासाठी 1997 सालापासून काम करत आहेत.

त्यांनी आतापर्यंत ताटातूट झालेल्या अनेक कुटुंबांची इंटरनेटच्या माध्यमातून ऑडियो, व्हिडियो क्लीपद्वारे किंवा प्रत्यक्ष टेप पाठवून भेट घडवून दिली आहे.

ते म्हणतात, "वेगळं होण्याचं दुःख मी जाणतो. माझे स्वतःचे आप्तेष्ट सीमेपलीकडे राहतात आणि म्हणूनच ताटातूट झालेल्यांना ऑडियो आणि व्हिडियोच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न असतो."

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची त्यांची आशा मावळू लागली आहे.

हुसैन म्हणतात, "त्यापूर्वी काश्मीरमधले नेते भारत-पाकिस्तान मार्ग खुला करण्यासाठी, दोन्ही देशात व्यापार सुरू व्हावा, यासाठी प्रोत्साहन देत होते. मात्र, आता ते घडेल, अशी आशा मला वाटत नाही."

"भारत आणि पाकिस्तान यांच्या राजकारणात आम्ही भरडले जात आहोत. जेव्हा कधी आता परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटू लागते तेव्हाच या दोन राष्ट्रांमध्ये अचानक काहीतरी घडतं आणि पुनर्मिलनाच्या आमच्या आशा मालवतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)