CAA : नरेंद्र मोदी शरणार्थींसाठी देवासमान-शिवराज सिंग चौहान #5मोठ्या बातम्या

नरेंद्र मोदी, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. पंतप्रधान मोदी देवासमान- शिवराज सिंग चौहान

नागरिकत्व दुरुस्ती कायदा करणारे पंतप्रधान मोदी शरणार्थींसाठी एखाद्या देवाप्रमाणे आहेत, असं वक्तव्यं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. स्क्रोल'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"या नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. देवाने जीवन दिलं, आईने जन्म दिला आणि नरेंद्र मोदींनी या लोकांना नव्याने आयुष्य मिळवून दिलं आहे," असं चौहान यांनी म्हटलं. ते जयपूरमध्ये बोलत होते.

यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवरही टीका केली. "राहुल हे भारताच्या आत्म्याची चिंता करत आहेत. 'सोल' कसं आहे त्यांनी सांगावं?" असंही चौहान यांनी म्हटलं. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर होते. कोरियाचे पंतप्रधान ली नुक युन यांची त्यांनी भेट घेतली. ही भेट सोल इथं झाली होती. त्यामुळेच आत्मा या अर्थाचा इंग्रजी शब्द (सोल) वापरत चौहान यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

2. झारखंडचा निकाल हा भाजपच्या अहंकाराचा पराभव- पवार

झारखंडच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस आघाडीची सरशी होत असून भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शरद पवार

"सध्या देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला लोक एकजुटीने प्रतिकार करत आहेत. निवडणुकीत आपण कसेही जिंकून येऊन असा अहंकार भाजपने दाखवला. मात्र झारखंडच्या जनतेने त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिलं आहे," असं पवार यांनी म्हटलं.

"केंद्र सरकारच्या धोरणामुळे आर्थिक मंदी आली आहे. झारखंडमध्ये आदिवासी आणि गरिबांची संख्या मोठी आहे. त्याही परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद न जुमानता झारखंडच्या जनतेने कौल दिला आहे."

3. पंतप्रधान मोदींकडून देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- राहुल गांधी

"देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले," अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

"भारतमातेच्या आवाजाला, विद्यार्थ्यांना, माध्यमांना, न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न कराल तर देश तुम्हाला याचे जबरदस्त उत्तर देईल," असंही त्यांनी म्हटलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

राहुल गांधी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात काँग्रेसनं राजघाटावर देशव्यापी आंदोलन आयोजित केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसंच पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

"जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही माध्यमांना धमकावता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करता. कोट्यवधी तरुणांचा रोजगार गेला आहे हाही आवाज बंद करण्याचा प्रकार आहे," असं राहुल यांनी म्हटलं.

4. उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं युवकाचं मुंडन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मुंबईतील एका व्यक्तीला चोप देऊन त्याचं मुंडन केलं. रविवारी (22 डिसेंबर) हा प्रकार घडला. या व्यक्तीचं नाव राहुल तिवारी असं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीस्थित जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईची तुलना जालियनवाला बाग प्रकरणाशी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

सदरहू व्यक्तीने आपण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी संलग्न असल्याचं सांगितलं होतं. "मला मारहाण करण्याऐवजी पोस्टवर कायदेशीर कारवाई करता आली असती," असं या व्यक्तीने म्हटलं.

5. श्रीलंका मालिकेसाठी धवन, बुमराह यांचं पुनरागमन

श्रीलंका तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 आणि वनडे मालिकेसाठी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि ओपनर शिखर धवन यांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. सातत्याने सर्व फॉरमॅटमध्ये खेळत असल्याने ओपनर रोहित शर्मा तसंच मोहम्मद शमी यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 'टाईम्स नाऊ'ने ही बातमी दिली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे त्याला मायदेशात दक्षिण आफ्रिका तसंच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळता आलं नव्हतं. मात्र आता तो फिट आहे.

दुसरीकडे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळू शकला नाही. तोही तंदुरुस्त होऊन परतला आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने शिखरचा पुनरागमनचा मार्ग सुकर झाला.

समाधानकारक कामगिरी न होऊनही निवडसमितीने ऋषभ पंतवर विश्वास ठेवला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)