CAA: नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 'पाकिस्तानातील हिंदू-शिखांच्या स्वागत' वक्तव्याचा चुकीचा उल्लेख केला का?

  • कीर्ती दुबे
  • फॅक्ट चेक टीम
नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter / @BJP4India

दिल्लीत रविवारी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकता दुरुस्ती कायद्यासंदर्भात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली.

दीड तास चाललेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला, ज्याची बरीच चर्चा सुरू आहे. मोदी म्हणाले, "महात्मा गांधी म्हणाले होते की पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख माणसांना जेव्हा वाटेल तेव्हा ते भारतात येऊ शकतात. त्यांचं स्वागतच आहे. हे मी म्हणत नाहीये. पूज्य महात्मा गांधी म्हणाले होते. हा कायदा तत्कालीन सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच आहे."

नागरिकता दुरुस्ती कायद्याअंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानहून येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चिन समाजाच्या शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

त्यामुळे हा कायदा मुस्लिमांविरुद्ध भेदभाव करत असल्याचा आरोप करत, या कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्ष आणि देशाला उद्देशून हे सांगितलं की महात्मा गांधी यांना स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असण्याच्या काळापासून यांना असं होणं अपेक्षित होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला इथं भाषणादरम्यान

बीबीसीने मोदींच्या या वक्तव्याची पडताळणी केली. महात्मा गांधींचे लेख, भाषणं, पत्रं असं सगळं आम्ही वाचून काढलं.

त्यात 'कलेक्टेड वर्क ऑफ महात्मा गांधी' या ग्रंथाच्या व्हॉल्यूम 89 मध्ये आम्हाला या वक्तव्याचा उल्लेख सापडला. 26 सप्टेंबर 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका महिन्यानंतरच्या एका प्रार्थनासभेत महात्मा गांधी असं म्हणाले होते.

इतिहासाचे जाणकार आणि महात्मा गांधींच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्यांनी या वक्तव्याचा तत्कालीन संदर्भ जाणून घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महात्मा गांधी

लाहोरमध्ये राहणाऱ्या पंडित ठाकूर गुरुदत्त नावाच्या व्यक्तीने महात्मा गांधी यांना स्वत:ची व्यथा ऐकवली होती. जबरदस्ती लाहोर सोडावं लागल्याचं त्याचं म्हणणं होतं. प्रत्येक व्यक्तीला मरण येईपर्यंत आपल्या जन्मस्थळी राहण्याचा अधिकार आहे, या गांधींजींच्या विचाराने तो माणूस प्रभावित होता. मात्र असं वाटूनही ते असं प्रत्यक्षात करू शकले नाहीत.

26 सप्टेंबर 1947 रोजी महात्मा गांधी आपल्या प्रार्थना सभेत म्हणाले होते:

"आज गुरू दत्त यांची भेट झाली. ते एक निष्णात डॉक्टर आहेत. स्वत:ची कहाणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना माझ्याप्रति आदर वाटतो. मी सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र मी सांगितलेल्या गोष्टी अमलात आणणं अवघड आहे."

फोटो स्रोत, Collected Work of Gandhiji

फोटो कॅप्शन,

गांधीजी नेमकं काय म्हणाले होतेय़

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"पाकिस्तानात तुमच्यावर अन्याय होत असेल, असं तुम्हाला वाटत असेल. पाकिस्तान स्वत:ची चूक मान्य करण्यास तयार नसेल तर आमच्याकडे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे. यामध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अशी अशी चांगली माणसं आहेत.

"दोन्ही देशांना आपापसात सामंजस्याने काही गोष्टी ठरवाव्या लागतील. असं का होऊ शकत नाही? हिंदू आणि मुसलमान आम्ही कालपर्यंत मित्र होतो. एकमेकांवर विश्वास ठेऊ शकत नाही इतकं शत्रुत्व आमच्यात निर्माण झालं आहे का? आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, असं म्हणत राहिलो तर दोन्ही देश लढतच राहतील. दोन्ही देशांदरम्यान सामंजस्याने वाटाघाटी होई शकल्या नाहीत तर उपाययोजना करता येणार नाहीत.

"आपल्याला न्याय् मार्गाने जावं लागेल. न्याय् मार्गाने जाताना हिंदू आणि मुसलमानांनी जीव जरी गमावला तरी मला काही वाटणार नाही. भारतात राहणारे साडेचार कोटी मुसलमान छुप्या पद्धतीने देशाविरुद्ध काम करत असल्याचं लक्षात आलं तर मला हे म्हणताना जराही संकोच वाटणार नाही की त्यांना गोळी मारून मारण्यात यावं. अशाच पद्धतीने पाकिस्तानात राहणारे शीख आणि हिंदू असं वागले तर त्यांच्याबरोबरही असाच न्याय व्हावा.आपण पक्षपात करू शकत नाही. देशातल्या मुसलमानांना आपण आपलं मानलं नाही तर पाकिस्तान हिंदू आणि शीख माणसांना आपलं कसं मानेल? असं होणार नाही."

फोटो स्रोत, Collected work of Gandhiji

फोटो कॅप्शन,

गांधी नेमकं काय म्हणाले होते?

"पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख माणसं तिकडे राहू इच्छित नसतील तर ते परत येऊ शकतात. अशा स्थितीत परत आलेल्या माणसांना रोजगार मिळवून देणं, हे भारत सरकारचं आद्य कर्तव्य असेल. त्यांचं जीवन कष्टप्रद होऊ नये याची काळजी घेणं सरकारचं कर्तव्य आहे. पाकिस्तानात राहून ते भारतासाठी काम करत राहतील असं होऊ शकत नाही. असं कधी व्हायलाही नको. मी याच्या स्पष्ट विरोधात आहे."

मात्र याआधी 8 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधी यांनी भारत आणि भारतीयता यासंदर्भात जे म्हटलं ते उल्लेखनीय आहे. स्वाधीन भारत हिंदूराज नाही. भारतीय असणं कोणताही धर्म, संप्रदाय किंवा वर्ग बहुसंख्य होण्यावर अवलंबून नसेल.

दिल्ली पी. सी. सीचे अध्यक्ष आसिफ अली साहेब यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात महात्मा गांधी यांना पत्र लिहिलं होतं. उर्दूत लिहिलेल्या या पत्रात आसिफ अली म्हणतात: "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न 3000हून अधिक माणसं लाठी ड्रिल करताना घोषणा देतात-हिंदुस्तान हिंदू का, नहीं किसी और का..."

या पत्राला उत्तर देताना गांधीजी म्हणतात, "इथे जन्मलेल्या आणि लहानाचं मोठं झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी भारत त्यांचा देश आहे. ज्यांना कोणताही देश नाही, ज्यांना कोणताही देश आपलंसं मानत नाही, त्यांचा हा देश आहे. भारत हा पारसी, बेने इस्राइली, ख्रिश्चन या सगळ्यांचा आहे. स्वाधीन भारत हिंदूराज नाही तर भारत असा असेल जो धर्म, जाती, वर्ग यांच्या बहुसंख्याक होण्यावर अवलंबून नाही. धार्मिक भेदभावाविना लोकांच्या प्रतिनिधित्वावर आधारित असेल."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणारा विरोध

गांधींजींची ही दोन वक्तव्यं स्वतंत्रपणे पाहणं योग्य नाही. मुसलमान आणि शिखांच्या संदर्भात महात्मा गांधी यांच्या वक्तव्याबाबत गांधीजींचे अभ्यासक उर्विश कोठारी म्हणतात, "गांधीजी जेव्हा असं म्हणालेले तेव्हा देश स्वतंत्र होऊन जेमतेम एक महिना झाला होता. अनेक माणसं देशात येत होती-जात होती. स्वातंत्र्यानंतर 72 वर्षानंतर गांधीजींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी का पूर्ण करू इच्छित आहेत?"

"आता दोन्ही देशांमधली परिस्थिती वेगळी आहे. त्यांना गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने जायचं होतं तर गांधींनी कधीही मुसलमानांना विलग केलं नाही. ते म्हणाले होते, ज्यांना कोणत्याही देशाने आपलंसं म्हटलेलं नाही त्यांच्यासाठी भारत देश आहे. बाहेरून येणाऱ्या मुसलमानांना आश्रय देण्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे सोयीस्करपणे स्वत:च्या राजकारणासाठी गांधीजींच्या वक्तव्याचा विपर्यास करत संदर्भ देणं हा गांधीजींचा अपमान आहे."

दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि उजव्या विचारसरणीची विचारधारेने प्रभावित प्राध्यापक संगीत रागी यांनी सांगितलं की, "गांधीजींचं ते वक्तव्य सध्याच्या काळात अप्रसांगिक असल्याचं म्हणत आहेत ते राजकीयदृष्ट्या प्रेरित लोक आहेत. गांधीजींचं वक्तव्य वर्तमान काळाला चपखल लागू आहे. पाकिस्तानी मुसलमान किंवा तीन देशांचे मुसलमान भारतासाठी धोकादायक ठरू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महात्मा गांधी

इतिहासाचे जाणकार अव्यक्त म्हणतात, हिंदू आणि शीख शरणार्थींच्या संदर्भात गांधीजींचं वक्तव्य तत्कालीन संदर्भ वगळून सादर केलं जातं. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की असं म्हणणारी माणसं अप्रत्यक्ष पद्धतीने द्विराष्ट्रीय सिद्धांतावर शिक्कामोर्तबच करत आहेत. असं करणं त्यांच्या अजेंड्याचा भाग आहे. यामध्ये ते गांधीजींचं नाव चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे. पाकिस्तानातील हिंदू आणि शीख समाजाच्या व्यक्तींना भारतात स्थलांतरित होऊ देण्यासाठी गांधीजी अनुकूल होतं, असं भासवलं जात आहे.

26 सप्टेंबर 1947 रोजी गांधीजींचं हे वक्तव्य आपण संपूर्ण वाचलं तर असं लक्षात येतं की पाकिस्तानातील हिंदू तसंच शीख अल्पसंख्याक पाकिस्तानप्रति इमानदार होऊ शकत नाहीत, त्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही.

महात्मा गांधी शेवटपर्यंत फाळणीचा अशा स्वरूपात स्वीकार करू शकले नाहीत. 25 नोव्हेंबर 1947 रोजी केलेल्या प्रार्थनेवेळी गांधीजींनी स्थलांतरित तसंच शरणार्थी शब्द मान्य करण्यास नकार दिला होता. निराश्रित आणि पीडित अशा शब्दांचा त्यांनी उपयोग केला. दोन्ही धर्मातल्या अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी या शब्दाचा प्रयोग केला.

बीबीसीने केलेल्या पडताळणीत हे आढळलं की पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख समाजातील व्यक्तींना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी भारतात यावं. त्यांचं स्वागतच असेल असं महात्मा गांधी म्हणाले होते.

मात्र या वक्तव्याचं तत्कालीन औचित्य आणि वर्तमान स्थितीतील संदर्भ, यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)