संभाजी भिडे यांचं हिंदू-मुस्लीम समुदायाबाबत वादग्रस्त विधान

संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान संघटना, सांगली Image copyright RAJU SANADI/BBC
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

राष्ट्रवादाच्या संदर्भात हिंदू समाज नपुंसक असल्याचं वक्तव्यं केल्यामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

राष्ट्रवादाच्या बाबतीत हिंदू समाज नपुंसक आहे. देशातल्या मुसलमानांकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं वेडेपणा आहे, असंही त्यांनी म्हटलं.

संभाजी भिडे यांनी म्हटलं, की नपुंसक पुरुषाला मूल होऊ शकत नाही, वांझोट्या स्त्रीला मूल होऊ शकत नाही, त्याप्रमाणे हिंदू समाज राष्ट्रहिताच्या बाबतीत नपुंसक आहे.

जगातल्या 187 देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको? CAAला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध करत आहेत. ही बाब आश्चर्यकारक असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं.

मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यात राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे तर मुस्लीम समाजाकडून अपेक्षा का ठेवायची?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्देव आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल.

भीमा कोरेगाव प्रकरणाशी माझा संबंध नाही

भीमा कोरेगाव येथील विजय दिवसाच्या काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्यावर पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे तसंच मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

Image copyright RAJU SANADI
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

यासंदर्भात भिडे म्हणाले, ''भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी उपस्थित होतो. निष्कारण मला गोवले जात असून हा बदनामीचा कट आहे. यामागे दुष्टबुद्धी मग ती बारामतीची की तेरामतीची मला माहिती नाही. पुणे जिल्हा बंदीची मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तेथे जाण्यासाठी सध्या कोणताही नियोजित कार्यक्रम नाही''.

ते पुढे म्हणाले, ''भीमा कोरेगाव येथील कार्यक्रम हा देशभक्तीहीन दृष्टी असलेला म्हणावा लागेल. त्यात कसलंही तथ्य नाही. दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी टीव्हीवर बोलताना नावे वाचून दाखवली. ती नावे संभाजी ब्रिगेडने दिली होती.''

कोण आहेत संभाजी भिडे?

मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघाची स्थापना केली होती. 1984मध्ये संभाजी भिडे यांनी 'श्री शिव प्रतिष्ठान'ची स्थापना केली.

बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात, असंही जोशी सांगतात.

'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्याबरोबरच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे, यांच्यावर पुण्यातल्या पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळेच संभाजी भिडे यांचं नाव चर्चेत आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडेंची ओळख

2014मध्ये लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी संभाजी भिडे यांची भेट रायगड किल्ल्यावर झाली. पंतप्रधानांनी संभाजी भिडे यांचं कौतुक केलं होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संभाजी भिडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

तीन वर्षांपूर्वी रायगडमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी भिडे गुरुजींचा आभारी आहे की त्यांनी मला निमंत्रण न देता आदेश दिला. गेली अनेक वर्षं मी भिडे गुरुजींना ओळखतो. आम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं तेव्हा आम्हाला भिडे गुरुजींचं उदाहरण दिलं जायचं."

ते म्हणाले होते, "जर कोणी बसमध्ये किंवा रेल्वेच्या डब्यात भिडे गुरुजींना भेटलं, तर त्या व्यक्तीला कल्पनाही येणार नाही की ही व्यक्ती एक तपस्वी, एक महापुरुष आहे."

फेब्रुवारी 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त एक व्हीडिओ ट्वीट करून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं. त्या व्हीडिओच्या शेवटी मोदींचा संभाजी भिडेंसोबतचा एक फोटो होता. भीमा कोरेगावप्रकरणी आरोप असताना पंतप्रधान हा फोटो कसा ट्वीट करू शकतात, असा वाद त्यावरून झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)