Solar Eclipse: असं दिसलं राज्यात कंकणाकृती सूर्यग्रहण

अहमदाबादमधून दिसणारं ग्रहण Image copyright ANI
प्रतिमा मथळा अहमदाबादमधून दिसणारं ग्रहण

आजचा दिवस हा खगोलशास्त्र प्रेमींसाठी विशेष आहे. आज तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. हे या वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण असेल.

या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा 'ॲन्युलर इक्लिप्स' असं म्हटलं जातं. ग्रहणाच्या या स्थितीतल्या सूर्याला 'रिंग ऑफ फायर' असंही म्हटलं जातं.

सकाळी 10. 50 मिनिटांनी

नाशिकमध्ये ग्रहणात पुण्य कमवण्यासाठी अनेक भाविकांनी गोदावरीत स्नान केलं. अनेकांनी गोदावरी तटावर ध्यानधारणाही केली,

Image copyright BBC/Pravin Thakare

सकाळी 10.20 मिनिटांनी

सकाळपासून ढगाळ वातावरण आणि काही शहरांमध्ये झालेला पाऊस यामुळे राज्यात सूर्यग्रहण दिसायची शक्यता कमी होती. अनेक खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक ग्रहण दिसण्याच्या अपेक्षेत होते, पण त्यांचा अपेक्षाभंग होतातना दिसून येत होता. पण अखेर आता महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसले आहे.

सकाळी 9.50 मिनिटांनी

देशातल्या अनेक ठिकाणी सूर्यग्रहम स्पष्ट दिसत असलं तरी महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातवरणामुळे ग्रहण पाहायला अडचणी येत आहे. दक्षिण भारतातल्या अनेक ठिकाणहून रिंग ऑफ फायरचं विहगंम दृश्य दिसलं आहे.

सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी

सूर्यग्रहण पाहाण्यासाठी पुण्यातल्या झेड ब्रीजवर लहान मुलं तसंच तरूण मंडळी जमली आहेत. पण सकाळपासूनच पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे इथे ग्रहण दिसू शकलेलं नाही.

Image copyright BBC/Nitin Nagarkar

सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी

सूर्यग्रहणाला सुरुवात पण अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसण्यास अडचणी येत आहेत. देशातल्या अनेक मोठ्या मंदिरांचे दरवाजे ग्रहणकाळात बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तिरुपती बालाजी मंदिराचे दरवाजे 13 तास तर शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे दरवाजेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

या ग्रहणाचा कालावधी सकाळी 8 वाजून 17 मिनिटांपासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण भारतात बहुतेक ठिकाणी दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कोची, कोझीकोडे, तिरुअनंतपूरम, कोइंबतूर, ऊटी, त्रिची, मदुराई या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

ग्रहणं तीन प्रकारची असतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.

एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.

पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.

Image copyright Getty Images

याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.

यंदाचं ग्रहण वेगळं का आहे?

एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ.

भारतातून याआधी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती ग्रहण दिसलं होतं. दक्षिण भारतातल्या कन्याकुमारीजवळच्या परिसरातून तब्बल सात मिनिटं ग्रहणाची कंकणाकृती स्थिती पाहायला मिळाली होती. तर यानंतरचं कंकणाकृती ग्रहण 21 जून 2020 रोजी उत्तर भारतातून दिसणार आहे. पण त्यानंतर पुढची अनेक वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.

यंदाचं कंकणाकृती ग्रहण कुठे पाहायला मिळेल?

कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच 'Ring of Fire' दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.

26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारताच्या काही भागातून हे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. कर्नाटकातील मंगळुरू, केरळमधील कालिकत (कोझिकोड) ते तामिळनाडूतील कोईंबतूर, डिंडिगुल आणि श्रीलंकेतील जाफना या पट्ट्यात कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. साधारण दोन ते तीन मिनिटं ही कंकणाकृती स्थिती राहील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सूर्यग्रहण

तर भारताच्या बाकीच्या बहुतांश भागात खंडग्रास स्थितीत ग्रहण पाहायला मिळेल. मुंबईसह महाराष्ट्रातूनही साधारण 80 टक्के सूर्य झाकला गेलेला पाहायला मिळेल.

ग्रहण पाहण्याची वेळ काय?

26 डिसेंबरला भारतातून सकाळी 8 ते 11 या वेळेत ग्रहण पाहता येईल. कालिकत ते कोईंबतूरदरम्यान सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पूर्ण कंकणाकृती स्थिती दिसेल. इतर ठिकाणी स्थानिक वेळेनुसार थोडा फरक पडू शकतो.

मुंबईत खंडग्रास ग्रहण दिसणार असून सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाची सुरूवात होईल. ग्रहणाचा मध्य म्हणजे सर्वोच्च खंडग्रास स्थिती 9 वाजून 22 मिनिटांनी दिसेल ग्रहण संपेपर्यंत तर 10 वाजून 55 मिनिटे झालेली असतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)