NPRसाठी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला सांगा : अरुंधती रॉय #5मोठ्याबातम्या

अरुंधती रॉय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अरुंधती रॉय

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. NPRसाठी नाव विचारलं तर रंगा-बिल्ला सांगा : अरुंधती रॉय

एनपीआरसाठी तुमचं नाव विचारण्यात आल्यावर रंगा-बिल्ला सांगा, असं वक्तव्य लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

त्या दिल्लीत CAA (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) आणि NRC (राष्ट्रीय नागरिक नोंदणीपत्र) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

"जेव्हा सरकारी कर्मचारी एनपीआरसाठी तुमची माहिती घेण्यास घरी येतील तेव्हा, त्यांना तुमचे नाव रंगा-बिल्ला आणि पत्ता 7 रेस कोर्स रोड असा सांगा," असं त्यांनी म्हटलंय.

भाजपनं अरुंधती रॉय यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, CAA आणि NRC विरोधात आंदोलन करताना हिंसा करणाऱ्या व्यक्तींचे पोस्टर उत्तर प्रदेश सरकारनं जारी केले आहेत. या व्यक्तींना पाहिल्यास संपर्क करा आणि त्यासाठी बक्षीस देण्यात येईल, असंही त्यात म्हटलंय.

तसंच 130 आंदोलकांना 50 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आलीये.

2. बाल लैंगिक शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

चाईल्डलाईन या बालहक्कांसाठी काम करणाऱ्या हेल्पलाईननं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2018-19मध्ये बाल लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक 1,742 तक्रारी केरळमधूल आल्या. त्याखालोखाल तामिळनाडूत 985, तर महाराष्ट्रातून 443 तक्रारी आल्या होत्या.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक छायाचित्र

2018-19मध्ये भारतातील एकूण तक्रारींची संख्या 60 हजार इतकी होती. यामध्ये बाल विवाहांचं प्रमाण 37 टक्के, शारीरिक शोषण 27 टक्के, लैंगिक शोषण 13 टक्के, मानसिक शोषण 12 टक्के, तर मारहाणीचं प्रमाण 4 टक्के होतं.

3. उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचं मुंडन केलं होतं. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या एफआयआरची प्रत ट्वीटरवर शेयर केली आहे.

मुंबईतल्या वडाळा पोलीस स्टेशनमध्ये 4 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरामणी तिवारी या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिक समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात आयपीसी कलम 143, 147, 149, 323, 325, 342, 504, 506, 596 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4. कर्जमाफीच्या धोरणात बदल करा - राजू शेट्टी

सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीच्या निर्णयात बदल केला नाही, तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागेल, असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते बुधवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.

यावेळी त्यांनी म्हटलं की, "सरकारला कर्जमाफीच्या धोरणात बदल करावा लागेल. अन्यथा त्यांना रोषाचा सामना करावा लागेल. मुळात सरकारनं व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बरं झालं असतं."

यावर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलं, ते जून 2020मध्ये थकितमध्ये जाणार आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर 2019पर्यंतच्या कर्जाची माफी कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, "2 लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र विचार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे."

5. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

बुधवारी (25 डिसेंबर) कल्याण, डोंबिवली, नाशिक, औरंगाबादसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रब्बी पिकांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील 2 दिवस पावसाची पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)