CAA: लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर टीका

बिपिन रावत

फोटो स्रोत, Getty Images

कॉलेज आणि विद्यापीठातले विद्यार्थी आंदोलनात भाग घेत असल्यामुळेच हिंसाचाराच्या घटना वाढल्याचं वक्तव्य विद्यार्थ्यामुळेच भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलं.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या निदर्शनांवर ते बोलत होते. जनरल बिपिन रावत म्हणाले, "नेता तोच असतो जो लोकांना योग्य मार्गाने घेऊन जातो."

"ज्या संख्येने कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे शहरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना वाढत आहेत. नेतृत्वाने माथी भडकवण्याचं काम करु नये," असं ते म्हणाले.

जनरल बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होतील. दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी CAA आणि NRC विरोधात जी आंदोलनं सुरु आहेत त्यावर आपलं मत व्यक्त केलं.

रावत म्हणाले, "नेत्याची ओळख ही त्याच्या नेतृत्वावरुनच करता येते. जर तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात तर तुमच्या मागे सर्वजण येतील. नेता तोच असतो जो लोकांना योग्य दिशेला घेऊन जातो. सध्या जे आपण पाहतोय, की कॉलेज आणि विद्यापीठातले विद्यार्थी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना वाढत आहेत. हे काही नेतृत्व नाही."

जनरल रावत यांच्या या वक्तव्यावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं ट्वीट आलं आहे. ते म्हणतात की "आपल्या पदाच्या मर्यादा ओळखणं हे देखील नेतृत्वच आहे. नागरिक हा देशाचा सर्वांत प्रमुख घटक आहे हे समजणं आणि ज्या संस्थेचे तुम्ही प्रमुख आहात त्या संस्थेची एकता अबाधित राहील हे समजणं (नेतृत्व आहे.)"

यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत ओवैसी म्हणाले जनरल रावत यांच्या विधानामुळे सरकारचं खच्चीकरण होत आहे.

फोटो स्रोत, ANI

असदुद्दीन ओवेसी म्हणाले "जर लष्करप्रमुख यांचं वक्तव्य आपण प्रमाण मानलं तर त्याचा हा अर्थ होतो की पंतप्रधान मोदींनी आणीबाणीच्या काळात जे केलं ते चूक आहे. नरेंद्र मोदींच्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे की त्यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीविरोधात जी निदर्शनं झाली होती त्यात सहभाग घेतला होता."

"आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शनं करावीत असं जयप्रकाश नारायण यांनी म्हटलं होतं. ते पण चुकीचे होते का? लष्करप्रमुख हे विसरले आहेत की अटलबिहारी वाजपेयी यांनी अॅडमिरल विष्णू भागवत यांना पदावरून हटवलं होतं. लष्करप्रमुखांचं वक्तव्य चुकीचं आहे. यामुळे सरकारचा अपमान झाला आहे," असं ओवेसी म्हणाले.

याच वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रावत यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ते म्हणतात की "काही नेते आपल्या अनुयायांना चिथावणी देत आहेत. आंबेडकर असो वा गांधी या सर्वांना हाच संदेश दिला आहे की लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्णरीत्या निदर्शनं करावीत. लोकांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान करु नये."

पुढे ते सांगतात, "नेत्याने आपल्या पार्टीला योग्य मार्गाने घेऊन जाणंच ठीक आहे. मी पण लोकांना हेच सांगू इच्छितो की जर तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तो शांततापूर्ण मार्गाने करा."

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या भाषणात बिपिन रावत पुढे म्हणतात की, "जेव्हा आपण दिल्लीसारख्या शहरात स्वतःचं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून गरम कपडे घालतो त्याच वेळी सियाचीनमध्ये भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी जवान उणे दहा आणि उणे 45 अंश तापमानात उभे असतात. अशा जवानांना मी सलाम करतो."

फोटो स्रोत, Getty Images

जनरल रावत यांच्या निवृत्तीनंतर ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे पुढचे लष्करप्रमुख होतील.

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. देशातील तिन्ही सैन्यदलांचा एक प्रमुख राहील त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं म्हटलं जाईल.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. देशाचे पहिले सीडीएस हे जनरल रावत होऊ शकतात असा अंदाज काही माध्यमांनी व्यक्त केला आहे. पण याबाबत कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)