CAA : 'टुकडे-टुकडे गँग'ला अद्दल घडवा - अमित शाह #5मोठ्याबातम्या

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'टुकडे-टुकडे गँग'ला अद्दल घडवा - अमित शाह

''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गॅंग' दिल्लीत अशांतता पसरवत असून तिला अद्दल घडवा,'' असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

दिल्ली विकास प्राधिकरणानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जामिया नगर आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनाचे खापर शाह यांनी विरोधकांवर फोडले.

त्यांनी म्हटलं, ''काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले, तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गँग' कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.''

''दिल्लीनं लोकसभेच्या सातही जागा भाजपला दिल्या. आता दिल्लीच्या विकासासाठी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणा,'' असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,113 जणांना अटक करण्यात आली आहे.

2. NPR: अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीबाबत (NPR) केलेल्या विधानाप्रकरणी सुप्रीम कोर्टातील वकील राजीवकुमार रंजन यांनी तक्रार दाखल केली आहे. फर्स्टपोस्टनं ही बातमी दिलीये.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध दिल्ली विद्यापीठात एकवटलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी (25 डिसेंबर) अरुंधती रॉय यांनी मार्गदर्शन केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अरुंधती रॉय

यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, ''राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि डिटेन्शन कॅम्पविषयी सरकार खोटं बोलत आहे. NPR साठी सरकारी अधिकारी-कर्मचारी तुमच्या घरी आल्यास त्यांना तुमचं नाव 'रंगा बिल्ला' सांगा.''

"सरकारला चुकीची माहिती देण्याचा सल्ला देऊन अरुंधती रॉय यांनी एकप्रकारचा गुन्हा केला आहे. त्यामुळेच मी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे," असं राजीवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

3. हिंदू असल्यानं पाकिस्तानकडून कनेरियावर अन्याय- शोएब अख्तर

''दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडूंना तर तो आमच्यासोबत का जेवतो? असाही आक्षेप होता,'' असं वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं केलं आहे. झी न्यूजनं ही बातमी दिलीये.

''या गोष्टीवरून माझं दोन-तीन खेळाडूंशी भांडण झालं. जर कोणी हिंदू असेल तर तो पण खेळेल. त्याच हिंदू असलेल्यानं आम्हाला टेस्ट सीरिज जिंकून दिली. तो इथं जेवण का घेतोय? असा प्रश्न एका खेळाडूने विचारला. तेव्हा तुला इकडून बाहेर फेकून देईन, असं मी त्याला ऐकवलं. तो तुम्हाला 6-6 विकेट घेऊन देतोय. इंग्लंडमध्ये दानिश आणि शमीने आम्हाला सीरिज जिंकवून दिली होती,'' असंही शोएब अख्तर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Shoaib Akhtar/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

शोएब अख्तर

दरम्यान, आखाती देशांतील हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं, असं वक्तव्य केरळच्या भाजपच्या नेत्यानं केलं आहे.

केरळचे भाजप प्रवक्ते बी. गोपाळकृष्णन यांनी म्हटलंय, ''इंडियन युनियन मुस्लीम लीगनं जातीयवादी तत्वं पसरवली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत भूमिका मांडल्यामुळे काही जण आखाती देशांतल्या हिंदूंना धमकावत आहेत. त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं.''

4.पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई - खडसे

भाजपमध्ये असूनही पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं आश्वासन भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.

''विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षविरोधी कारवायांबाबत मी चार दिवसांपूर्वीच नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि कशाप्रकारे पक्षातीलच काही मंडळींनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध काम केले याची माहिती मी नड्डा यांना दिली. त्यानंतर त्यांच्याकडून मला कारवाईचे आश्वासन मिळाले,'' असा दावा खडसे यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse

फोटो कॅप्शन,

एकनाथ खडसे

''मी जी माहिती दिली त्याबाबत नड्डा प्रथम राज्यातील नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी करतील,'' असंही खडसे यांनी म्हटलं.

5. सूर्यग्रहणादरम्यान विकलांग मुलांना जमिनीत पुरलं

कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये सूर्यग्रहणादरम्यान विकलांग मुलांना जमिनीत पुरुन ठेवण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दिली आहे.

कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील ताज सुलतानपूर गावात ग्रहणाच्या दिवशी पोलिओग्रस्त, विकलांग, मतिमंद आणि आजारी मुलांना गळ्यापर्यंत मातीत गाडल्यास मुलं बरी होतात, अशी अंधश्रद्धा असल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

यादरम्यान, मुलांना तहान लागल्यास पालक आणि अन्य मंडळी पाणी पाजत असलेले पाहायला मिळाले. ग्रहण लागल्यापासून ते संपेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)