सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच या टीव्ही आणि सिने कलाकारांनी संपवलं होतं आपलं जीवन

सुशांत सिंह

फोटो स्रोत, Twitter

काही महिन्यांपूर्वीच टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याचं वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता सुशांत सिंह राजपूतने आपल्या बांद्र्यातील घरात आत्महत्या केली आहे.

सुशात सिंह राजपूतप्रमाणेच कुशल पंजाबी, मनमोहन देसाई, गुरुदत्त आणि जिया खान या अभिनेत्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूत.

कुशल पंजाबी

कुशल पंजाबीचा मित्र आणि अभिनेता-निर्माता करणवीर बोहरा याने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. त्याने कुशल पंजाबीचे काही फोटोही ट्वीट करून त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

करणवीर यानं लिहिलं आहेस की तुझ्या जाण्यामुळे मला धक्का बसला आहे. अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये.

कुशल यांनी 2015 साली ऑड्री डॉलेनशी विवाह केला होता. 2016 साली या दाम्पत्याला एक मुलगाही झाला होता.

अभिनेत्यासोबतच प्रोफेशनल डान्सरही

कुशल पंजाबी यांनी 30 हून अधिक टीव्ही सीरिअल्स आणि शोमध्ये काम केलं आहे. नऊ चित्रपटांमधून त्यांनी लहान-सहान भूमिकाही केल्या होत्या.

कुशलनं नुकतंच 'इश्क में मरजावां' या मालिकेत काम केलं होतं. 2011 साली कुशल यांनी अमेरिकन रिअॅलिटी गेम शो वाइप आउटचं भारतीय रुपांतर असलेला कार्यक्रम टोटल वाइप आउट हा रिअॅलिटी शो जिंकला होता.

फोटो स्रोत, Getty Images

ते प्रोफेशनल डान्सर होते आणि त्यांनी रिअॅलिटी डान्स शो 'झलक दिखला जा' मध्येही भाग घेतला होता.

2004 साली आलेल्या फरहान अख्तरच्या लक्ष्य आणि 2007 साली प्रदर्शित झालेल्या काल चित्रपटातही कुशल पंजाबींनी भूमिका केली होती.

याआधीही अनेक कलाकारांनी आपलं आयुष्य अकाली संपवलं होतं.

गुरुदत्त

1950 आणि 1960च्या दशकातलं भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे गुरुदत्त. चित्रपट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट अभिनेता अशी त्यांची ओळख होती.

ऑक्टोबर 2014मध्ये मुंबईतील पेडर रोड परिसरात राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. जास्त दारू प्यायल्यानं आणि झोपेची गोळी घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता.

मनमोहन देसाई

मनमोहन देसाईंनी त्यांच्या आयुष्यात अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली होती.

अमर अकबर अँथनी, कुली आणि मर्द हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 1979 मध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 1992 मध्ये ते अभिनेत्री नंदासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मृत्यूपर्यंत ते दोघं सोबत होते.

मसाला चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या देसाईंचे चित्रपट नंतर आपटायला लागले. 1994च्या मार्च महिन्यात त्यांनी गिरगावमधील घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली.

दिव्या भारती

अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. त्यांचे पती साजिद नाडियाडवालांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यानं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती.

फोटो स्रोत, GUDDU DHANOA

5 एप्रिल 1993ला ही घटना घडली होती. त्यावेळी दिव्याचं वय फक्त 19 वर्षं होतं. तोपर्यंत त्यांनी 14 चित्रपटांत काम केलं होतं.

सिल्क स्मिता

सिल्क स्मिता यांचं मूळ नाव विजयालक्ष्मी होतं, त्या अनाथ होत्या आणि आंध्र प्रदेशातील एका महिलेनं त्यांना दत्तक घेतलं होतं.

वयाच्या 16व्या वर्षी आईसोबत मद्रासला गेल्या. मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांना अभिनेत्री म्हणून काम मिळत गेलं. सप्टेंबर 1996ला त्या चेन्नईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या.

रीम कपाडिया

रीम कपाडिया डिंपल कपाडियाची सगळ्यात लहान बहिण होती. त्यांनी काही हिंदी चित्रपटांत कामही केलं होतं. यामध्ये एक चित्रपट हवेली होता, ज्यात त्यांच्यासोबत राकेश रोशन आणि मार्क जुबैर होते.

2000मध्ये त्या लंडनमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांनी आत्महत्या केली, असं म्हटलं गेलं.

परवीन बाबी

हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या परवीन बाबी. 2005मध्ये राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या.

फोटो स्रोत, Getty Images

त्यापूर्वी बराच काळ त्या एकटं राहत होत्या. बरेच दिवस त्यांनी घराबाहेरील वर्तमानपत्रं उचचली नव्हती, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

नफिसा जोसेफ

नफिसा जोसेफ या MTVमध्ये VJ म्हणून काम करायच्या. 1997मध्ये त्यांनी फेमिना 'मिस इंडिया'चा किताब पटकावला होता. तसंच मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीतही त्या पोहोचल्या होत्या. 2004मध्ये वर्सोवामधल्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला.

कुलजीत रंधावा

कुलजीत रंधावा ही नफिसा जोसेफ यांचे जवळची मैत्रीण होती. नफिसा यांच्या मृत्यूनंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. 2005पर्यंत सगळं काही ठीक होतं.

त्यांनी 'बाय चान्स' या चित्रपटाचं शूट पूर्ण केलं होतं आणि स्टार वनची मालिका 'स्पेशल स्क्वाड'मध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाली होती. पण, त्यांचाही मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला. जीवनाचा दबाव सहन होत नाहीये, असं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं होतं.

जिया खान

जिया खान यांची बॉलीवूडमधील एंट्री धमाक्यात झाली होती. त्यांनी अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांसारख्या कलाकारांबरोबर काम केलं. त्यानंतर मात्र जिया खानचं करिअर फारसं यशस्वी ठरलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

2013मध्ये त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला. अभिनेता आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

प्रत्युषा बॅनर्जी

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा प्रत्युषा बॅनर्जी यांनीही आत्महत्या केली होती. 2016 मध्ये राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता.

फोटो स्रोत, Getty Images

अनेक दिवसांपासून त्या डिप्रेशनमध्ये होत्या, असं सांगितलं जायचं. बालिका वधू या मालिकेमुळे त्यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. तसंच 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)