CAA आंदोलनामुळे भारत असुरक्षित, अन्य देशांना खेळायला पाठवू नका - जावेद मियांदादची ICCकडे मागणी #5मोठ्याबातम्या

जावेद मियांदाद

फोटो स्रोत, Its Javed Miandad/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

जावेद मियांदाद

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. CAA आंदोलनामुळे भारत असुरक्षित - जावेद मियादाद

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NRCवरून भारतात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चांगली नाही, असं वक्तव्य पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"पाकिस्तान नव्हे तर भारत सध्या असुरक्षित आहे. भारतात गेलेले पर्यटक असुरक्षित आहेत. माणूस म्हणून आपल्याला या विरोधात उभं राहायला हवं. तसंच भारतात जे काही सुरू आहे याचा विरोध करायला हवा. संपूर्ण जग पाहत आहे की, भारतात सध्या काय होत आहे. मी पाकिस्तानकडून बोलत आहे. मला वाटतं की, भारतासोबत सर्व खेळाचे संबंध तोडायला हवेत. सर्व देशांनी भारताविरुद्ध कडक पावलं उचलायला हवीत," असं ते म्हणाले.

"आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) अन्य देशांतील क्रिकेट संघाना भारताचा दौरा करण्यापासून रोखावं, त्यांना भारतात खेळण्यासाठी पाठवू नये," असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्याशी भेदभाव झाला, या शोएब अख्तरच्या वक्तव्यावरून सध्या बरीच चर्चा होते आहे.

त्यावर बोलताना भारताचा माजी सलामीवीर आणि आता भाजप खासदार गौतम गंभीर म्हणाले, "हिंदू-मुस्लीम भेदभाव पाकिस्तानमध्ये केला जातो. भारतात सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. मुस्लीम असूनही मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे."

फोटो स्रोत, TWITTER

2. 'धर्माचं नाव न घेता पीडित अल्पसंख्याक म्हटलं असतं...'

CAAच्या मसुद्यात हिंदू, पारशी, शीख... अशाप्रकारे कोणत्याही धर्माचं नाव न घेता पीडित अल्पसंख्याक शब्द वापरा, असा सल्ला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर काम करणाऱ्या संसदीय समितीला घटनातज्ञांनी दिला होता, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी म्हटलं आहे की, "धर्माचं नाव घेण्याऐवजी फक्त पीडित अल्पसंख्याक म्हणावं असं मला वाटत होतं. असं म्हटलं असतं तरी याचा तोच अर्थ निघाला असता, जो आता निघतोय. मी हेच संसदेच्या संयुक्त समितीला सांगितलं होतं. धर्माचं नाव घेणं आवश्यक नाही, त्याशिवायही उद्देश साध्य करता येईल, असंही मी त्यांनी म्हटलं होतं."

आता हे कायद्यानं किंवा संसदीय दुरुस्ती करून साध्य करता येऊ शकतं, असं त्यांनी पुढे सांगितलं.

3. आदित्य ठाकरे: सत्ता गेलेल्यांनी बरनॉल घ्यावं, असंही सांगणार नाही

"ज्यांची सत्ता गेली आहे त्यांना वाईट वाटणारच. मात्र, त्यांनी बरनॉल घ्यावं, असं मी सांगणार नाही," असं मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईतल्या वरळी इथं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीन झोपडपट्टीधारकांना घरे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.

त्यांनी म्हटलं, "ज्यांनी जनतेला दिलेली वचनं पाळली नाहीत त्यामुळे ते आज सत्तेत नाहीत. सत्ता गेलेल्यांना वाईट वाटणारच. सत्ता गेली यापेक्षा आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी आता बर्नोल घ्यावं असं मी सांगणार नाही. जे ट्रोल करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देता कामा नये. हातात मोबाइल आहे म्हणजे काहीतरी त्यांना करावं लागत आहे."

4. ममता बॅनर्जी - जिवंत असेपर्यंत बंगालमध्ये CAAलागू होऊ देणार नाही

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोवर बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)ची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. फर्स्टपोस्टनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

"केंद्र सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू होऊ देणार नाही. यासाठी मला मरण पत्करावं लागलं तरी याची मला पर्वा नाही," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

5. व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं शुक्रवारी मुंबईतल्या दादरमध्ये निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

सबनीस यांचा जन्म 12 जुलै 1950ला झाला. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी नाकारून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते. बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी 'मार्मिक'ची जबाबदारी सबनीस यांच्याकडे सोपवली. त्यांनी तिथं 12 वर्षं काम केलं. त्यानंतर त्यांनी 'लोकसत्ता'सह अनेक दैनिकांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)