CAA: पाकिस्तानला निघून जा, असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावरून पेटलं राजकारण

अखिलेश नारायण सिंह

फोटो स्रोत, ANI

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या काही लोकांना कथितरीत्या 'पाकिस्तानला जा' म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका पोलीस अधिकाऱ्यांचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला आहे. त्यावर राजकारण सुरू झालं आहे.

काँग्रेस आणि काही इतर विरोधी पक्षांनी या अधिकाऱ्यावर टीका करत सत्ताधारी भाजपवरही टीका करणं सुरू केलं आहे. तर पोलीस अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचं सांगत काही भाजप नेते त्यांचा बचाव करत आहेत.

या व्हीडिओच्या आधारे प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका करताना भाजप संस्थांना धार्मिक राजकारणात ओढत असल्याचा आरोप केला.

हा व्हीडिओ ट्वीट करताना त्या लिहितात, भारताचे संविधान कोणत्याही नागरिकाला अशा भाषेचा वापर करण्याची परवानगी देत नाही. जेव्हा तुम्ही उच्च पदावरती काम करत असता तेव्हा तुमची जबाबदारी आणखी वाढलेली असते.

प्रियंका पुढे लिहितात, "भाजपने संस्थांमध्ये इतक्या पातळीवरचे धार्मिक भेदाचे विष कालवलं आहे की आज अधिकाऱ्यांना घटनेच्या शपथेचीही काही किंमत वाटत नाही."

काय आहे प्रकरण?

मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. ते या व्हीडिओत कथितरीत्या स्थानिक लोकांना सांगत आहेत, 'त्यांना सांगा.. देशात राहायची इच्छा नसेल तर पाकिस्तानात जा.'

अर्थात न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार या व्हीडिओबाबत एसपी अखिलेश नारायण सिंह म्हणाले, "आम्हाला पाहून काही मुले पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागले आणि पळून गेले. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन दगड मारण्यापर्यंत भारताचा द्वेष करत असाल तर पाकिस्तानला निघून जा असं मी म्हणालो, आम्ही त्यांची आता ओळख पटवत आहोत."

मेरठचे आयजी प्रशांत कुमार यांनीही आपल्या अधिकाऱ्यांचा बचाव केला आहे. ते म्हणाले, "दगडफेक होत होती. भारताच्या विरोधात आणि शेजारी देशाच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. परिस्थिती तणावपूर्ण होती. त्यादिवशी परिस्थिती एकदम संवेदनशील होती. शब्द सामान्य असते तर चांगलं झालं असतं. आमच्या अधिकाऱ्यांनी भरपूर संयम दाखवला. पोलिसांकडून कोणताही गोळीबार झाला नाही."

विरोधी पक्षातील नेत्यांनी केली टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करुन टीका केली आहे.

ते म्हणतात, "मेरठच्या पोलीस अधिकाऱ्यानं मुसलमानांना पाकिस्तानला जा असं सांगताना पाहून मला धक्का बसला आहे. भारतीय संविधान, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वावर भरवसा होता म्हणूनच मुसलमानांनी पाकिस्तानचा पर्याय नाकारुन भारतात राहाणं पसंत केलं आहे."

AIMIMचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी हा व्हीडिओ ट्वीट करुन लिहिलं आहे, "भारतातल्या मुसलमानांमधील कट्टरतावाद्यांना रोखण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला मात्र या अधिकाऱ्यानं माझे प्रयत्न निष्फळ ठरवले."

भाजप नेत्यांनी केला बचाव

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत या पोलीस अधिकाऱ्याचा बचाव केला आहे. त्या लिहितात, "पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत, आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या जात आहेत. आग लावून दंगल घडवणाऱ्यांवर पाकिस्तानला निघून जा अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे."

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे या घटनेचं राजकीय मुद्द्यात रुपांतर करत आहेत. हा एका घाणेरड्या कटाचा भाग आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)