CAA-NRC आंदोलन: प्रियंका गांधी - उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा पकडला

प्रियंका गांधी Image copyright Getty Images

उत्तर प्रदेश पोलिसांनी आपला गळा पकडून धक्काबुक्की केली, असा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केलाय.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करताना अटक केलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जात असताना पोलिसांनी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याचवेळी धक्काबुक्की झाल्याचा दावा प्रियंका गांधींनी केलाय.

यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पत्रक काढून प्रियंका गांधी यांचे आरोप फेटाळलेत.

पाहा हा व्हीडिओ

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियंका गांधी आपल्या नियोजित रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जात होत्या, त्यामुळं त्यांना रोखलं गेलं.

76 वर्षीय माजी पोलीस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी प्रियंका गांधी या स्कूटरवर मागे बसल्या होत्या, तसंच त्या काही अंतर पायीही चालल्या.

प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट केलाय, ज्यात त्या काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चालताना दिसतायत.

या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियंका गांधींनी लिहिलंय, "उत्तर प्रदेश पोलिसांचं हे काय सुरूय? आता आम्हाला कुठेही येण्या-जाण्यापासून रोखलं जातंय. निवृत्त पोलीस अधिकारी आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते एस. आर. दारापुरी यांच्या निवासस्थानी जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना NRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला शांततेनं विरोध केल्यानं घरातून उचलून नेलं."

"बळाचा वापर करून मला रोखण्यात आलं आणि महिला पोलीस अधिकाऱ्यानं माझ्या गळ्याला पकडून खेचलं. मात्र माझं ध्येय निश्चित आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी मी उभी आहे. हा माझा सत्याग्रह आहे," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

"भाजप सरकार दहशतीचं वातावरण तयार करतंय. मी उत्तर प्रदेशची प्रभारी आहे आणि उत्तर प्रदेशात कुठे जायचे, हे भाजप सरकार ठरवू शकत नाही," त्या पुढे म्हणाले.

पोलिसांचं म्हणणं काय आहे?

प्रियंका गांधी यांच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पत्रक जारी केलं. लखनऊचे SSP कलानिधी नैतानी यांनी सांगितलं की त्यांना विभागीय अधिकारी डॉ. अर्चना सिंह यांनी पत्र लिहून कळवलं की काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा लखनऊ दौरा होता.

प्रियंका गांधी या नियोजित मार्गावरून न जाता, दुसऱ्या रस्त्यानं गेल्यानं त्यांना रोखण्यात आल्याचं डॉ. अर्चना सिंह यांनी पत्रातून सांगितलं.

Image copyright UP POLICE

"प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेची दखल घेत त्यांचा ताफा रोखण्यात आला आणि पुढील मार्गांची सविस्तर माहिती मागण्यात आली. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची माहिती दिली नाही. शिवाय, सोशल मीडियावरून धक्काबुक्कीच्या ज्या गोष्टी पसरवल्या जातायत, त्या पूर्णपणे असत्य आहेत," असंही पत्रात म्हटलंय.

दारापुरी यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी आपल्याला रोखल्याचा दावा करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "पोलिसांनी मला भररस्त्यात रोखलं. मला रोखण्यासाठी त्यांच्याकडे काहीच कारण नव्हतं. देवालाच माहीत, त्यांनी मला का रोखलं ते."

काँग्रेस आक्रमक

प्रियंका गांधी यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप केला.

सुष्मिता देव म्हणाल्या, "प्रियंका गांधी यांना रोखलं गेलं, त्यावेळी त्यांच्या गाडीत पाचपेक्षा कमी लोक होते. म्हणजे, हे कलम 144 चं उल्लंघनही नव्हतं. पोलिसांनी ज्याप्रकारे धक्काबुक्की केली, त्यावरून वाटतंय की, पोलीस आमच्या संरक्षणासाठी आहेत की अत्याचार करण्यासाठी?"

धक्काबुक्कीमुळं प्रियंका गांधी यांना दुखापत झाल्याचाही दावा सुष्मिता देव यांनी केलाय.

प्रियंका गांधींना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी सुष्मिता देव यांनी केलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)