JNU हिंसाचार: तरुणाईचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे?

् Image copyright ANI

दर्जेदार शिक्षणाचं आणि संशोधनाचं अव्वल केंद्र असल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची भारतातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये नोंद होते.

इथून शिकलेले विद्यार्थी पुढे चालून जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ झालेत, नोबेल पुरस्कार जिंकलेत, लिबिया आणि नेपाळचे पंतप्रधान झालेत. आजच्या राजकारणात सक्रिय अनेक नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार तसंच संशोधन क्षेत्रात कार्यरत जाणकारांचा समावेश आहे.

मात्र JNUची ही प्रतिमा मास्कधारी काठ्या, सळ्या आणि दंडुकाधारींना रोखू शकली नाही. रविवारी संध्याकाळी आणि रात्री मास्क परिधान करून आलेल्या शस्त्रधारी गुंडांनी JNU परिसरात धुमाकूळ घातला. त्यांनी विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर हल्ला केला तसंच मालमत्तेचं तोडफोड करत नुकसान केलं.

हा सगळा गदारोळ सुरू असताना पोलीस JNU कँपसमध्ये हजर होते. मारहाण-तोडफोड सुमारे तासभर सुरू होती. पोलीस तिथे हजर होते, मात्र त्यांनी हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली नाही. कँपसबाहेरच्या गेटवर जमावाने 'भारत माता की जय'च्या घोषणा देतानाच पत्रकार आणि अॅम्ब्युलन्सला लक्ष्य केलं. या गोंधळात 40 जण जखमी झाले.

डाव्या संघटनांनी उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यासाठी जबाबदार धरलं तर उजव्या विचारसरणीच्या संघटनेनं या घटनेमागे डाव्या संघटना असल्याचं सांगितलंय.

प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला ABVPच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं म्हटलं आहे, जी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संलग्न संघटना आहे.

त्यामुळे रविवारी JNUमध्ये घडलेला हा हिंसाचार म्हणजे तरुणाईचा एल्गार मोडून काढण्याचा प्रकार होता का, असं प्रश्न उद्भवतो.

रविवारी झालेला हिंसाचाराचं मूळ JNUमधील वसतिगृहाच्या शुल्कवाढीत असल्याचं समजतंय. या शुल्कवाढीवारून गेले काही महिने JNU परिसर धगधगतोय.

नव्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला विरोध करणारी मुलं या हल्ल्यामागे असल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. शुल्कवाढीला डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी विरोध करत होते. विद्यापीठ प्रशासनाचा रोख या विद्यार्थ्यांच्या दिशेने असल्याचं स्पष्ट होतं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा वसतिगृहाचं शुल्कवाढ करण्यावरून जेएनयूमध्ये संघर्ष पेटला आहे.

JNU हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपला कँपसमध्ये असंतोष निर्माण करू पाहत असल्याचंही स्पष्ट आहे.

हिंदू राष्ट्रवादाच्या बळावर भाजपने 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. पाच वर्षांनंतर भाजपने आपली सत्ता कायमही राखलीय. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपची उजवी विचारसरणी आणि JNUमधील डाव्यांचं वर्चस्व, यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळतोय.

यापूर्वीही JNU कँपसमध्ये भाषणं आणि घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप केले गेलेत. JNU आणि इथले विद्यार्थी राष्ट्रविरोधी असल्याचं अनेक न्यूज चॅनल्सवरून ओरडून-ओरडून सांगितलं गेलंय. या विद्यार्थ्यांना शहरी नक्षलवादीही म्हटलं गेलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जेएनयूबाहेर पोलिसांचा फौजफाटा

रविवारी कँपसमध्ये झालेला हल्ला देशात सध्या नेमकं काय घडतंय, याची प्रचिती देणारा आहे.

एक म्हणजे, देशाच्या राजधानीतील कायदा-सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे यातून प्रतीत होतं. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतात, म्हणजेच अमित शाहांच्या. त्यामुळे JNU कँपसमध्ये जे घडलं त्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर होती.

देशातल्या या अव्वल विद्यापीठात शस्त्रधारी जमाव घुसून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना बेदम मारहाण करतो, मालमत्तेचं नुकसान करतो. आणि जवळच उपस्थित पोलीस विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता जपण्यात अपयशी ठरतात.

अशा परिस्थितीत मग सुरक्षित कोण आहे, हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. भाजपच्या अशा राजकारणामुळे परिस्थिती चिघळत असून याचे गंभीर परिणाम दिसून येतील, अशी टीका सातत्याने होते आहे.

सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय विरोधकांना आणि टीकाकारांना देशद्रोही आणि शहरी नक्षल म्हणून त्यांना हीन आणि कस्पटासमान लेखण्याचा चंगच बांधला आहे. "देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांना देशविरोधी ठरवल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशा स्थितीत होणारा हा हिंसाचार रास्त असल्याचं भासवलं जातंय," असं राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांना वाटतं. "अतिशय जाणीवपूर्वक संशयाचं आणि द्वेषाचं वातावरण पसरवलं जातंय," असंही त्यांना वाटतं.

याचा परिणाम म्हणजे परस्परविरोधी विचार ऐकून घेण्याची क्षमता दिवसेंदिवस घटत चालली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि जेएनयूचे माजी विद्यार्थी रोशन किशोर यांच्यानुसार, "JNUमध्ये जे काही घडलं त्याचा अर्थ शिक्षणाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वैचारिक विरोधाला हिंसक प्रतिकाराने उत्तर दिलं जाईल. त्यावेळी सरकार फक्त एक मूक साक्षीदार बनून राहील."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जेएनयू विद्यापीठ परिसर

JNUवर झालेला हल्ला हा अनेकअर्थी भीषण आहे. JNUमध्ये विविध जाती-धर्म-पंथ तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आहेत. JNU कँपस हे खऱ्या अर्थाने भारताच्या विविधांगी संस्कृतीचं प्रतीक आहे, कारण इथे श्रीमंत-गरीब असा भेद नाही, ग्रामीण-शहरी अशी विभागणी नाही, प्रभावशाली-वंचित अशी वर्गवारी नाही. सगळे एकत्र राहून शिकतात, असं राकेश बताब्याल सांगतात. त्यांनी JNU: The Making of A University हे पुस्तक लिहिलंय.

रविवारी कँपसमध्ये जे घडलं ते पूर्वी कधीही घडलं नव्हतं, असं JNUमधील प्राध्यापक अतुल सूद सांगतात.

मात्र JNU कँपसमध्ये हिंसाचार काही नवीन नाही. 1980च्या दशकात शिक्षक आणि विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतील बदलावरून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तत्कालीन वर्तमानपत्रांनी कँपसमध्ये "अराजकता" माजल्याचं वृत्त दिलं होतं.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या घरावर हल्ला केला होता. अनेकांच्या मते पोलिसांनी तेव्हा विद्यार्थ्यांना झोडपून काढलं होतं. अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. जवळपास 40हून अधिक विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आलं. "बळाचा वापर कँपसमधल्या राजकारणाचा नवा चेहरा झाला," असं राकेश यांनी सांगितलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आंदोलन

यावेळी गोष्टी मात्र वेगळ्या आहेत. घडलेल्या हिंसाचारानंतर सरकारने अतिशय थंड प्रतिक्रिया दिली आहे, जसं काही झालंच नाही. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधायचा साधा प्रयत्नही केलेला नाही.

डिसेंबर महिन्यापासून एखाद्या विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे. यापूर्वी जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर केला आहे.

विद्यार्थ्यांची आंदोलनं मोडून काढण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला तर त्यामुळे हल्लेखोरांना बळ मिळतं, हिंसाचाराला मूक संमती मिळते. सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकणं आवश्यक आहे, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे अविनाश कुमार यांना वाटतं.

सगळ्यात चिंताजनक म्हणजे देशातल्या विरोधी पक्षांना या प्रकरणाचं गांभीर्य समजलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला नाही. ज्या समाजात, विद्यापीठ आवारात विद्यार्थ्यांवर शस्त्रानिशी हल्ला होतो त्या समाजाचं भवितव्य अंधकारमय आहे, असं रोशन किशोर यांना वाटतं. भारत तरुणाईचा आवाज ऐकण्यात खरंच अपयशी ठरतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)