दीपिका पादुकोण, आलिया भट, सोनम कपूर उतरल्या JNU विद्यार्थ्यांसाठी मैदानात

दीपिका पादुकोण Image copyright ANI

जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण मंगळवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेली आणि बॉलिवुडच्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा वादळी चर्चेला सुरुवात झाली.

याशिवाय सोनम कपूर, रिचा चढ्ढा, राधिका आपटे, तापसी पन्नू, परिणीती चोप्रा, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, महेश भट यांनीही गेल्या काही काळामध्ये सामाजिक विषयांवर जाहीर भूमिका घेतलेली आहे.

देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या विविध सामाजिक मुद्द्यांविषयी आतापर्यंत भूमिका घेतलेल्या सेलिब्रिटींची यादी पत्रकार रोहित खिलनानी यांनी ट्वीट केलीय.

पण, दीपिकाचा हा फिल्म प्रमोशनसाठीचा स्टंट असल्याचं काहींनी म्हटलंय.

तर दुसरीकडे जेएनयूमध्ये हजेरी लावल्याने टीका होणार हे माहीत असूनही भूमिका घेतल्याबद्दल दीपिकाचं अभिनंदन होतंय.

दीपिकाच्या या जेएनयू भेटीनंतर तिच्या विरोधकांनी सुरू केलेला #boycottchhapaak हॅशटॅग ट्विटरवर एकीकडे ट्रेंड व्हायला सुरुवात झाली.

पण त्यासोबतच #DeepikaPadukone, #IStandwithDeepika, #ChhapaakDekhoTapaakSe हे हॅशटॅगही सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

पण अशी भूमिका घेणारी दीपिका पदुकोण ही पहिली बॉलिवुड 'ए- लिस्टर' ठरली आहे.

आतापर्यंत नागरिकत्व दुरुस्ती कायदा, जामिया मिल्लिया इस्लामियामधली कारवाई, जेएनयूमधला हल्ला या सगळ्याविषयी बॉलिवुडमधल्या अनेक दिग्गजांनी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे.

पण बॉलिवुडची पहिली फळी वा 'ए-लिस्टर' मानली जाणारी खान त्रयी, कपूर कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांनी याविषयी बाळगलेलंल मौन, चाहत्यांच्या नजरेतून सुटलेलं नाही.

अमिताभ बच्चन यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. #Whysilentsrbachchan हा हॅशटॅग तेव्हा ट्रेंड झाला होता.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी थेट ट्विटरवरून याविषयीचे सवाल केले होते. अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अनुराग कश्यप यांनी एका गूढ ट्वीटद्वारे त्याला उत्तर दिलं होतं.

'यावेळी उन्नीस - बीस नाही तर मोठा फरक आहे. तुम्ही तुमच्या तब्ब्येतीची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या वाटचं काम 70च्या दशकातच केलंय. आणि तेव्हापासून आमच्यातला बच्चन जागा झालेला आहे. आता समोर गब्बर असो वा LION किंवा शाकाल...हम भी देखेंगे' असं म्हणत अनुरागनी अमिताभ बच्चनना टोला लगावला होता.

शाहरूख आणि सलमान खानने आजवर कोणत्याही मुद्द्याविषयी भाष्य केलेलं नाही.

पण एरवी सामाजिक मुद्द्यांबाबत भूमिका घेणाऱ्या आमिर खाननेही मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

अमिर खान, शाहरूख खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन याबाबत भूमिका का घेत नाहीत असेही सवाल उपस्थित केले जात आहेत.

पण आलिया भट्टने मात्र जेएनयू मधल्या हल्ल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून आपलं मत मांडलं होतं.

"विद्यार्थी, प्राध्यापक आणि शांतता बाळगणारे नागरिक हे पुन्हा पुन्हा हल्ल्यांचे बळी ठरत असताना सारं काही आलबेल आहे असं ढोंग करणं थांबवण्याची गरज आहे. डोळे उघडून सत्य पहायला हवं आणि हे मान्य करायला हवं की आपल्या घरातच युद्ध सुरू आहे. आपल्या देशामध्ये विविध विचारसरणी असल्याने तरी आपण सगळ्यांनी आपल्या या गुंतागुंतीच्या अडचणींवर मानवी दृष्टीकोनातून उत्तर शोधायला हवं. आणि ज्या शांततापूर्ण आणि सर्वसमावेश आदर्शांवर या देशाची उभारणी झाली आहे, त्यांची पुनर्स्थापना करायला हवी."

गेल्या वर्षी बॉलिवुड सेलिब्रिटींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक सेल्फी व्हायरल झाला होता. CAA विषयी बॉलिवुडचा पाठिंबा मिळवण्यासाठी केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका मेजवानीचं आयोजन केलं होतं. पण बॉलिवुडच्या अनेक मान्यवरांनी यावेळी मात्र या मेजवानीला जायचं टाळलं.

टी-सीरिजचे भुषण कुमार, एक्सेल एंटरटेन्मेंटचे रितेश सिधवानी यांच्यासोबतच कुणाल कोहली, कैलाश खेर, अनु मलिक, रणवीर शौरी, शान, अभिषेक कपूर आणि राहुल रवैल यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

गेटवे ऑफ इंडियावर निदर्शनं

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे 'ऑक्युपाय गेटवे' आंदोलन केलं. हजारो मुंबईकरांसोबतच बॉलिवुडमधील काही कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते.

यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप, संगीतकार - दिग्दर्शक विशाल भारद्वाज, गीतकार स्वानंद किरकिरे, दिग्दर्शिका झोया अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, दिया मिर्झा, तापसी पन्नू, रिचा चढ्ढा, अभिनेता अली फजल सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये कश्यप यांनी देशातल्या घडामोडींविषयी ठाम भूमिका घेतलेली आहे. रविवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला झालेल्या निदर्शनांमध्येही अनुराग कश्यप सहभागी होते.

इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप यांनी म्हटलं, "या सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही चांगल्या गोष्टी नाहीत. म्हणून मग ते आपण शत्रूचा मुकाबला करत असल्याचं चित्र उभं करण्यासाठी देशामध्ये शत्रुत्त्व निर्माण करत आहेत. अर्बन नक्सल, टुकडे-टुकडे गँग यासारखे शब्द मुद्दाम रूढ करण्यात आले आहेत. गृहमंत्री पुन्हा पुन्हा या शब्दांचा वापर करत आहेत."

अभिनेत्री स्वरा भास्कर सामाजिक मुद्द्यांविषयी खुलेपणाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. जेएनयूच्या परिसरामध्ये बुरखाधारी व्यक्तींनी घुसून हाणामारी सुरू केल्यानंतर स्वराने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. स्वराची आई या विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. स्वराचे पालक कॅम्पसमध्येच राहतात. जेएनयूमध्ये हा हल्ला झाल्यावर स्वराने लगेच एका व्हीडिओद्वारे लोकांना तिथं जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचं आवाहन केलं होतं.

गीतकार - पटकथाकार वरुण ग्रोव्हरची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातली कविता - 'हम कागज नही दिखाएंगे' अतिशय लोकप्रिय झाली आहे. अनेक आंदोलनांच्या दरम्यान म्हटली गेलेली ही कविता आता NRC विरोधातील आंदोलनाचा आवाज बनली आहे.

रविवारी गेटवे ऑफ इंडियाला झालेल्या शांततापूर्ण निदर्शनांमध्ये गीतकार स्वानंद किरकिरे सहभागी झाले होते. त्यांचं 'बावरा मन देखने चला एक सपना' हे गाणं ऑक्युपाय गेटवे आंदोलनादरम्यान गायलं गेलं. स्वानंद किरकिरेंनी रचलेली नवी कविता 'मार लो डंडे, कर लो दमन, मैं फिर पिर लडने को पेश हूँ' लोकप्रिय होतेय.

याशिवाय सोनम कपूर, रिचा चढ्ढा, राधिका आपटे, तापसी पन्नू, परिणीती चोप्रा, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, महेश भट यांनीही गेल्या काही काळामध्ये जाहीर भूमिका घेतलेली आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा याबाबत भूमिका घेत ट्वीटरवर तिचं मत मांडलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)