साहित्य संमेलन: 'नेत्यांना खाली बसवता, मग अधिकारी व्यासपीठावर कसे?'

उस्मानाबाद साहित्य संमेलन
प्रतिमा मथळा संमेलनाला उपस्थित राजकीय नेते

गेल्या आठवड्यात उस्मानाबादेत 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्याचे संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते मधुरराव चौधरी, काँग्रसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांसारखी राजकीय मंडळी व्यासपीठसमोरील पहिल्या रांगेत बसली होती.

यावरून नव्या वादाला तोंड फुटलं.

"राजकीय व्यक्तींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नसावं, हा काही नवा पायंडा नाहीय, हे याआधाही बऱ्याचदा झालंय. अनेक राजकीय नेत्यांनी स्वत:हून व्यासपीठवर जाण्याऐवजी समोर बसणं पसंत केलंय," असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार सांगतात. मात्र, त्याचवेळी ते म्हणतात, "राजकीय नेते खाली बसवता, मग प्रशासनातील अधिकारी व्यासपीठावर का बसवले?"

उल्हासदादा पवार यांच्या टीकेचा रोख उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन आणि सीईओ डॉ. संजय कोलते यांच्याकडे होता. कारण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व्यासपीठासमोर खाली पहिल्या रांगेत बसले असताना हे तिन्ही अधिकारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पूर्णवेळ व्यासपीठावर पहिल्या रांगेत होते.

उल्हासदादा पवारांचा नेमका आक्षेप काय आहे?

राजकीय व्यक्ती संमेलनाचा उद्घाटक असेल तर त्यांनी व्यासपीठवर जाणं ठीक आहे. अन्यथा, खालीच बसावं, असं उल्हासदादा पवार म्हणतात.

मात्र, ते पुढे म्हणतात, "जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे सीईओ व्यासपीठावर कसे? आणि तेही संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या शेजारी बसले? त्यांचं साहित्यात योगदान काय? कोणताही जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि जिल्हा परिषदेचा सीईओ व्यासपीठावर कुठल्याच संमेलनात नव्हता. ते सरकारचे पगार घेतात. किंबहुना, मंत्री व्यासपीठासमोर रांगेत बसले असताना, हे अधिकारी व्यासपीठावर बसतात, हे प्रोटोकॉलला धरून नाही."

प्रतिमा मथळा संमेलनात व्यासपीठावर उपस्थित अधिकारी

राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर न बसता साहित्यरसिकांमध्ये बसणं, हा काही नवीन पायंडा नसल्याचं उल्हासदादा सांगतात. ते म्हणतात, "1996 साली आळंदीला 69वं साहित्य संमेलन झालं, त्यावेळी मी कार्याध्यक्ष होतो. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख हे दिग्गज राजकीय नेते व्यासपीठासमोर खाली पहिल्या रांगेत बसले होते. फक्त आळंदीचे नगराध्यक्ष व्यासपीठावर होते, कारण ते नगराचे प्रथम नागरिक होते."

"विलासराव देशमुख मंत्री असतानाही बेळगावातल्या संमेलनात व्यासपीठावर न जाता खाली रांगेत बसले होते. औरंगाबादेतल्या संमेलनात मात्र ते व्यासपीठावर गेले, कारण ते उद्घाटक होते", अशीही आठवण उल्हासदादा सांगतात.

याचसोबत, उल्हासदादा पवारांनी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावरही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, "साडेचार तास उद्घाटन सोहळा कधीच होत नाही. स्वागताध्यक्ष, मावळत्या अध्यक्षांचं भाषण, विद्यमान अध्यक्षांचं भाषण आणि प्रमुख पाहुण्याचं भाषण इतकाच भाग उद्घाटन सोहळ्यात असतो. मात्र, उस्मानाबादेत अनेकांची भाषणं झाली आणि पर्यायानं साडेचार तास सोहळा चालला. हे सर्व नियमांना धरून आहे का?"

साहित्य महामंडळाकडून चुकीचा प्रघात - नीलम गोऱ्हे

"साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, कुठल्याही संमेलनाध्यक्षांच्या भाषणात समाजकारण, राजकारणाचे पडसाद दिसतात. त्यामुळं साहित्य राजकारणविरहित होऊ शकत नाही," असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणतात.

प्रतिमा मथळा संमेलनाच्या व्यासपीठावरची गर्दी

राजकीय नेत्यांमुळं साहित्यविश्व दडपलं जाऊ नये, हे योग्य आहे, असं सांगताना निलम गोऱ्हे या उल्हासदादा पवारांच्या आक्षेपाचंही समर्थन करतात. त्या म्हणतात, "उल्हासदादांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण प्रशासन हा सत्तेचाच भाग आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसवल्यानं आक्षेप नाही, पण राजकीय नेते खाली आणि प्रशासकीय अधिकारी व्यासपीठावर, यामुळं चुकीचा प्रघात पाडला गेलाय."

"राजकीय व्यक्तीविरहित संमेलन घेऊन दाखवणं, हा फार मर्यादित स्वरूपाचा विचार वाटतो. साहित्य संमेलनात जाणारे नेते राजकारणातले जोडे बाहेर ठेवून जात असतील तर आक्षेप नसावा," असंही त्या म्हणाल्या.

आजी-माजी सांस्कृतिक कार्यमंत्री काय म्हणाले?

राज्याचे विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मला वाटतं या विचाराचं स्वागत करायला पाहिजे. साहित्य संमेलन मराठवाड्यात होतंय, अशावेळी साहित्याचा उपासक म्हणून इथं उपस्थित राहिला, तर त्यात फार आश्चर्याचं नाही."

तसंच, "राजकारण आणि साहित्य हे कायमच एकमेकांना पूरक राहिलंय. अशाच तऱ्हेनं हे पुढं जावं," अशी अपेक्षाही अमित देशमुखांनी व्यक्त केली.

प्रतिमा मथळा संमेलनाला उपस्थित साहित्यरसिक

माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्याशीही बीबीसी मराठीनं संपर्क साधला. तावडे म्हणाले, "अतिशय अभिनंदनीय, अतिशय कौतुकास्पद आहे. मी सांस्कृतिक मंत्री असताना त्यावेळच्या आयोजकांना आग्रह करायचो की, राजकीय नेते शक्यतो व्यासपीठावर नको. पहिल्या रांगेत राजकीय नेत्यांना बसवून, त्यांचा योग्य तो सन्मान करा. अखेर यावर्षी साहित्य महामंडळानं तसं केलंय, याचं मी साहित्यातील रसिक म्हणून त्यांचं स्वागत करतो."

"साहित्य संमेलनाच्या आयोजनाला खर्च खूप येतो. त्यामुळं स्थानिक राजकीय नेत्यांकडून मदत घेतली जाते, त्यामुळे आयोजक राजकीय नेत्यांना व्यासपीठवर घेण्याच्या दबावाखाली येतात. मात्र, उस्मानाबादमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांचा अपमान न करता, पहिल्या रांगेत बसवून स्तुत्य पायंडा पाडलाय, तो पुढे चालू ठेवला पाहिजे," असंही विनोद तावडे म्हणाले.

साहित्य महामंडळाची भूमिका काय आहे?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करतं. राजकीय नेत्यांना व्यासपीठावर स्थान न देण्यामागची त्यांची भूमिका आणि उल्हासदादा पवार यांच्या आक्षेपांबद्दल महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे स्वागत मंडळाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं होतं. पुढे अशाच प्रकारे राजकीय नेत्यांना खाली बसवले जाईल, असं काही ठरलं नाही. यंदा एक गोष्ट घडली याचा अर्थ पुढे असच राहील असेही नाही, असं ठाले पाटील म्हणाले.

प्रशासकीय अधिकारी काय म्हणाले?

या वादाबाबत बोलताना उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, "साहित्य महामंडळाने सांगितल्यानुसार आम्ही अधिकारी व्यासपीठावर बसलो होतो. तिथे स्वतःहून बसायला गेलो नव्हतो किंवा व्यासपीठावर बसण्यास आमचा आग्रह सुद्धा नव्हता. त्यामुळे व्यासपीठावर किंवा खाली बसावे, हे साहित्य महामंडळाच्या म्हणण्यानुसार ठरलं."

"शिवाय, नियोजित संमेलनाच्या मार्गदर्शक मंडळात सुद्धा आम्हाला घेतलं होतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेतनातील काही भाग आम्ही लोकवर्गणी म्हणून सुद्धा आम्ही दिली होती. पण म्हणून आम्ही व्यासपीठावर होतो असेही नाही, साहित्य महामंडळाने सांगितले म्हणून आम्ही व्यासपीठावर बसलो होतो," असं दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)