स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मांडलेले 9 मुद्दे

स्वामी विवेकानंद Image copyright Getty Images

12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्र नाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले गेले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी म्हणजेच 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते.

आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी बंधू आणि भगिनींनो या शब्दांपासून केली आणि सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. या भाषणाची नोंद इतिहासात अनेक कारणांसाठी झाली आहे. शिकागो येथे झालेल्या भाषणात विवेकानंदांनी कोणते मुद्दे मांडले होते.

शिकागो येथील भाषणात मांडलेले मुद्दे

1. अमेरिकन बंधू आणि भगिनींनो तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उचबंळून आलं आहे. जगातली सर्वांत जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारतमातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो-करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो.

2. सहिष्णुतेचा विचार ही पौर्वात्य देशांची जगाला देणगी आहे असा विचार माझ्या आधी काही वक्त्यांनी मांडला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

3. मला गर्व आहे की माझा जन्म अशा धर्मात झाला आहे की ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सर्वधर्मांची स्वीकृती याची शिकवण दिली आहे. आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो.

4. मला गर्व आहे की मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी गांजलेल्या लोकांना शरण दिली आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या ज्यू लोकांचा छळ झाला त्यांना आम्ही केवळ आमच्या देशातच नव्हे तर हृदयात स्थान दिलं. ज्यू लोकांची धार्मिक स्थळ रोमन हल्लेखोरांनी उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर अनेक ज्यू लोकांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला.

5. मला गर्व आहे की मी अशा धर्मात जन्मलो ज्याने पारसी धर्माच्या लोकांचं या देशात स्वागत केलं आणि ते त्यांची आजतागायत मदत करत आहे.

6. यावेळी मला तो श्लोक सांगावासा वाटत आहे ज्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावतात, वेगवेगळ्या मार्गाने जाऊनही त्या सागराला मिळतात त्याच प्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो. हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्वरापर्यंत पोहोचवतात हा माझा विश्वास आहे.

7. हे संमेलन जगातल्या सर्वांत पवित्र सभांपैकी एक आहे. भगवद्गीतेतल्या संदेशाप्रमाणेच हे संमेलन आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे की जो कुणी माझ्यापर्यंत येतो मग तो कसाही असो त्याला मी भेटतोच. लोक वेगवेगळे मार्ग निवडतात, अनेक अडचणींचा सामना करतात पण ते माझ्यापर्यंत पोहोचतातच.

8. सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर भूमीला आपल्या पाशात अडकवून ठेवलं आहे. यामुळेच धर्माच्या नावावर हिंसाचार झाली आहे. अनेकदा ही पृथ्वी धर्माच्या नावाने झालेल्या हिंसाचारामुळे लाल झाली आहे. यामुळे किती संस्कृती आणि किती देश नष्ट झाले याची गिनतीच नाही.

9. जर हे भयंकर असूर नसते तर मानवी समुदायाची स्थिती कितीतरी चांगली असती. पण अशा लोकांची वेळ आता भरली आहे. मला आशा आहे या संमेलनामुळे अनेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल. कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेने रणशिंग फुंकले आहे. लोकांचं दैन्य आणि दुःख कमी होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)