CAA: नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत वाईट- सत्या नडेला #5मोठ्याबातम्या

सत्या नडेला Image copyright EPA
प्रतिमा मथळा सत्या नडेला

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत वाईट- सत्या नडेला

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत वाईट असल्याचं म्हटलं आहे. बझफिड या वेब पोर्टलचे मुख्य संपादक बेन स्मिथ यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे.

ते म्हणतात बझफिडच्या एका कार्यक्रमात बोलताना सत्या नडेला म्हणाले, "मला असं वाटतं की, जे होतंय ते फार वाईट आहे. माझी फार इच्छा आहे की एखाद्या बांगलादेशी नागरिकाने येऊन युनिकॉर्न तयार करावी किंवा तो इन्फोसिससारख्या कंपनीचा सीईओ व्हावा," द हिंदूने ही बातमी दिली आहे.

नडेला मूळचे हैदराबादचे असून सध्या ते मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या कंपनीचे सीईओ आहेत. या ट्वीटनंतर सत्या नडेला यांच्यातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलं.

त्यात नडेला म्हणतात, "भारतीय संस्कृतीत लहानाचं मोठं होणं आणि मग अमेरिकेत स्थायिक होणं हे माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत. मला असं वाटतं की, एखाद्या निर्वासिताने भारतात एखादी मोठी कंपनी स्थापन करावी आणि त्याचा फायदा भारतीय जनतेला व्हावा."

2. महागाईचा उच्चांकी भडका

देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर 2019 मध्ये महागाईचा दर 7.35 टक्क्यांवर झेपावला आहे. तर किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेकडून अंदाजित अशा 4 टक्क्यांच्या जवळपास दुप्पट स्थिरावला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे.

Image copyright Getty Images

अन्नधान्यांच्या दरवाढीमुळे महागाईच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात डाळीच्या किमती 15.44 टक्क्यांनी तर मटण आणि मासे यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले. महागाई वाढल्याने आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

3. वाडिया रुग्णालयाचं अनुदान रोखलं

मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता असल्याचं प्राथमिक चौकशीतून उजेडात आलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे. अतिरिक्त कामगार भरती, काही वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना दुबार वेतन, विनापरवानगी खाटा वाढवणं, रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेणं अशा अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.

सध्या महापालिका प्रशासनाने वाडिया रुग्णालयाचे अनुदान रोखले असून मंगळवारी अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालय व्यवस्थापनाने आपली बाजू मांडल्यानंतर यावर तोडगा काढण्यात येईल असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे. गिरणी कामगार आमि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार मिळावे या उद्देशाने या रुग्णालयाची स्थापना 1926 मध्ये करण्यात आली होती.

4. उपअधीक्षकाला शौर्य पदक परत करावं लागणार

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी नाविद बाबा यांच्यासह अटक झालेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून शौर्य पदक काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाने कडक कारवाईचे संकेतक दिले असून यासंपूर्ण प्रकरणातील सखोल माहिती मिळवण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे देविंद्र काही वर्षांपासून दहशतवाद्यांना मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मोठी रक्कम घेऊन तो दहशतवाद्यांसाठी काम करायचा असेही तपासातून समजत आहे. त्याच्या संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

5. जेएनयूचे कुलगुरू उत्तम काम करत आहेत - रमेश पोखरियाल

जेएनयूत झालेला हिंसाचार हाताळण्यात अपयश आल्याची टीका जेएनयूच्या कुलगुरूंवर होत असताना मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल त्यांचा बचाव करण्यासाठी समोर आले आहेत, टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

Image copyright ANI

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, "कुलगुरू उत्तम काम करत आहेत. जी लोकं चांगलं काम करतात त्यांच्यावर नेहमीच टीका होते. आम्ही त्यांच्यावर कारवाई करावी?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुलगुरूंनी हा हिंसाचार होऊ दिला या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा अभाव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)