जय भगवान गोयल : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकातून मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणारी व्यक्ती

जय भगवान गोयल Image copyright Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' नावाचं पुस्तक जय भगवान गोयल प्रकाशित केलं आणि गेले दोन दिवस या विषयावर वादंग माजला.

"लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते," असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर गोयल यांनी माफी मागितली आणि पुस्तक मागे घेतलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा वाद संपल्याचं ट्विटवरवरून जाहीर केलं आणि या वादाला अल्पविराम मिळाला.

खरंतर अशा पद्धतीने वादात राहण्याची गोयल यांची पहिलीच वेळ नाही.

1999 मध्ये दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानाची खेळपट्टी शिवसैनिकांनी खोदली होती. पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता तेव्हा पाकिस्तानबरोबर खेळायचं नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यावेळी जर सामना झाला तर खेळपट्टी खोदू आणि मैदानात साप सोडू अशी धमकी शिवसेनेने दिली होती.

त्यावेळची आठवण सांगताना जय भगवान गोयल म्हणतात, "बाळासाहेब ठाकरेंचं असं मत होतं जो काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय, त्या पाकिस्तानशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे मॅचही व्हायला नको. मात्र त्यावेळच्या सरकारने मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही ठरवलं होतं की मॅच होऊ द्यायची नाही. मी तेव्हा शिवसेनेचा उत्तर भारताचा अध्यक्ष होतो. मग दिल्लीत ज्या फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर मॅच होती त्याची खेळपट्टी खोदली. पुढचे पंधरा दिवस पोलीस माझा शोध घेत होते. पण अटक होऊ द्यायची नाही असा आदेश बाळासाहेबांनी दिला होता. इतर लोकांना अटक झाली पण मला झाली नाही."

ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे जयभगवान गोयल यांच्याविषयी सांगतात, "गोयल कायम असामाजिक तत्त्वांचा आधार घेत दहशत पसरवत. कालांतराने गोयल यांचे कारनामे उघड झाले आणि त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर ते भाजपात गेले."

आता पुस्तकाच्या निमित्ताने गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याविषयी बोलताना वानखेडे म्हणतात, "आपला या पुस्तकाशी संबंध नाही असं जरी आज भाजप म्हणत असली तरी त्यांच्या मुख्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मग न वाचता या पुस्तकाचं प्रकाशन केलं का?"

Image copyright Getty Images

सकाळचे ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरीसुद्धा त्यांच्याविषयी असंच काहीसं मत व्यक्त करतात.

गोयल यांच्याविषयी बोलताना ते सांगतात, "ते कधीच गंभीर शिवसैनिक नव्हते. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणारं पुस्तक काढणं म्हणजे स्वत:चं पुनर्वसन करण्याचा केलेला प्रयत्न आहे. कारण आता शिवसेना एनडीएपासून वेगळी झाली आहे. खरंतर त्यांच्या मागे पाठबळ नाही. त्यांचा चाहता वर्गही नाही."

'बाबरी तोडायला डायनामाईट घेऊन गेलो होतो'

पंजाबमधील लुधियानात जय भगवान गोयल यांचा जन्म झाला. ते शिवसेनेच्या पंजाब शाखेचे 1982 ते 1987 या काळात सदस्य होते. 1988 ते 1990 या काळात ते शिवसेनेच्या दिल्ली शाखेचे प्रमुख होते. नंतर नैऋत्य भारत आणि दिल्ली शाखेचे प्रमुख म्हणून 1990 ते 2008 पर्यंत त्यांनी काम पाहिलं. 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी शिवसेना या संस्थेची स्थापना केली, पुढे 2014 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला.

6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पाडण्यात आली. बाबरी मशीद नियोजनबद्ध पद्धतीने पाडण्यात आली असं गोयल यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

"अयोध्येत जे केलं ते विचारपूर्वक केलं आणि आनंदाने केलं,"असं त्यांनी पुढे सांगितलं.

आम्ही पूर्ण तयारीनिशी डायनामाईट घेऊन गेले होते. भाजपच्या स्थानिक आमदारांनी या कामासाठी मदत केल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.

सीबीआयने गोयल यांना या प्रकरणी अटक केली होती. मात्र आम्ही त्याची कबुली दिली होती आणि आम्हाला त्याची अजिबात लाज वाटत नाही, असं गोयल पुढे म्हणाले.

फक्त राजकीय गुन्हे

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गोयल यांना पक्षात घेण्यामागची भूमिका काय याबाबत आम्ही भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याशी बातचीत केली.

ते म्हणाले, "गोयल यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरुपाचे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पक्षात घेतलं. त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य भाजपच्या एकाही नेत्याने वाचलेलं नव्हतं. आता त्यांनी याबदद्ल माफी मागितली आहे आणि हा वाद आता संपला आहे."

गोयल यांनी कोणताही गुन्हा केला नाही त्यामुळे ते पक्षातच राहतील आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असंही जाजू यांनी स्पष्ट केलं.

हिंदुत्वाच्या पालखीचे भोई

जय भगवान गोयल हे लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. त्यांचे विचार कायमच हिंदुत्वववादी होते. या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कामं केल्याचं ते स्वतः सांगतात.

फिरोजशहा कोटला मैदानाची खेळपट्टी फोडण्याची कबुलीही ते देतात. इतकंच काय तर बाबरी मशीद प्रकरणात अटक होणारी पहिली व्यक्ती मीच असल्याचं गोयल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

2008 मध्ये राज ठाकरे यांनी परप्रांतियांविरोधात आंदोलन छेडलं. त्यावेळी त्यांना हे आंदोलन थांबवण्याची मागणी गोयल यांनी केली होती. मात्र तेव्हा त्यांनी ती ऐकली नाही.

त्याचा विरोध म्हणून गोयल यांच्या माणसांनी तेव्हा दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. तेव्हा त्यांच्यावर खटला भरण्यात आला. आता ते खटल्यातून निर्दोष सुटले आहेत.

वादग्रस्त पुस्तकाबदद्ल बोलताना ते आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगतात. गरज लागली तर पुनर्लेखन करणार असल्याचं ते सांगतात.

हे पुस्तक लिहून त्यांनी कोणतीही चूक केली असं त्यांना वाटत नाही. शिवसेनेवरही ते कडाडून टीका करतात. संपूर्ण शिवसेना आता सोनियांच्या गळ्यातील ताईत झाल्याचा आरोप ते करतात.

जर शिवसेनेनं वडापावला शिववडापाव असं नाव दिलं तर शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही. मग मी तुलना केली तर कसा होतो असा प्रश्न ते विचारतात.

जय भगवान गोयल यांच्या बोलण्यातून त्यांची मोदीभक्ती ओसंडून वाहते. गेल्या सहा वर्षांत त्यांनी केलेल्या कामाची जंत्री ते मांडतात. हिंदुत्वासाठी जीवन अर्पण केल्याची भावना ते बोलून दाखवतात. पुस्तकावर टीका झाली आणि मागे घ्यावं लागलं तरी आपलं काम पुढे चालूच ठेवणार असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)