शिवसेना-भाजपची औरंगाबादेत सभापतिपदांसाठी ‘युती’ #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. औरंगाबादेत शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतिपदी लागली. लोकमतने ही बातमी दिली आहे.

ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने ठरवून केलेल्या खेळीमुळे काँग्रेसचा एकही महत्त्वाचा पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू होती. बांधकाम आणि समाजकल्याण ही दोन सभापतिपदं काँग्रेसच्या वाट्याला तर शिवसेनेकडे महिला बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य ही दोन सभापतीपदं ठेवण्यात येण्यात होती.

मात्र उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली आणि तीन सभापतिपदं मिळवली. महिला आणि बालकल्याण सभापतिपदावर ठरल्याप्रमाणे शिवसेनेने पाणी सोडलं.

2. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 70 जागांसाठी आपने यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पटपडगंज या त्यांच्या जुन्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

70 संख्याबळ असलेल्या या विधानसभेत आपचे 63, भाजपचे 4 तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत. यातील 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीने दिलं आहे.

Image copyright Getty Images

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली. सध्याच्या 46 आमदारांसह मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

3. काश्मीरमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होणार

काश्मीर खोऱ्यातील काही संस्थांसाठी ब्रॉडबँड सेवा सुरू होणार असल्याची बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यांत पार पाडण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून होणार आहे. मात्र सोशल मीडियावर अद्यापही प्रतिबंध असल्याचं शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

मध्य काश्मीरपासून याची सुरुवात होणार आहे. त्यात राजधानी श्रीनगर, नंतर उत्तर काश्मीरात (कुपवाडा, बंदिपुरा, बारामुल्ला) सेवा सुरू होईल. दोन दिवसांनी दक्षिण काश्मीरात (पुलवामा, कुलगामा, शोपिआन आणि अनंतनाग) समावेश आहे. सुरुवातीला शासकीय वेबसाईट आणि बँकिंग सेवांचा समावेश आहे.

4. औषधी कंपन्यांबद्दल 'अपमानास्पद' विधानावरून मोदींनी माफी मागावी - IMA

औषध विकत घ्यावेत म्हणून डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी औषध कंपन्या बायकांना तिथे नेतात असं विधान कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं प्रकरण इंडियन मेडिकल असोसिएशनने गांभीर्याने घेतलं आहे. पंतप्रधानांनी असं विधान केलं असेल तर त्यांनी माफी मागावी अशी मागणी IMAने एका पत्रकाद्वारे केली आहे.

द हिंदूने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

"काही मोठ्या औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांना लाच म्हणून बायका पुरवतात असं विधान मोदींनी केल्याच्या काही बातम्या बाहेर आल्या आहेत. जर पंतप्रधानांनी खरंच असं विधान केलं असेल तर आम्ही त्याची गंभीर दखल घेत आहोत," असं IMA ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.

या महिन्याच्या सुरुवातीला प्रमुख औषध कंपन्यांच्या बैठकीत हे विधान केल्याचं सांगण्यात येतं.

5. दहशतवाद्यांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये मिळाले - देविंदर सिंग

जम्मू काश्मीरमधील पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांना दहशतवाद्यांना चंदीगड आणि पुढे दिल्लीला पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये मिळाल्याचं कबूल केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांबरोबर देविंदर सिंग यांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी ही कबुली दिल्याची माहिती महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

Image copyright PTI

देविंदर सिंग यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांना मिळालेली सर्व पदकं काढून घेण्यात येणार आहेत. त्यात दहशतवादविरोधी कारवायांसाठी मिळालेल्या शौर्यपदकाचाही समावेश आहे. पोलिसांबरोबरच RAW, आणि गुप्तचर संस्थाही देविंदर सिंग यांची चौकशी करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)