खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून दूर का?

खाशाबा जाधव, ऑलिम्पिक Image copyright संजय दुधाणे
प्रतिमा मथळा खाशाबा जाधवांना अजूनही पद्म पुरस्काराची प्रतीक्षा

"आज किरकोळ काही केलं तरी लोक उड्या मारतात. सोशल मीडियावर त्याची जाहिरात करतात. पण, देशाला प्रतिकूल परिस्थितीत पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधवांची मात्र त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतरही आबाळच झाली. त्यांचा मुलगा म्हणून ही सल कायम वाटते," या शब्दांत खाशाबांचा मुलगा रणजीत जाधव यांनी आपल्या भावना बीबीसी मराठीकडे व्यक्त केल्या.

आज 15 जानेवारी म्हणजे खाशाबा जाधवांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने रणजीत यांच्या भावना पुन्हा उफाळून आल्या.

तुमची कामगिरी खणखणीत असेल तर स्पर्धेमध्ये बक्षीसं तुमच्या वाटेला चालून येतात, तसंच लोकांचं प्रेम आणि राष्ट्रीय सन्मानही आपसूकच मिळतात.

तुमच्या मेहनतीला, स्पर्धात्मकतेला मिळालेली ही पावती असते. पण, कधीकधी कामगिरीपेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त तुम्हाला लागते नशीबाची साथ.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव

1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबांनी फ्री स्टाईल कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेलं हे दुसरंच ऑलिम्पिक होतं, स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षांत झालेलं. तेव्हा ना देशाची आर्थिक परिस्थिती चांगली होती, ना हाताशी साधनं पुरेशी होती.

अशा परिस्थितीत सातारच्या या गड्याने जिद्दीने एकट्याच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आणि मेडलही जिंकून दाखवलं. या मेडलची कहाणीही बीबीसी मराठीने यापूर्वी अनेकदा सांगितली आहे.

आज पुन्हा हा विषय निघायचं कारण म्हणजे हे मेडल जिंकून आता 68 वर्षं झाली. आणि खाशाबांचा मृत्यू होऊन 36. पण, आतापर्यंत ना महाराष्ट्र सरकारने त्यांना छत्रपती पुरस्कार दिला, ना केंद्रसरकारने पद्म पुरस्कारासाठी त्यांचा विचार केला. अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला 2001 साली मरणोत्तर...

Image copyright रणजीत जाधव
प्रतिमा मथळा खाशाबांना राज्यसरकारकडून छत्रपती पुरस्कारही मिळाला नाही, अर्जुन पुरस्कार मिळाला तो मरणोत्तर.

पण, या पुरस्कारानंतर त्यांचा मुलगा रणजीत आणि कुस्ती संघटनेतल्या काही नेत्यांनी खाशाबांना पद्म मिळावा यासाठी लढाई सुरू केली.

'सर्व ऑलिम्पिक विजेत्यांना पद्म मिळाला, खाशाबांनाच का नाही?'

'1954 साली देशात पद्म पुरस्कारांना सुरुवात झाली. क्रीडा क्षेत्रात पहिला पुरस्कार हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मिळाला. त्यांच्याबरोबरीने 52 साली मेडल जिंकणाऱ्या खाशाबांना मिळायला हवा होता. पुढे 1960साली मिल्खासिंग ऑलिम्पिकमध्ये चौथे आले. त्यांना यथावकाश पद्म मिळाला. पी. टी. उषा यांचा यथार्थ सन्मान झाला.

पण, प्रत्यक्ष मेडल विजेते उपेक्षित राहिले, रणजीत जाधव यांच्या समर्थनार्थ अशी कितीतरी उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात.

स्वत: खाशाबा मात्र आपल्या हयातीत अशा चर्चांपासून दूर किंवा अलिप्त राहिले. आपल्या कामगिरीचा त्यांना अभिमान होता. कुस्तीबद्दल प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी बांधायला घेतलेल्या घराचं नाव त्यांना ऑलिम्पिक निवास ठेवायचं होतं. पण, दुर्दैवाने घर पूर्ण होण्याआधीच 1984मध्ये त्यांचा मोटार अपघातात मृत्यू झाला.

साधेपणाने आयुष्य जगलेल्या खाशाबांनी कधीही पुरस्काराची मागणी केली नाही.

Image copyright संजय दुधाणे
प्रतिमा मथळा 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबांनी कांस्य जिंकलं तो क्षण.

1980 मध्ये देशात आशियाई खेळ झाले. तेव्हाही खरंतर सरकारला त्यांची आठवण नव्हती. पण, मराठीतीतल ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांनी ही गोष्ट आयोजन समितीच्या ध्यानात आणून दिली. त्यांनी ती मान्य केली. आणि अखेर उद्घाटन सोहळ्याच्या दोन दिवस आधी खाशाबांना बोलावणं आलं.

कोल्हापूर, सातारा आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणांना तेव्हा लाल मातीतल्या कुस्तीने पछाडलेलं होतं. खाशाबांनीही आपल्या तरुणाईत गावात अनेक गदा जिंकल्या. पण, त्यांची खासियत ही की फक्त गाव आणि राज्यापुरतं मर्यादित न राहता त्यांना क्षितिज खुणावत राहिलं. आणि कॉलेज वयातच राज्य स्तरीय, मग राष्ट्रीय आणि पुढे आंतरराष्ट्रीय मजल त्यांनी मारली.

खाशाबांची उपेक्षा का झाली?

मातीतली कुस्ती भारताबाहेर मॅटवर गेली आहे हे कळल्यावर हा बदलही त्यांनी सहजतेनं स्वीकारला. घरच्या गरिबीशी दोन हात करत मिळेल तिथून मदत आणि कर्ज उभं करून त्यांनी 1948मध्ये लंडन ऑलिम्पिक आणि 1952मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक अशी वारी केली. दुसऱ्या प्रयत्नांत मेडलही जिंकलं. पण, सरकार दरबारी मात्र ते आजही उपेक्षित राहिले आहेत.

क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या आयुष्यावर 'ऑलिम्पिकवीर खाशाबा' या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी खाशाबांच्या कारकीर्दीचा अभ्यास केलाय. या परिस्थितीचा दोष ते क्रीडा क्षेत्राविषयीच्या एकूणच उदासिनतेला देतात.

"1980 पर्यंत देशात ऑलिम्पिक खेळांना महत्त्वच नव्हतं. कुस्तीतही गावच्या लोकांना मातीतल्या कुस्तीचाच शौक. मॅट उपलब्धही नव्हती. आणि लोकांना त्याविषयी फारसं माहीत नव्हतं. टीव्ही नव्हता. त्यामुळे खाशाबांची कामगिरी सर्वदूर पसरायला वेळ लागला. त्याचा फटका त्यांना बसला असावा. मरणोत्तर पद्म मिळवण्याच्या दृष्टीने खरे प्रयत्न सुरू झाले ते 2001नंतर.." संजय दुधाणे यांनी आपलं निरीक्षण सांगितलं.

Image copyright रणजीत जाधव
प्रतिमा मथळा 2001पासून रणजीत जाधव खाशाबांना मरणोत्तर पद्म मिळावा यासाठी लढाई लढतायत.

त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित केला. खाशाबांच्या नंतर ज्यांनी ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल विजेती कामगिरी केली त्या सर्वांना तातडीने पद्म पुरस्कार दिला गेला आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकलेल्या पी. व्ही. सिंधूलाही पद्मभूषण मिळाला. सचिन तेंडुलकरला तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अशावेळी खाशाबांना पद्म पुरस्कार मिळण्यात का उशीर होतोय?

भाजपाच्या क्रीडाविषयक जाहिरनाम्यात खाशाबांचा उल्लेख

रणजीत जाधव या मुद्याला धरून सरकार दरबारी असंख्य खेटे आजही घालतात. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर राज्यातल्या आमदारांपासून ते दिल्लीतल्या खासदारांपर्यंत अनेकांची भेट त्यांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तेव्हाचे गृहमंत्री राजनाथ सिंग, माजी क्रीडाराज्यमंत्री राजवर्धन राठोड या सगळ्यांनी रणजीत यांच्या प्रयत्नांना पोच दिली आहे.

खरंतर भारतीय जनता पार्टीच्या क्रीडा विषयक जाहीरनाम्यात 2015मध्येच मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न आणि खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देण्याच्या मुद्यांचा समावेश आहे. पण, प्रत्यक्ष पुरस्कारासाठी सरकारला वेळ मिळालेला नाही. यंदाचे पद्म पुरस्कार 26 जानेवारीला जाहीर होतील. यंदा खाशाबांचा त्यासाठी विचार होत असल्याचं पत्र रणजीत यांच्याकडे आलं आहे. निदान यावर्षी तरी त्याची वचनपूर्ती व्हावी एवढीच त्यांची इच्छा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)