भाजपने उदयनराजेंचा सातारामध्ये पराभव घडवून आणला - संजय राऊत

संजय राऊत Image copyright Getty Images

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले आणि भाजपवर टीका केली आहे.

भाजपनं उदयनराजे भोसलेंचा पराभव घडवून आणल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची आणि महाराष्ट्राची माफी मागेल काय?" असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत

"उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत," असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

"उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलू द्या. ही लोकशाही आहे. ते भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत," असं राऊत यांनी म्हटलंय.

"छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो, तेव्हा त्याला विचारायला जात नाही, की तुझी पूजा करू का. उदयनराजे हे छत्रपतींच्या गादीचे वारस आहेत. आम्हाला त्या गादीचा आदर आहे. जिथे जिथे शिवाजी महाराजांचं नाव आहे, तिथे आम्ही नतमस्तक होतो," असंही राऊत यांनी आवर्जून सांगितलं.

भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' या पुस्तकावर टीका करताना संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज कोठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजेंनी शिवसेनेवरही प्रचंड टीका केली होती.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रराजे भोसले यांनी राऊत यांनी भाषा जरा जपून वापरावी, असं म्हटलं आहे.

तसंच संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आम्ही कुठल्या घराण्यातले आहोत, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.

'सरकार टेस्ट ट्यूब बेबी नाही'

"हे सरकार म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी नाहीये. ते ठरवून जन्माला घातलेलं मूल आहे. हे सगळं आधीच ठरलं होतं," असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली 'पूर्वनियोजित' असल्याचंच स्पष्ट केलं.

पुण्याला दैनिक लोकमतनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी हे वक्तव्यं केलं.

"भाजप शब्द पाळणार नाही याची मला खात्री होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच हे माझ्या लक्षात आलं. कारण निकाल भाजपच्या सोयीनुसार लागले होते. राजकारणातला मानवी स्वभाव असतो-माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं. यानंतर विधानसभेच्या जागा वाटपाबाबत काही गोष्टी घडल्या. त्यामुळे हे गडबड करणार हे आम्हाला वाटत होतं," असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, की हे पक्ष काय पाकिस्तानातले आहेत काय? राजकीय मतभेद असू शकतात.

अर्थात, या काळात पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडल्या याबद्दल राऊत यांनी अधिक तपशीलानं सांगायचं टाळलं. पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागेच राहू द्या, असं म्हणत त्यांनी कोणतंही थेट उत्तर दिलं नाही.

संजय राऊत यांनी लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी केलेली टीका, बाळासाहेब ठाकरे-शरद पवारांसोबतचे संबंध, पत्रकारितेतले दिवस अशा वेगवेगळ्या विषयांवरही भाष्य केलं.

'संजय राऊतांची आधीच कबुली'

"संजय राऊत आणि शरद पवार यांच्या होणाऱ्या भेटीगाठींमध्ये शिवसेना आघाडी बरोबर जाण्याची निश्चित चर्चा झाली, अथवा अंदाज बांधले गेले हे स्पष्टपणे दिसून येतंय. भाजपची विधानसभा निवडणुकीतील घोडदौड 110 -115 जागांच्या वर गेली असती तर मात्र शिवसेनेला भाजपा बरोबर रहावं लागलं असत, पण भाजप 110 च्या आत राहिली तर आघाडीत जायचं हा संजय राऊत यांचा प्रीप्लॅन होता हे स्पष्ट आहे. तशी कबुली अनेक वरिष्ठ पत्रकारांना त्यांनी दिलेली आहे. भाजपचं नेतृत्व शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका पोहोचवत असून भाजपला युतीचा फायदा राज्यात शिवसेनेपेक्षा जास्त होत असल्याचं लक्षात येताच शिवसेनेनं डावपेच आखायला सुरुवात केली होती हेच संजय राऊतांच्या वक्तव्यतून स्पष्ट होतं," असं विश्लेषण सकाळचे वरिष्ठ पत्रकार उमेश घोंगडे करतात.

"विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना दिला असल्याचं म्हणाले होते. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होणारा यासाठी मात्र निवडणुकीच्या निकालापर्यंत थांबा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याच वक्तव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुढचे डावपेच आखायला सुरुवात केली होती, अस म्हणायला पाहिजे. भाजप पडद्याआड झालेल्या चर्चा, मान्य करणार नाही किंवा भाजपच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे याचा अंदाज आल्याने; शरद पवारांबरोबर संजय राऊत यांनी डावपेच आखले हे स्पष्ट होतं," अस मत राजकीय विश्लेषक अद्वैत मेहता यांनी व्यक्त केलं आहे.

'अजित पवार आमची स्टेपनी'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार औट घटकेचं ठरलं आणि अजित पवार स्वगृही परतले. या सगळ्या घडामोडींवरही संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. 

"आमच्या गाडीचा नटबोल्ट ढिला करण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती. त्यांना असं वाटलं होतं, की ते आमच्या गाडीचं चाक घेऊन गेले. पण ते स्टेपनी घेऊन गेले होते."

यावर अजित पवारांना तुम्ही स्टेपनी म्हणत आहात, का असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं, की स्टेपनी ही महत्त्वाचीच असते. अजित पवार आमच्या सरकारचा महत्त्वाचा भाग आहेत. 

हे सरकार म्हणजे खिचडी सरकार नाही

शरद पवारांसोबतच्या संबंधांबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, की शरद पवारांवर माझा प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. त्यात काय चुकलं? बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही अशी दोन माणसं आहेत, ज्यांचा महाराष्ट्राच्या जनमानसावर पगडा आहे.

Image copyright Getty Images

"आमच्या या सरकारला कोणी खिचडी सरकार म्हणत नाहीये. दुसऱ्या कोणत्याही मार्गानं हे सरकार बनलं असतं तर त्याला खिचडी सरकार म्हटलं गेलं असतं. पण या सरकारला लोक 'सरकार' म्हणत आहेत, कारण या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि या सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत."

'सामना'चा संपादक हीच ओळख प्रिय

"माझा पिंड पत्रकारितेचाच आहे. मला अजूनही स्वतःला पत्रकार म्हणवूनच घ्यायला आवडतं. माझी ओळख शेवटपर्यंत संपादक 'सामना' अशीच राहावी. मला आतापर्यंत जे काही मिळालं ते पत्रकारितेनचं दिलं आहे. त्यामुळे मी पत्रकारितेचा कायमच ऋणी आहे," अशा शब्दांत संजय राऊत यांनी पत्रकारितेसंबंधीची आपली भूमिका मांडली.

राज-उद्धव यांच्यापेक्षाही बाळासाहेब महत्त्वाचे

"माझ्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे आहेत," असं संजय राऊत यांनी म्हटलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हाच्या घडामोडींबद्दल तसंच शिवसेना-मनसेच्या वाटचालीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं.

Image copyright Getty Images

"राज ठाकरे हे माझे मित्र होते, आजही आहेत. हे सांगायला मी घाबरतो का? मैत्री ही मैत्री असते. आता त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आहे. त्या पक्षाचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहे, मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष कसा वाढवायचा, पुढे न्यायचा हा आमचा प्रश्न आहे.

'गुंड' म्हणवून घेण्यात कमीपणा वाटत नाही

"लोकप्रभा साप्ताहिकात संजय राऊत क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहायचे. तेव्हाच्या आपल्या कामाबद्दल सांगताना राऊत यांनी म्हटलं, की अंडरवर्ल्ड डॉन रमा नाईकच्या एन्काउंटरनंतर लोकप्रभानं कव्हर स्टोरी करायची ठरवली होती. पण ते करणार कोण? दगडी चाळीत जाणार कोण? खरं तर असं काही नसतं. तुमची हिंमत एकदा बघितली तर तुमच्या अंगावर यायचं धाडस कोणी करत नाही, मग तो पंतप्रधान असो, गृहमंत्री असो, की अंडरवर्ल्ड डॉन...

या बिनधास्त कार्यशैलीमुळेच माधव गडकरी मला 'गुंड' म्हणायचे असंही राऊत यांनी सांगितलं. "या शब्दात काही कमीपणा नाही. मला वाटतं, की ती कामाची पद्धत आहे. आपल्याकडेही 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा असं म्हणतातच ना! बाळासाहेबही माझी ओळख 'फायरब्रॅन्ड एडिटर' अशीच करून द्यायचे."

दाऊद इब्राहिमला दमसुद्धा दिलाय

"मुंबईचं अंडरवर्ल्ड विश्व मी जवळून पाहिलं आहे. मी दाऊद इब्राहिमपासून सगळ्यांचंच फोटोसेशन केलं आहे. दाऊदला पाहिलेले, त्याच्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मी त्याला पाहिलंय, त्याच्याशी बोललोय. त्याला दमसुद्धा दिलाय. तो काळ वेगळा होता."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)